कुडाळ विधानसभा- निलेश राणे, कणकवली विधानसभा- नितेश राणे, सावंतवाडी विधानसभा- दीपक केसरकर यांचा मोठ्या मताधिक्याने विजय
संतोष राऊळ
सिंधुदुर्ग : ‘राणे फॅक्टर’ (Rane Factor) सिंधुदुर्ग जिल्ह्यात यशस्वी ठरला. कणकवली विधानसभा मतदार संघात भाजप महायुतीचे उमेदवार नितेश नारायण राणे, कुडाळ मालवण मतदारसंघातून शिवसेना महायुतीचे उमेदवार निलेश नारायण राणे आणि सावंतवाडी मतदारसंघातून शिवसेना महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर हे निर्विवाद विजय होऊन तीन मतदारसंघात राणे फॅक्टरचा विजय झाला. लोकसभेनंतर पुन्हा एकदा सिंधुदुर्गात राणेंचे वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले. नारायण राणे विरुद्ध उध्दव ठाकरे अशी सिंधुदुर्गात असलेल्या या लढाईत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे तिन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. तर उद्धव ठाकरे यांचे तिन्ही उमेदवार दारुण पराभूत झाले आहेत. सभा बैठका जाहीर मेळावे घेऊन उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्गातील ही लढाई प्रतिष्ठेची केली होती. मात्र यात नारायण राणेंचे तिन्ही उमेदवार विजयी झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांचा ‘धुराळा’ उडाला आहे. या विजयाने सिंधुदुर्ग हा राणेंचा बालेकिल्ला आहे. हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
कणकवली विधानसभा मतदारसंघातून नितेश नारायण राणे हे कमळ चिन्हावर भाजपचे उमेदवार होते यांनी प्रतिस्पर्धी उबाठा सेनेचे उमेदवार संदेश पारकर यांचा दारुण पराभव करत १ लाख ८ हजार ३६९ मते मिळवली.नितेश राणे यांनी ५८ हजार ७ चे मताधिक्य घेतले. संदेश पारकर हे ५० हजार ३६२ मते मिळवून शकले.
कुडाळ मतदार संघात उबाठा चे दहा वर्ष आमदार असलेले वैभव नाईक यांच्या साम्राज्याचा शिवसेना महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी कचरा केला. ८१ हजार ६५९ मते मिळवून ८ हजार १७६ चे मताधिक्य घेत वैभव नाईक यांचा दारुण पराभव केला. वैभव नाईक यांना ७३ हजार ४८३ मते मिळाली आहेत. वैभव नाईक यांच्या दारुण पराभवाने उद्धव ठाकरे यांची असलेले शेवटची निशाणी सुद्धा संपुष्टात आली आहे.
शिक्षण मंत्री असलेले दीपक केसरकर हे सावंतवाडी मतदारसंघातून शिवसेना महायुतीचे उमेदवार म्हणून लढले. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या भक्कम पाठिंबामुळे त्यांना ८१ हजार ००८ मते मिळाली. चौरंगी लढतीत विरोधकांना धूळ चारत तब्बल ३९ हजार ८९९ चे मताधिक्य घेतले. पहिल्या फेरीपासून घेतलेलं मताधिक्य कायम राखण्यात केसरकर यशस्वी झाले.
केसरकर यांचे विरोधात उबाठा सेनेचे उमेदवार राजन तेली ४१ हजार १०९ मते घेत दुसऱ्या क्रमांकावर राहीले. सर्वाधिक चर्चेत असलेले अपक्ष उमेदवार विशाल परब यांचा मोठा फटका त्यांना बसला. अपक्ष उमेदवार विशाल परब यांना ३३ हजार २८१ एवढी मतं मिळाली. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बंडखोर अपक्ष उमेदवार अर्चना घारे-परब यांना केवळ ६१७४ मतांवर समाधान मानावं लागले. एकंदरीतच सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे फॅक्टर प्रत्येक केंद्रावर पाहावयास मिळाला प्रत्येक बुध वर पाहावयास मिळाला प्रत्येक मतपेटीतून राणेंची व्होट बँक पाहावयास मिळाली.
भगवा फडकला गुलाल उधळला; निलेश राणे यांचा लक्षवेधी विजय
राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या महत्वपूर्ण लढतीपैकी एक असलेल्या कुडाळ मालवण विधानसभा निवडणुकीत शिवसेना महायुतीचे उमेदवार निलेश नारायणराव राणे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव विजय नाईक यांचा ८ हजार १७६ मतांनी पराभव करत कुडाळ मालवण मतदारसंघावार महायुतीचा भगवा फडकवला आहे. निलेश राणे याना ८१ हजार ६५९ तर वैभव नाईक यांना ७३ हजार ४८३ मते मिळाली. मतमोजणी सुरु असताना सकाळी ८.१५ वाजता निलेश राणे यांचे मतमोजणीच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांनतर ११ वाजता वैभव नाईक मतमोजणी केंद्रात आले. मात्र साधारण १६ व्या फेरीनंतर आपला पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्याने वैभव नाईक यांनी मतमोजणी केंद्रातून निघून गेले.
कणकवलीतून महायुतीचे नितेश राणे यांची विजयाची हॅट्रिक
कणकवली विधानसभा मतदारसंघात ‘राणे फॅक्टर’ यशस्वी ठरला आहे. हा मतदार संघ भाजपाचा बालेकिल्ला असल्याचे दाखवत आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांचा तब्बल ५८००७ मतानी पराभव करत विजयाची हॅट्रिक साधली आहे. ठाकरे शिवसेनेने प्रतिष्ठेच्या केलेल्या आणि अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागुन राहीलेल्या कणकवली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत अखेर भाजपा महायुतीचे उमेदवार नितेश राणे यानी ५८ हजार ०७च्या मताधिक्क्यानी विजय मिळवत ठाकरे शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. आमदार नितेश राणे यांना १ लाख ८ हजार ३६९ तर संदेश पारकर यांना ५० हजार ३६२ मते मिळाली आहेत. संदेश पारकर यांचा मोठ्या फरकाने नितेश राणे यांनी पराभव केला आहे. या निकालाने कणकवली मतदारसंघ हा राणेंचाच बालेकिल्ला आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांना आमदार नितेश राणे यानी ही भेट देत भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे केवळ सिंधुदुर्गचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागुन राहीले होते. कणकवली विधानसभा निवडणुकीत सहा उमेदवार निवडणुक रिंगणात होते. यामध्ये नितेश नारायण राणे (भाजप – १०८३६९), संदेश पारकर (उबाठा-५०३६२), चंद्रकांत जाधव (बहुजन समाज पार्टी -८८७), अपक्ष गणेश माने (११४४), बंदेनवाज खानी (४५५),संदेश सुदाम परकर(९०१)अशी मते मिळाली आहेत. तर नोटाचा अधिकार १०११ मतदारांनी बजावला असुन टपाली मतपेटीतील २२१ मते अवैध ठरली. कणकवली विधानसभा मतदारसंघात एक लाख ६३ हजार ३७१ मतदान झाले होते.