मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीचे निकाल धक्कादायक लागले असून या निकालामध्ये महायुतीचे वारु सुस्साट सुटल्याने महाविकास आघाडीचा पालापाचोळा उडाला आहे. महाराष्ट्र राज्याची सत्ता संपादन करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या महाविकास आघाडीला साधे विरोधि पक्षनेतेपदही मिळविणे शक्य झाले नाही. महायुतीला २३६ जागा मिळाल्याने महाविकास आघाडीला जेमतेम ४९ जागांवर समाधान मानावे लागले आहे. अपक्ष उमेदवार ३ जागांवर विजयी झाले आहे.
भाजपाला १३७ जागांवर, शिंदेंच्या शिवसेनेला ५८ जागांवर तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ४१ जागांवर विजय मिळाला असून काँग्रेसला १५, ठाकरे शिवसेनेला २० तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला १४ जागांवर समाधान मानावे लागले आहे. राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे पराभूत झाला असून तो तिसऱ्या स्थानावर गेला आहे. या वावटळीत काँग्रेसची मोठी हानी झाली असून पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरातांपासून अनेक रथीमहारथींना पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपा, शिवसेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आपले गड राखले असून अन्यत्र बऱ्याच जागांवर नव्याने विजय मिळाला आहे. जुन्नर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार शरद सोनावणे विजयी झाले आहेत.
वानखेडेवर भव्यदिव्य शपथविधी करण्याच्या हालचाली
महाराष्ट्र विधानसभेला महायुतीने मविआचा सुपडा साफ करत प्रचंड बहुमताने सत्ता राखली आहे. निकालाच्या आदल्यादिवशीच राजभवनाच्या अधिकाऱ्यांनी नवीन मुख्यमंत्री राजभवनाच्या बाहेर, वेगळ्या ठिकाणी शपथविधी घेऊ शकतात, असे म्हटले होते. नव्या सरकारचा शपथविधी सोहळा हा वानखेडेवर आयोजित केला जाण्याची शक्यता आहे.
महायुतीच्या नेत्यांकडून सोमवारी वानखेडे स्टेडियमवर नवीन सरकारचा शपथविधी सोहळा आयोजित करण्याची तयारी सुरु झाली आहे. अद्याप मुख्यमंत्री पदाचे नाव ठरलेले नसले तरी वानखेडेवर शपथविधी घेण्याची तयारी सुरु झाली आहे. २०१४ मध्ये आघाडीकडून सत्ता खेचून आणल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी वानखेडे स्टेडिअममध्ये शपथ सोहळा आयोजित केला होता. यावेळी भाजपाचे सुमारे ३५,००० कार्यकर्ते या सोहळ्याला उपस्थित होते. असाच भव्यदिव्य सोहळा पुन्हा आयोजित करण्याच्या तयारीला भाजपा लागली आहे. महायुतीला २३६ जागा मिळत आहेत. तर मविआला ४९ व अपक्ष व इतरांना ४ जागा मिळत आहेत. यापैकी एका अपक्षाला मुंबईत आणण्यासाठी भाजपाकडून हेलिकॉप्टर पाठविण्यात आले आहे.
विरोध पक्षनेतेपदही मिळणार नाही
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा लाजिरवाणा पराभव झाला आहे. महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. विरोधी पक्षनेते पद मिळावे एवढ्या जागा देखील महायुतीने महाविकास आघाडीसाठी सोडल्या नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीवर विरोधी पक्षनेत्याविनाच विधानसभेत बसण्याची नामुष्की ओढावली आहे. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यासाठी एखाद्या पक्षाला एकूण जागांपैकी १० टक्के जागा मिळवणे आवश्यक असते. म्हणजे महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी किमान २९ जागा मिळवणे गरजेचे आहे. मात्र काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या कोणत्याही पक्षाने २९ जागा जिंकलेल्या नाही. त्यामुळे कुणालाही विरोधी पक्षनेते पद मिळणार नाही.