भालचंद्र कुबल
मागील लेखावरूनच हा लेख सुरू करतोय. मागच्या लेखात एकच विनंती मी वाचक वर्गाला केली होती ती म्हणजे, दशावतारी कलाकारांना आजच्या घडीला प्रोत्साहन द्या, बाकी काहीही नको. आज दशावतार नाटक मंडळ चालवणारी तरुण पिढी सुशिक्षित आहे, टेक्नोसॅव्ही आहे, नवविचारांनी प्रेरीत आहे. दशावतारी नाटके आजवर त्यांच्या पूर्वजांनी परंपरा म्हणून चालवली. ही पिढी व्यवसाय म्हणून चालवते. नाटकाव्यतिरिक्त जोडधंदा किंवा नोकरी करणारी दशावतारी मंडळींचा प्रोफेशनल अप्रोच खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. २० नोव्हेंबर २०१३ ला सांस्कृतिक संचालनालय आणि आय.एन.टी. यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडीच्या आर.पि.डी.महाविद्यालयात दशावतारावर निवासी शिबीर आयोजित करण्यात आले होते. प्रमुख प्रशिक्षकपदी माझी नेमणूक करण्यात आली होती. दशावतार शिकवण्याची माझी पहिलीच वेळ होती. दशावतार हे विधीनाट्य आहे. त्यामुळे देवळातील सभामंडपात ते सादर व्हावे, अशी ‘देवांची इच्छा’ असते. दशावतारात स्त्रियांनी कुठलेच काम करू नये असा पारंपरिक नियम आहे कारण ऋतुकाळातील चार दिवसांच्या काळात स्त्रियांसाठी देवपूजा वर्ज्य समजली जाते. यक्षगानातून निर्माण झालेल्या दशावतार या लोककलेने त्यांचेच नियम अंगीकारले व स्त्री कलाकारांना दशावतारापासून वंचित ठेवण्यात आले. आजही दशावतारात स्त्री पार्ट पुरुष कलाकारच करण्याचे हेच एक महत्त्वाचे कारण समजले गेलेय. शिबिराची जाहिरात जोरदार झाल्याने व शिबीर विनामुल्य आणि निवासी असल्याने प्रशिक्षणार्थींची रीघ लागली… आणि त्यात पाच मुलींनी प्रशिक्षणासाठी नावे नोंदवल्याने त्यांना परंपरा पाळून प्रवेश द्यायचा की नाही हा पेच उभा राहिला. निर्णय घेणाऱ्यांमध्ये दोन तट पडले होते. प्रशिक्षण असल्यामुळे महिलांना न डावलता ते दिले गेले पाहिजे हा एक आग्रह होता, तर परंपरांचा विचार करता महिलांना दशावतार शिकवता येणार नाही, असा दुसरा विचार पुढे आला; परंतु सांस्कृतिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रशिक्षणार्थींमध्ये स्त्री-पुरुष असा भेद करता येणार नाही अशी ठाम सकारात्मक भूमिका घेतली आणि महिलांना दशावताराचे प्रशिक्षण द्यायचे असा निर्णय घेण्यात आला. शिवाय कै. डाॅ. तुलसी बेहरे यांनी स्वतः वेंगुर्ल्यात स्त्रिंयांचे दशावतारी मंडळ स्थापन केले आहे आणि ते मंडळ जिल्ह्यात विविध ठिकाणी दशावतारी नाटकाचे ‘प्रयोग’ सादर करत असल्याची बातमी समजली. थोडक्यात स्त्रिया दशावतारात भाग घेऊ शकतात हा पुरोगामी विचार समोर आला.
मी या आधीच्या लेखात उल्लेखिलेली “अनसिन थिएटर” (अदृष्य रंगभूमी) ही संकल्पना या निमित्ताने इथे मांडतो आहे. अदृष्य रंगभूमी म्हणजे पुरोगामी विचारांनी युक्त आणि पारंपरिक रिती, पद्धती आणि शैलीला छेद देऊन सामाजिक परिवर्तनास अधोरेखित करणारे ते अनसीन थिएटर…! जे दिसंत नाही; परंतु वैचारीक विवेचनाच्या आधारे सामाजिक मुल्यांमध्ये बदल घडविण्यास भाग पाडते ते अनसिन थिएटर किंवा अदृष्य रंगभूमी अशी संकल्पना मी अत्यंत ढोबळ आणि प्राथमिक स्वरुपात मांडत आहे. ज्या पद्धतीने एम.बी.ए. किंवा तत्सम पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रमात एखादी केस स्टडी दिली जाते व त्यावर सैद्धांतिक विवेचन करून त्यावरील प्रमेय सोडविण्यात येते तिच पद्धत मी आज इथे मांडतोय. त्यासाठी मी देत असलेल्या केस स्टडीत सत्यता असूनही ती काल्पनिक समजावी आणि कुठल्याही घटना वा प्रसंगाशी त्याचे साधर्म्य आढळल्यास तो योगायोग समजावा. मी कोकणातील एका गावी दशावताराचे प्रशिक्षण देत आहे. दशावतारापैकी कोणत्याही एका अवतारासंबंधी उत्तररंगातील आख्यान असावे असा एक पारंपरिक नियम मी विद्यार्थ्यांना समजावून सांगतो. मग दशावतार किती?, तर दहा…!
हे उत्तर प्रत्येक जण सांगतो. पैकी बुद्ध आणि कलकी या शेवटच्या दोन अवतारांबद्दल समाजात अनेक मते-मतांतरे आहेत. नवबौद्ध समाज अवतार संकल्पना मानत नाही कारण अनेक विचारवंतानी पुनर्जन्म ही संकल्पना तद्दन काल्पनिक असून, वास्तववादाला छेद देणारी आहे. त्यामुळे बुद्ध दशावतारात सादर केला जाऊ नये, हे एका विचार सरणीचे मत, तर विद्यार्थ्यांपैकी प्रवीण (काल्पनिक नाव) नावाच्या कुडाळ तालुक्यातील हुंब्रस गावातल्या बौद्धवाडीत राहणाऱ्या विद्यार्थ्याने “बुद्ध अवतार सादर केला जावा” हे पुरोगामी ठाम मत. आम्ही प्रशिक्षक या वादावर काहीतरी थातुर-मातुर कारणे देतो आणि प्रशिक्षण संपवतो; परंतु वाद काही संपत नाही कारण प्रतिगामी आणि पारंपरिक दशावतार सादर करणाऱ्यांच्या मते “हा दोन धर्मांचा तिढा आहे, त्यामुळे दशावतारात दुसऱ्या कुठल्याही धर्माचा अंतर्भाव नसावा” हे विधान वारंवार उगाळले जाते. प्रवीण स्वतःच्या मतावर ठाम आहे आणि पारंपरिक दशावतारी त्या विरोधात ठाम आहेत. प्रशिक्षणाची सांगता होते. आता प्रवीणने बौद्धवाडीत स्वतःचे दशावतारी मंडळ स्थापन केलेय. तो स्वतःच्या आकलन शक्तीनुसार गावकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता दशावताराच्या खेळात बुद्धआख्यान सादर करतो. गावकरी हे आख्यान होऊ देणार नाहीत, या इरेला पेटले असतानाही प्रवीण ते सादर करतो. त्या आख्यानाचा शेवट बुद्धाकरवी हंडी फोडून दशावतार संपन्न होतो. त्याला त्या खेळाची बिदागी दिली जात नाही आणि त्या रात्री प्रवीणला जनक्षोभाला सामोरे जावे लागते. त्याच्या मंडळातील इतर कलाकार कसेबसे जीव वाचवून पळ काढतात, मात्र पहाटे प्रवीणचे प्रेत जवळच्याच एका शेतात सापडल्याची बातमी समोर येते. पोलीस डायरीत त्याच्या मृत्यूची नोंद “आत्महत्या” म्हणून आढळते.
ही होती अदृष्य रंगभूमीशी संलग्न अशी केस स्टडी…! या आनुषंगाने उपस्थित होणारे प्रश्न असे…१) बुद्धाला दशावतारात स्थान कोणी बहाल केले? २) बौद्ध हा अतिप्राचिन धर्म आहे. हे माहीत असतानाही धर्माधिष्ठीत कलेत त्याचा अंतर्भाव कुणी व का केला? ३)दशावतार या लोककलेचे सादरीकरण विधीनाट्यानुसार होत असताना सामाजिक तेढ निर्माण का केली जावी? असे एक नाही, तर अनेक प्रश्नांची जंत्री प्रत्येकाच्या मनात तयार होईल. संदर्भ पार खोलवर जातील आणि अशाच वेळी जन्म घेईल ते आजवर कधीही न उल्लेखले गेलेले “अनसिन थिएटर” अर्थात अदृष्य रंगभूमी…! या संकल्पनेचे विवेचन संपलेले नाही. अनेक रंगभूमी अभ्यासकांना ही संकल्पना विस्तृत कराविशी वाटेल, तर काहींना यात नाट्य दिसून ते सादर करावेसे वाटेल…आणि जे एखाद्या रंगकर्मीला आंतरबाह्य ढवळून काढते, तेच थिएटर असते. म्हणजे २१ व्या शतकात आपण एका नव्या रंगभूमीला जन्म देतो आहोत… जे “अनसिन” म्हणजे कुणीही पाहिलेले नाही…!