मेघना साने
मुंबई मराठी साहित्य संघाच्या एकोणनव्वदाव्या वर्धापनदिनी पुरस्कार वितरण सुरू होते. मराठी रंगभूमीवरील आधुनिकोत्तर कालखंडातील आघाडीचे नाटककार, कादंबरीकार, नट, दिग्दर्शक, चित्रपट लेखक असे चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाचे अभिराम भडकमकर यांना ‘के. नारायण काळे स्मृती पुरस्कार’ जाहीर झाला. पुरस्कार मिळालेल्या दिग्गजांच्या वतीने लेखक अभिराम भडकमकर हे मनोगत व्यक्त करायला उभे राहिले. साहित्य संघाच्या वास्तूबद्दल आदर व्यक्त करून ते म्हणाले, “मराठी रंगभूमीवर प्रायोगिक रंगभूमीची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली. अशांपैकी नारायण काळे हे एक होत. त्यांचे रंगभूमीला असलेले योगदान फार महत्त्वाचे आहे. त्यांचा पाश्चात्त्य रंगभूमीचा अनुभव, वाचन आणि व्यासंग इतका मोठा होता की, नाट्यप्रयोगांना एक शास्त्रशुद्ध बैठक असली पाहिजे असा विचार त्यांच्या पासून सुरू झाला. त्यानंतर मराठी रंगभूमी आधुनिकतेकडे जाताना दिसू लागली. के. नारायण काळे हे मराठी रंगभूमीच्या इतिहासातील मैलाचा दगड आहेत असे मी मानतो. त्यांच्या नावाचा पुरस्कार घेताना ही सैद्धांतिक मूस आपल्याकडे आहे की, नाही याचा विचार करूनच मला पाऊल पुढे टाकावे लागेल. “हे भाषण ऐकताना मोठी माणसे पुरस्काराबद्दल कसा विचार करतात हे कळले. खरे तर अभिराम भडकमकर यांची कारकीर्द खूप मोठी आहे. ‘हसत खेळत’, ‘ज्याचा त्याचा प्रश्न’, ‘सुखांशी भांडतो आम्ही’ अशी त्यांची अनेक नाटके गाजली. ‘बालगंधर्व’ चित्रपटाचे लेखन त्यांनी केले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आम्ही असू लाडके’ या चित्रपटाला अनेक पुरस्कार लाभले असून, न्यूयॉर्क येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी त्याची निवड झाली होती. अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांसह अत्यंत मानाचा असा संगीत नाटक अकादमीचा रंगभूमीवरील कार्यासाठी असलेला पुरस्कार त्यांना मिळाला आहे. तरीही साहित्य संघाच्या या पुरस्काराला स्वीकारताना “हा पुरस्कार मिळल्यामुळे माझी जबाबदारी आता वाढली आहे.” असे उद्गार त्यांनी काढले. के. नारायण यांचे कार्य किती महत्त्वाचे होते व आपण त्यांचे फॉलोअर्स आहोत हे त्यांनी लक्षात आणून दिले.
या समारंभात अध्यक्षीय भाषण विख्यात चित्रकार वासुदेव कामत यांचे होणार होते. त्यांच्यासाठी लिहिलेल्या मानपत्राचे वाचन लेखिका प्रतिभा सराफ यांनी केले. वासुदेव कामत यांनी चित्रकलेच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. लॅण्डस्केप्स, पोर्ट्रेट्स, स्टील लाईफ यांच्यासारखे विषय तर हाताळलेच, शिवाय पौराणिक विषयांचा अभ्यास करून ते विषय वास्तववादी शैलीमध्येही रेखाटले आहेत. भारत आणि जपानसारख्या देशात मोठ्या प्रमाणावर पॅगोडामध्ये बुद्धांच्या जीवनावर भव्य चित्रमालिका त्यांनी साकारल्या. ‘माय वाइफ’ या पोर्ट्रेटसाठी त्यांना २००६ साली ‘पोर्ट्रेट्स सोसायटी ऑफ अमेरिका’ या संस्थेचा ‘ड्रेपर ग्रँड’ पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या या उत्तुंग कार्याबद्दल त्यांना मुंबई मराठी साहित्य संघाचा ‘मराठी यशवंत पुरस्कार २०२४’ जाहीर झाला. मानपत्र स्वीकारायला प्रकृतीच्या कारणामुळे वासुदेव कामत उपस्थित राहू शकले नव्हते. त्यांची कन्या अमृता यांनी कामत सरांनी पाठविलेला संदेश वाचून दाखवला. वासुदेव कामत यांनी आपल्या भाषणात असे म्हटले होते की, कलाकाराच्या मनातील विचारांना योग्य वेळी ऊर्जा मिळाली, तर त्याला मूर्त स्वरूप मिळते. जसे गायकाला योग्य स्वर प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या करावी लागते तसेच मनात उमगलेले दृश्य साध्य करण्यासाठी सरावाची आवश्यकता असते. चित्रकलेच्या क्षेत्रात अनुकरण हे काही अंशी स्वीकारार्ह असले तरी ते त्यापेक्षाही उंचीचे अनुकीर्तन हे नवनिर्मितीची अनुभूती देणारे असते.’
या समारंभात आणखी काही महत्त्वाचे पुरस्कार घोषित केले गेले. ते असे – ज्येष्ठ अभिनेते कै. जयंत सावरकर यांच्या अर्धांगिनी निर्मला जयंत सावरकर यांना ‘सहचारिणी पुरस्कार’ दिला गेला. जयंत सावरकर यांच्या नावावर शंभरहून अधिक मराठी हिंदी सिनेमे, नाटके तसेच आकाशवाणी आणि दूरचित्रवाणीवरील असंख्य भूमिका आहेत. जेव्हा त्यांनी नाट्यनिर्मिती केली होती. त्यावेळी त्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागले. त्यावेळी सहचारिणी या नात्याने निर्मलाताईंनी तीन अपत्यांचे शिक्षण आणि सांसारिक जबाबदारी पेलण्यासाठी आपले दागिने गहाण ठेवले, खानावळ चालवली, दारोदार फिरून फिनेल, साड्या वगैरे यांची विक्रीसुद्धा केली. त्यामुळे जयंत सावरकर यांचे मनोबल वाढले. एक आगळावेगळा पुरस्कार म्हणजे ‘मनूकाका पंडित संस्था कार्यकर्ता पुरस्कार’. हा पुरस्कार ‘सार्वजनिक वाचनालय, कल्याण’चे सरचिटणीस भिकू बारस्कर यांना दिला गेला. ते नाट्यकलावंत आणि लेखक तर आहेतच; पण बालरंगभूमी आणि महिलांसाठीच्या नाटकाच्या आयोजनाची चळवळ त्यांनी चालवली. सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी व वाचनसंस्कृतीप्रिय अशा कार्यक्रमांचे आयोजन त्यांनी सातत्याने केले आहे.
शकुंतला मुळ्ये यांना ‘साहित्यगौरव पुरस्कार’ जाहीर झाला. मॅजेस्टिक, मौज, पॉप्युलर, मैत्रेय, ग्रंथाली, डिम्पल अशा प्रकाशनांद्वारे प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांचे मुद्रितशोधन त्यांनी केले आहे. लोकसत्तेच्या ‘लोकरंग’ या पुरवणीचे फिचर एडिटर, हॉलिवूड चित्रपट, आंतरराष्ट्रीय संगीत आणि बदलत्या दृक माध्यमांवर काही वर्षे स्तंभलेखन, ‘बुकमार्क’ सदरातील लेखनासाठी मुंबई विद्यापीठाचा अरुण टिकेकर पुरस्कार, ‘विश्वामित्र सिंड्रोम’ आणि ‘हिट्स ऑफ नाईंटी टू’ या गाजलेल्या पुस्तकांचे लेखक असा बहुआयामी साहित्यिक प्रवास केलेल्या पंकज भोसले यांना ‘माधव ज्युलियन’ स्मृती पुरस्कार देण्यात आला. गेली सुमारे वीस वर्षे कबड्डी, फुटबॉल, टेनिस, क्रिकेट अशा अनेक खेळांच्या स्पर्धांच्या क्रीडा वार्तांकनाचा अनुभव असलेल्या व अनेक पुरस्कार प्राप्त विनायक राणे यांना ‘क्रीडा पत्रकार पुरस्कार’ दिला गेला. मुंबई मराठी साहित्य संघाचे हे पुरस्कार कसे सर्वंकष आहेत याची कल्पना या समारंभात आली. तसेच अशा संस्थांमुळे, रंगकर्मींमुळे, साहित्यप्रेमींमुळे मराठीची दिंडी पुढे जात आहे. याचे आकलन झाले.
[email protected]