निकालाचे कल लागल्यावर निर्णय घेणार; मविआ- महायुतीकडून प्रहार पक्षाला साद
मुंबई : महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीकडून संपर्क करणं आम्हाला सुरू आहे. मात्र अद्याप आम्ही निर्णय घेतलेला नाही. एकदा राज्याच्या निकालाचे कल हातात आला की आम्ही निर्णय घेऊ, अशी स्पष्टोक्ती परिवर्तन महाशक्तीचे घटक असलेले आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांना दिली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती सोबत येण्यासंदर्भात बच्चू कडूंना फोन आल्याची माहिती पुढे आली आहे. यावर बोलताना बच्चू कडूंनी भाष्य केले आहे.
राज्यात उद्या येणाऱ्या निवडणुकांच्या निकालासंदर्भात महायुती, महाविकास आघाडी ज्याप्रमाणे संपर्क करत आहे, तसे आम्हीदेखील संपर्क करत आहोत. माझ्या पक्षाचे ४ ते ५ उमेदवार निवडून येतील. आम्ही जी तिसरी आघाडी केली त्याचे मिळून एकूण १० ते १५ उमेदवार निवडून येतील. त्यामुळे सध्या कार्यकर्ते उत्साही आहेत. भावी मुख्यमंत्री म्हणून बोर्ड लावत आहेत. मात्र वस्तुस्थिती वेगळी असू शकेल. माझा एक्झिट पोलवर विश्वास नाही. त्यासाठी उद्याची वाट बघावी लागेल. दरम्यान, कुणाला पाठिंबा देण्यापेक्षा आम्ही आमचं सरकार आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत. असेही बच्चू कडू म्हणाले.
महायुती सोबत येण्यासंदर्भात फोन आल्याची माहिती बच्चू कडू यांनी स्वत: फोनद्वारे दिली आहे. उद्या निकाल लागल्यावर आम्ही पुढील निर्णय घेणार असल्याचं ही बच्चू कडू यावेळी म्हणाले. बच्चू कडू हे सध्या मुंबईतच आहे. त्यामुळे ते नेमकी काय भूमिका घेतात आणि ते मविआ की महायुतीची साथ देतात, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.