आपल्याकडे केवळ आठ मान्यवर भारतीय उद्योगपतींकडे लांब पल्ल्याची खासगी जेट विमाने आहेत. शाहरुख खान, अमिताभ बच्चन आणि सलमान खानसारखे कलाकार आणि कपिलदेव, सचिन तेंडुलकर, धोनी, कोहली, हार्दिक पंड्या या क्रिकेटवीरांकडेही स्वत:ची विमाने आहेत. आता मात्र अशा सेलिब्रिटींची आणि उद्योगपतींची मक्तेदारी असलेली खासगी विमाने भाड्याने का होईना, इतरांच्या टप्प्यात आली आहेत. कधी गरज म्हणून तर कधी हौस म्हणून भाड्याने चार्टर विमान घेणाऱ्या लोकांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये लक्षणीयरीत्या वाढली आहे. एका सर्व्हेनुसार कोरोनाच्या महामारीनंतर अशा खासगी विमानांच्या भाड्यात ४० टक्के वाढ झाली आहे.
अजय तिवारी
अति श्रीमंत लोकांकडे स्वत:चे खासगी विमान असते हे आपण ऐकलेले असते. कुणी हौशी विवाहेच्छू जोडप्याने आयुष्यभर लक्षात राहील म्हणून विमानात लग्न केले, अशा नवलाईच्या बातम्याही आपण वाचलेल्या असतात. नेहमीच इकॉनॉमी क्लासने लहान आणि अरुंद सीटवर बसून प्रवास करणाऱ्या लोकांच्याही मनात कुठे तरी स्वतंत्रपणे विमानातून रुबाबात प्रवास करायची इच्छा असते. पण डोळे मिटून अशी स्वप्ने पाहणाऱ्यांनो, लक्षात ठेवा, तुम्ही तुमचे स्वप्न पुरे करू शकता. तुम्ही खासगी विमाने भाड्याने घेऊन वापरू शकता! तुमचे कुटुंब आणि तुम्ही अशा विमान प्रवासाचा आनंद घेऊ शकता. अशा गोष्टी आता खरोखरीच आपल्या हाताशी आल्या आहेत. कधी गरज म्हणून तर कधी हौस म्हणून भाड्याने चार्टर विमान घेणाऱ्या लोकांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये लक्षणीयरीत्या वाढली आहे. एका सर्व्हेनुसार कोरोनाच्या महामारीनंतर अशा खासगी विमानांच्या भाड्यात ४० टक्के वाढ झालेली असूनही चार्टर विमाने बुक करणाऱ्या लोकांच्या संख्येत २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते येत्या तीन वर्षांमध्ये या दरांमध्ये सुमारे चाळीस टक्के वाढीचा अंदाज आहे.
मुळात चार्टर विमानांचा उपयोग भारतासारख्या देशात कसा आणि किती होतो ही समजून घेण्यासारखी बाब आहे. विमान भाड्याने घेण्याची अनेक कारणे असू शकतात. सर्वसामान्य कारणांपैकी एक म्हणजे तुम्हाला गंतव्यस्थानी तातडीने पोहोचणे आवश्यक आहे. कदाचित लांब पल्ल्याचा प्रवास हा करिअरचा एक भाग असेल आणि विमानतळावरील प्रचंड ताण टाळण्याची आवश्यकता असेल, तर व्यावसायिकांना स्वत:साठी विमान भाड्याने घेता येणे शक्य आहे. पायलटचा परवाना मिळवायचा असेल, तर वैमानिकांना ठरावीक तास हवेत लॉग करावे लागतात. त्यासाठी विमान भाड्याने घेणे हा एक चांगला मार्ग ठरतो. परवानाधारक वैमानिकांकडे स्वतःचे विमान नसेल, तर उड्डाणाच्या आनंदासाठी विमान भाड्याने घेता येते. उत्पन्नाचा एक भाग म्हणून इतरांसाठी फ्लाइंग सेवा करण्यासाठीही व्यवसाय म्हणून विमान भाड्याने घेता येते. सिनेमाच्या शूटिंगसाठी विविध प्रकारच्या विमानांची गरज असते, त्यांना या सेवेचा उपयोग होतो. राजकीय व्यक्तींना तातडीच्या कामासाठी प्रवास करण्यासाठी ही सेवा वापरली जाते. निवडणुकीच्या धामधुमीच्या काळात अशा चार्टर विमानांची मागणी फार मोठ्या प्रमाणात वाढते. गुप्ततेची गरज असलेली मोठमोठी व्यावसायिक डील्स अनेकदा अशा खासगी विमानात होतात. व्यावसायिक विमान कंपनीतून उड्डाण करण्यापेक्षा खासगी जेट बुक करणे अधिक महागडे आहे, असा अनेकदा विचार केला जातो. तथापि, अशी काही उदाहरणे आहेत, जिथे खासगी चार्टरद्वारे प्रवास करणे अधिक किफायतशीर आणि फायदेशीर असू शकते. विशेषत: आरोग्यसेवेसाठी याचा उपयोग अत्यावश्यक ठरतो. पेशंटला सुरक्षित आणि तातडीने हलवण्यासाठी चार्टर विमानसेवेचा उपयोग करणे आवश्यक ठरते किंवा देशातल्या एका शहरातील हॉस्पिटलमधून दुसऱ्या शहरातील हॉस्पिटलमध्ये हृदय-किडनी यांच्यासारखे अवयव प्लांट करायचे असतील तर तातडीने पाठवावे लागतात. त्यासाठी वेळेची मर्यादा असते. अशा वेळी या चार्टर विमानसेवेसारखा दुसरा पर्याय आज तरी उपलब्ध नाही.
कनिका टेकरीवाल ‘जेट सेट गो’ या भारतातल्या पहिल्या-वहिल्या भाड्याने विमाने देणाऱ्या कंपनीच्या सहसंस्थापक आणि सीईओ आहेत. ‘जेट सेट गो’ ही कंपनी सुरुवातीला विमाने असणाऱ्यांकरिता विमान चालवणे, विमानाची देखभाल तसेच ठरावीक करारानुसार विमाने भाडेतत्त्वावर देणे या सेवा पुरवत असे. कंपनीचा विस्तार होत गेला, तसे ते हेलिकॉप्टरसुद्धा भाड्याने पुरवू लागले. सध्या कनिका यांच्याकडे स्वत:च्या मालकीची दहा विमाने आहेत. त्यांची कंपनी क्लाउड आधारित शेड्युलिंग, एअरक्राफ्ट मॅनेजमेंट-सेवा आणि विमान, हेलिकॉप्टरच्या पार्ट्सची सर्व्हिस या सेवा देते. कंपनीच्या वेबसाइटद्वारे खासगी प्रवासी विमान, हेलिकॉप्टर आणि एअर ॲम्ब्युलन्स बुक करू शकतात. बिझनेस ट्रिपपासून वाढदिवसाच्या पार्टीपर्यंत अनेक कार्यक्रमांसाठी जेट किंवा हेलिकॉप्टरची सुविधा पुरवतात. भाड्याने विमाने पुरवण्याच्या या सेवेत अजूनही काही कंपन्या काम करतात. ताज एयर, ब्ल्युहाइट एविएशन, एयर चार्टर सर्विसेस इन इंडिया, एलएफएस, आर्यन एव्हिएशन, पूनावाला एव्हिएशन या कंपन्या खासगी विमानसेवेच्या व्यवसायात कार्यरत आहेत. त्यांच्याकडून विविध प्रकारची विमाने भाड्याने दिली जातात. साधारणत: पाच ते नऊ प्रवासी बसू शकतील, अशी तीन ते चार प्रकारची टर्बोप्रोप विमाने साधारणपणे दीड ते दोन लाख रुपये प्रती तास भाड्याने दिली जातात. चार ते सहा प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असलेली हलक्या वजनाची जेट विमाने २.५ ते ३.५ लाख रुपये प्रती तास या दराने भाड्याने दिली जातात. मध्यम आकाराच्या सहा ते दहा लोक बसू शकतात अशा विमानांचे भाडे २.५ ते ४ लाख प्रतीतास असते, तर १२ प्रवासी बसू शकतील अशा सुपर-मिड आकाराच्या विमानांसाठी ३.५ ते १० लाख रुपयांचे भाडे घेतले जाते. त्यापेक्षाही अधिक मोठ्या विमानांचे भाडे, वेळ आणि प्रवाशांची संख्या यावर अवलंबून असते.
ही विमाने अत्यंत आरामदायक आणि आकर्षक असतात. प्रवाशांच्या आवडीप्रमाणे आणि सूचनेप्रमाणे विमान कंपनी त्यात विविध प्रकारचे अन्नपदार्थ पुरवते. या विमानांमध्ये आवर्जून क्लायंटच्या आवडीच्या सिनेमा-नाटकांची सोय केली जाते. मेडिकल एयरक्राफ्टमध्ये व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सिलिंडर आणि इतर आवश्यक सुविधा पुरवल्या जातात. अशा फ्लाइट्सच्या क्रू मेंबर्समध्ये मेडिकल क्षेत्रातील लोकांची व्यवस्था केली जाते. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या विमानातून कोण प्रवास करत आहे ही बाब अत्यंत गुप्त ठेवली जाते. विमानतळावर ठरावीक जागा भाड्याने घेणारे फिक्स्ड बेस ऑपरेटर येथून विमान भाड्याने देण्याची तसेच इतर सेवा देतात. फारशी व्यावसायिक हवाई वाहतूक नसलेल्या लहान एअरफील्डवर बहुतेकदा या ऑपरेटर्सची सेवा उपलब्ध असते. तिथून अशा भाड्याच्या विमानांची सेवा पुरवली जाते. प्रायव्हेट जेटचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण प्रायव्हसी मिळते. त्यातून केवळ तुम्ही आणि तुमचा ग्रुप किंवा कुटुंब मिळून प्रवास करत असता. यासाठी तुम्हाला रांगेत उभे राहावे लागत नाही किंवा चेक इन बॅगेज मर्यादेचा त्रास होत नाही. अनेक विमानतळांवर खासगी उड्डाणांचे टर्मिनल वेगळे असतात. त्यामुळे या प्रवासात तुम्ही पाळीव प्राण्यांनाही सोबत घेऊन जाऊ शकता. शॅम्पू, कंडिशनर, लोशन, कोलोन, परफ्यूम, पाण्याच्या बाटल्या, औषधे, आवडती पेये आणण्याची अनुमती अशा प्रकारच्या चार्टर प्लेनमध्ये असते. भाड्याने दिलेली सर्व खासगी विमाने पेये आणि स्नॅक्स पुरवत असताना, प्रवाशांच्या आवडीच्या कोणत्याही अतिरिक्त केटरिंगची व्यवस्था मागणीप्रमाणे केली जाते. प्रायव्हेट जेटने कुठेही प्रवास करता येतो. एकाच दिवसात अनेक ठिकाणी प्रवास करणेदेखील शक्य होते. महत्त्वाची बाब म्हणजे अशा फ्लाइटची येण्या-जाण्याची वेळ प्रवासी स्वतः ठरवू शकतो. त्यासाठी केवळ विमानतळ प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते.
एरवी प्रवास करताना आपल्याला उड्डाणाच्या किमान दोन, तीन तास आधी विमानतळावर पोहोचावे लागते; परंतु चार्टर्ड विमानाने प्रवास केला जातो, तेव्हा इतक्या लवकर विमानतळावर पोहोचावे लागत नाही. बहुतेक सर्व चार्टर्ड प्लेन्समध्ये वायफायची तसेच करमणुकीच्या सुविधादेखील मिळतात. हल्ली अनेक चार्टर्ड प्लेन्समध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म्सचाही ॲक्सेस दिला जातो. विमान भाड्याने घेणाऱ्या क्लायंटच्या मागणीप्रमाणे या विमानांमध्ये विशेष केअरटेकरदेखील असतात. चार्टर प्लेन बुकिंगसाठी त्या त्या कंपन्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन बुकिंग करता येते. आज भारत ही जगातील तिसरी सर्वात मोठी नागरी विमान वाहतूक बाजारपेठ आहे. देशात आणि परदेशात जाण्यासाठी देशातल्या असंख्य विमानतळांवरून अगणित उड्डाणे होत असतात. पदरी पैसे असलेल्या; परंतु स्वत:चे विमान खरेदी करणे शक्य नसलेल्यांना मात्र अधूनमधून खासगी विमानाची गरज असणाऱ्यांना या सुविधेमुळे विमानप्रवास करणे सोपे, सोयीचे आणि आरामदायक झाले आहे. चार्टर विमानांची आणि प्रवाशांची संख्या वाढत जाईल तशी नजीकच्या भविष्यकाळात चार्टर विमानांमधून प्रवास करणे ही बाब केवळ श्रीमंताची मक्तेदारी न राहता सामान्य माणसांच्या आवाक्यात येऊ शकेल आणि त्यावेळी भारत जगातल्या पहिल्या तीन आर्थिक महाशक्तींमधला एक देश असेल.