एकटे एकनाथ शिंदे तिघांना पुरून उरले! ठाकरे, पवार, काँग्रेसपेक्षा जास्त जागांवर घेतली आघाडी
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) निकालाने महाभकास आघाडीला जोरदार झटका दिला आहे. भाजपासह महायुतीने न भूतो न भविष्यती असे घवघवीत यश मिळवले आहे. भाजपासह एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाने देखिल जोरदार मुसंडी मारली आहे. राज्यात भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिघांनीही २८८ जागांपैकी २२९ जागांवर आघाडी मिळवली आहे.
महायुतीत भाजपाने १४९ जागा, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ८१ आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने ५९ जागा लढवल्या होत्या. यापैकी भाजपाला १३३, शिंदेसेनेला ५६ आणि अजित पवार गटाला ४० जागा मिळत आहेत. अशाप्रकारेच महायुतीने आतापर्यंतची सर्वोच्च कामगिरी केली आहे.
यंदाच्या निवडणुकीत काँग्रेससह मविआची सर्वात खराब कामगिरी पाहायला मिळत आहे. आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार शिवसेना (उबाठा) १९ जागांवर आघाडीवर आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी १५ जागा आणि काँग्रेस १९ जागांवर आघाडीवर आहे. तर, इतर उमेदवार ५ जागांवर आघाडीवर आहेत. एकूणच मविआ महाराष्ट्रात ५४ जागांवर आघाडीवर आहे. विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे यांची शिवसेना ५५ जागांवर एकहाती आघाडीवर आहे. अशाप्रकारे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसच्या बरोबरीने किंवा जास्त जागा एकनाथ शिंदेंच्या पक्षाला मिळत आहेत.