पेण : पेण-सुधागड-रोहा विधानसभा मतदार संघात पुन्हा एकदा भाजपाचे कमळ फुलले आहे. या निवडणुकीत महायुतीचे भारतिय जनता पार्टीचे उमेदवार आमदार रविशेठ पाटील (Ravisheth Patil) यांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार प्रसाद भोईर यांचा तब्बल ६० हजार ८१० इतक्या मोठ्या मताधिक्क्यांनी पराभव करुन रविशेठ पाटील यांनी दुस-यांदा भाजपच्या तिकीटावर विजय मिळविला आहे. भाजपचे रविशेठ पाटील यांना १ लाख २४ हजार ६३१ मते मिळाली. तर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रसाद भोईर यांना ६३ हजार ८२१ मते मिळाली. तर शेतकरी कामगार पक्षाचे अतुल म्हात्रे यांना २८ हजार १९१ मते मिळाली.
पेण विधानसभा मतदारसंघात ७ उमेदवार आपले नशीब आजमावत होते. यात भाजप, शेकाप, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, वंचित बहुजन आघाडी, बसपा आणि अपक्ष असे ७ उमेदवार उभे होते. यामध्ये मुख्य लढत ही भाजपचे विद्यमान आमदार रविशेठ पाटील, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार प्रसाद भोईर, शेतकरी कामगार पक्षाचे अतुल म्हात्रे यांच्यात होती.
पेण विधानसभा मतदार संघाचे मतमोजणी आज पेण येथील के.इ.एस इंग्लिश स्कुल मध्ये कडेकोट बंदोबस्त मध्ये पार पडली. मतमोजणीच्या पहिल्या फेरी पासूनच महायुतीचे भाजपचे उमेदवार रविशेठ पाटील यांनी आघाडी घेतली होती. ही आघाडी शेवटच्या २९ वी फेरी पर्यंत वाढतच गेली. मतदार संघातील पेण, पाली, सुधागड, नागोठणे, रोहा या विभागात देखील जनतेने रविशेठ पाटील यांना कौल दिला.
महायुतीचा नियोजन बद्ध प्रचार व केलेली विकास कामे या जोरावर रविशेठ पाटील यांनी हा विजय मिळविला आहे. पेण मतदार संघात महाविकास आघाडीत पडलेली फुट, या मतदार संघात ७१ टक्के झालेला मतदान व वाढलेला मतदानाचा टक्का याचा भाजपला फायदा झाल्याचे चित्र दिसत आहे. भाजप च्या लाडकी बहीण व विकासाच्या मुद्द्याला जनतेने कौल दिला असल्याचे आजच्या निकालाने स्पष्ट झाले आहे.
मतमोजणी पूर्ण होताच महायुतीच्या उत्साही कार्यकर्त्यांकडून ढोल ताश्याच्या गजरात पेण शहरातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी खासदार धैर्यशील पाटील, कौसल्या पाटील, जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, नीलिमा पाटील, प्रभाकर म्हात्रे, डीबी पाटील, मिलिंद पाटील, अनिरुद्ध पाटील, निवृत्ती पाटील, विवेक जोशी, मंगेश दळवी आदी सहभागी झाले होते.
पेण विधानसभा मतदार संघातील उमेदवारांना पडलेली मते
रविशेठ पाटील (भाजप) १,२४,६३१ (विजयी)
प्रसाद भोईर (शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे) ६३,८२१.
अतुल म्हात्रे (शेतकरी कामगार पक्ष) २९,१९१.
मंगळ पाटील (अभिनव भारत पार्टी) २२६६.
देवेंद्र कोळी (वंचित बहुजण आघाडी) १७०१.
अनुजा साळवी (बहुजन समाज पार्टी) १२४१.
विकास बागुळ (अपक्ष) १२०३.
नोटा २४७३.