Tuesday, June 17, 2025

Ranti: मराठीतला रानटी ॲक्शनपट

Ranti: मराठीतला रानटी ॲक्शनपट

युवराज अवसरमल


नागेश भोसले यांनी अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक या तिन्ही भूमिका लिलया पेललेल्या आहेत. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. सुरुवातीच्या काळात नागेश यांनी सत्यदेव दुबे व विजया मेहता यांच्या सोबत रंगमंचावर काम केले. चंद्रलेखा व कलावैभव यांच्या संस्थेच्या नाटकांमध्ये त्यांनी काम केले... कलावैभवच्या वन रूम किचन नाटकात त्यांनी हणम्याची भूमिका साकारली होती. मराठी रंगभूमी बरोबर हिंदी आणि इंग्लिश रंगभूमीवर आणि प्रायोगिक रंगभूमीवर देखील त्यांनी काम केले. मराठी, हिंदी व तेलुगू भाषांमधील शंभरहून अधिक चित्रपटामध्ये त्यांनी काम केले. एक अभिनेता म्हणून त्यांनी ‘गणवेश’, ‘शासन’, ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’, ‘दुनियादारी’, ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’, ‘चल धरपकड’, ‘चिमणी पाखरं’, ‘चूल आणि मूल’,‘धग’, ‘बनगरवाडी’, ‘मनातलं ऊन’, ‘तु. का. पाटील’ या चित्रपटामध्ये काम केले. ‘देवयानी’, ‘दामिनी’, ‘हसरते’ या काही मालिका त्यांनी केल्या. गोष्ट छोटी डोंगराएवढी या चित्रपटाद्वारे त्यांनी निर्मिती व दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकले. त्यांच्या नाती खेळ या चित्रपटाला चीनमधील वुहान आंतरराष्ट्रीय कला चित्रपट महोत्सवात विशेष पुरस्कार मिळाला.


त्यांनी अजना मोशन पिक्चर प्रा.लि.ची. स्थापना केली. अजनाचा पहिला चित्रपट होता पन्हाळा. या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन त्यांनी केले. या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले. समीक्षकांनी या चित्रपटाची प्रशंसा केली. हा चित्रपट देशात व परदेशात रिलीज केला गेला. कॉटन ५६ व पॉलिस्टर ४४ या मुंबईतील बंद गिरणीतल्या गिरणी कामगारांच्या जीवनावर बेतलेल्या इंग्लिश नाटकात भोसले यांनी एका गिरणी कामगाराची भूमिका केली होती. रामू रामनाथन यांनी हे नाटक लिहिले होते आणि सुनील शानभाग यांनी ते दिग्दर्शित केले होते. यांच्या चेतन दातारद्वारा हिंदीमध्ये भाषांतरित नाटकातही त्यांनी काम केले होते. समित कक्कड दिग्दर्शित व नागेश भोसले अभिनित 'रानटी' चित्रपट आहे.


माणसात दोन शक्ती कार्यरत असतात. एक त्याला वाईट आणि अयोग्य गोष्टीकडे आकर्षित करते, तर दुसरी त्या बाबत नकारघंटा वाजवून चांगल्याकडे खेचू पाहते. पण जेंव्हा माणसातील रानटी शक्ती इतकी प्रबळ होते की माणसातील चांगले गुण नाहीसे होत थैमान घालणारी माणसं दिसू लागतात. याच थैमान शक्तीला आवर घालण्यासाठी काही जणांना रानटी व्हावे लागते. कदाचित आजूबाजूची परिस्थिती त्यांना तस बनवत असेल, त्यामुळे काही रानटी असतात, तर काही रानटी बनतात. असाच रानटीपणा घेऊन रानटी चित्रपट आला आहे. नागेश भोसले यांची रानटी चित्रपटात महत्त्वाची खलनायकाची भूमिका आहे. त्यांना या चित्रपटाबद्दल विचारले असता ते म्हणाले की, रानटी हा मुद्दामहून अँक्शनपट असा मराठीत बनविला गेला आहे. शिवरुद्र नावाची व्यक्तिरेखा मी साकारत आहे. ती व्यक्तिरेखा खलनायकाच्या प्रवृत्तीची आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक असित कक्कड दक्षिणेकडचे आहेत. दिग्दर्शक व त्याची टीम खूपच सृजनशील आहेत, हुशार आहेत, त्यामुळे चित्रपट बरा झाला आहे. माणसाच्या जीवनात इतके खाचखळगे असतात की, कोणता टर्निंग पॉइंट धरावा असा प्रश्न त्यांना पडला. आतापर्यंत त्यांच्या जीवनात कोणताही टर्निंग पॉइंट आलेला नाही. रानटी चित्रपटासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा!

Comments
Add Comment