मुंबई : इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी यापुढे प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे असायलाच हवेत. लाइट गेली तर जनरेटरची सोय असायला हवी. याशिवाय सीसीटीव्हीचे फुटेज निकाल संपेपर्यंत केंद्र चालकांना जतन करून ठेवावे लागणार आहे. केंद्रावरील गैरप्रकाराची तक्रार प्राप्त झाल्यानंतर बोर्डाकडून त्याची पडताळणी होईल आणि त्यानुसार संबंधितांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे.
कॉपीमुक्त परीक्षेसाठी पुणे बोर्डाने यापूर्वीच सरमिसळ पद्धतीचा अवलंब केला आहे. तरीदेखील मागच्या परीक्षेत छत्रपती संभाजी नगर, अमरावती, लातूर, मुंबई व पुणे विभागातील अनेक केंद्रांवर कॉपी करण्याचे प्रकार आढळले. आतापर्यंत केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे व वीज गेल्यास जनरेटर असल्याचे लेखी स्वरूपातच दिले जायचे व प्रत्यक्षात काहीच नसायचे ही वस्तुस्थिती होती.
मात्र, आता शासनानेच त्यासंदर्भातील आदेश काढला असून त्यानुसार प्रत्येक शाळेत विशेषत: बोर्ड परीक्षेच्या केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेर बंधनकारक करण्यात आले आहेत. नुसतेच सीसीटीव्ही कॅमेरे असून चालणार नाही, तर त्याचे फुटेज साठवून ठेवण्याचीही सोय आवश्यक आहे. परीक्षा संपून निकाल लागेपर्यंत ते फुटेज संबंधित केंद्र चालकांना जतन करून ठेवावे लागणार आहे.