Saturday, May 24, 2025

महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजराजकीयमहत्वाची बातमी

Plan B : बंडखोर, अपक्षांवर भाजपाची नजर; 'प्लान बी'साठी फडणवीसांचे ६ शिलेदार सक्रिय

Plan B : बंडखोर, अपक्षांवर भाजपाची नजर; 'प्लान बी'साठी फडणवीसांचे ६ शिलेदार सक्रिय

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी (दि. २३ नोव्हेंबर) जाहीर होईल. गेल्या पाच वर्षांत राज्यात घडलेल्या अभूतपूर्व घडामोडी पाहता यंदा मतदारराजा कोणाला कौल देणार याबद्दल उत्सुकता आहे. निकालाला अवघे काही तास राहिलेले आहेत. बहुतांश एक्झिट पोल्सनी राज्यात महायुतीचेच सरकार कायम राहील, असा कौल दिला आहे. पण तरीही महायुती बहुमतापासून दूर राहिल्यास भाजपाने 'प्लान बी' (Plan B) रेडी केला आहे. अपक्ष आणि बंडखोरांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी भाजपाच्या राज्य नेतृत्त्वाने सहा नेत्यांवर दिली आहे. विशेष म्हणजे यातल्या निम्म्या नेत्यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे.


महायुती आणि महाविकास आघाडीत तीन प्रमुख पक्ष असल्याने यंदा इच्छुकांचा आकडा मोठा होता. त्यामुळे अनेक ठिकाणी बंडखोरी झाली. काही ठिकाणी बंडखोरांमुळे अधिकृत उमेदवार पराभूत होण्याची शक्यता आहेत. काही बंडखोर तगडे असल्याने विशिष्टपूर्ण परिस्थितीत त्यांच्या विजयाची शक्यता वाढलेली आहे. अशा बंडखोरांवर आणि विजयाची शक्यता अधिक असलेल्या अपक्षांसाठी भाजपाने मोठी फिल्डींग लावली आहे.



सरकार स्थापनेसाठी फडणवीसांची जोरदार फिल्डींग


विजयाची शक्यता अधिक असलेल्या अपक्ष आणि बंडखोरांशी संपर्क ठेवण्याची जबाबदारी भाजपाच्या नेत्यांवर आहे. मंत्री रविंद्र चव्हाण, विधान परिषदेतील गटनेते प्रविण दरेकर, आमदार संजय कुटे, नितेश राणे, निरंजन डावखरे, मोहित कंबोज यांना अपक्ष, बंडखोरांवर करडी नजर ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. हे सगळेच नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी फडणवीस जोरदार फिल्डींग लावताना दिसत आहेत.


बंडखोर, अपक्षांवर करडी नजर ठेवण्यासाठी निवडण्यात आलेल्या सहा नेत्यांपैकी तिघांनी अडीच वर्षांपूर्वी एकनाथ शिंदेंच्या बंडात महत्त्वाची भूमिका बजावली होती. विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर शिंदेंसह अनेक आमदार सूरतच्या दिशेनं रवाना झाले. ते सूरतमध्ये असताना आमदार संजय कुटे, रविंद्र चव्हाण, मोहित कंबोज यांनी त्यांची भेट घेत यशस्वी बोलणी केली होती. आता याच नेत्यांकडे भाजपाने पुन्हा एकदा सत्तेसाठी जुळवाजुळव करण्याची जबाबदारी दिली आहे.

Comments
Add Comment