आता जबाबदारी मतदार राजाची…

Share

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदानाचा दिवस आहे. महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार हे ठरविण्याची संधी मतदारांना मिळणार आहे. घटनेने करोडो रुपयांची संपत्ती असलेल्या व्यक्तीला जसा मतदाराचा अधिकार दिला आहे तसाच झोपडीत राहणाऱ्या व्यक्तीलाही तो मिळलेला आहे. त्या दोघांच्या मताची किंमत एकच आहे. त्यामुळे लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याची संधी प्रत्येक मतदार राजाला मिळणार आहे. महाराष्ट्रातील प्रचाराचा धुरळा उडाला. या निवडणुकीत सगळ्याच पक्षांनी आश्वासनांची खैरात केली. महाराष्ट्राला फुकट्यांचे राज्य बनविण्याची अहमहमिका लागली आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचे कारण प्रामाणिक करदात्यांच्या तिजोरीत भर पडणाऱ्या पैशांवर राजकीय पक्षांकडून सरकारी योजनांच्या घोषणा होत आहेत, हे आता लपून राहिलेले नाही. या सर्व पक्षांकडून केलेल्या घोषणांची खरोखरच गरज आहे का, याचा विचार वेगळ्या पातळीवर जाऊन करायला हवा. दुसऱ्या बाजूला राज्य निवडणूक आयोगाने मतदानांची टक्केवारी वाढावी यासाठी जनजागृती मोहीम राबविली आहे.

मतदान प्रक्रिया मतदारांना आकर्षित करणारी असावी यासाठीही राज्यात अनेक ठिकाणी विशेष संकल्पना घेऊन मतदान केंद्रे उभारली आहेत, हे विशेष. यामध्ये वन्यजैवविविधता, सांस्कृतिक-सामाजिक वारशाचे दर्शन, स्तनदा-गर्भवतींसाठी हिरकणी मतदान केंद्र, युवा- अपंग-महिला संचालित विशेष मतदान केंद्रे उभारली गेली आहेत. अपंग मतदारांसाठी रॅम्प, व्हीलचेअर, सहकार्यासाठी स्वयंसेवकांची व्यवस्था, मतदारांसाठी शेड-पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यातील नऊ कोटी ७० लाखांपेक्षा जास्त मतदारांपर्यंत पोहोचून मतदानाची टक्केवारी वाढवण्याचा निवडणूक यंत्रणेने जो प्रयत्न केला आहे, तो स्वागतार्ह आहे. त्यात दोन कोटींपेक्षा जास्त युवा म्हणजे १८ ते २९ वयोगटातलेही मतदार आहेत, ही बाब समोर आली आहे. त्याचबरोबर ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत निवडणूक आयोगाने मतदारांशी विविध माध्यमांतून संवाद साधला आहे. यावेळी मल्टिमीडियाचा प्रभावी वापर करून थेट मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला आहे. त्याचप्रमाणे मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी ‘अठरावं वरीस मोक्याचं’, ‘इथे सगळी बोटे सारखी आहेत’, ‘मधाच्या बोटाला बळी पडू नका’, ‘निर्धार महाराष्ट्राचा विधानसभा निवडणुकीत मतदानाचा’, अशा आकर्षक संदेशांचा राज्यभर वापर केल्याचे दिसून आले आहे. तसेच घरोघरी भेटी, रांगोळ्या, मानवी साखळ्या, प्रभात फेऱ्या, पथनाट्य, सायकल-बाइक रॅली, मॅरेथॉन, मतदारांना शपथ, संकल्पपत्र, विविध स्पर्धा, सण साजरे करण्याच्या निमित्ताने मतदार जागृतीपर उपक्रम राबविले आहेत. मुंबई पोलीस दलाच्या वाद्यवृंद पथकाचे सादरीकरण, निवडणूक गीताचे सादरीकरण-त्यावरचं नृत्य, टपाल विभागाकडून विशेष पाकीट-शिक्क्याचं अनावरण, मतदारांना प्रतिज्ञा, असे उपक्रमही राबवण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणात राजकीय परिस्थिती अस्थिर झाल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता मतदार म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी अधिक वाढलेली आहे. मुळात महाराष्ट्रात मतदानाचा टक्का कायमच कमी दिसतो. त्यातही शहरी भागांमध्ये आणखी कमी असतो, हे लोकसभा निवडणुकीच्या मतदान टक्केवारी दिसून आले आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, ज्या दिवशी मतदान असते, त्यादिवशी सरकारी, निमसरकारी कार्यालये, शाळा कॉलेजना सुट्टी जाहीर असते; परंतु गेल्या काही वर्षांत निवडणुकीच्या दिवशी पिकनिकला जाण्याचा ट्रेंड वाढल्याचे दिसून येतो. हा ट्रेंड लोकशाहीच्या दृष्टीने दुर्दैवी आहे. मतदान करायचे की नाही याबाबत प्रत्येक नागरिकाला स्वेच्छा अधिकार असला तरी, मतदान न करता मौजमजा करणे ही लोकशाहीबाबतची उदासीनता अत्यंत वाईट गोष्ट आहे. मुंबई-पुण्यासारख्या शहरात जेमतेम पन्नास टक्के मतदार आपला हक्क बजाविताना दिसतात. त्यामुळे उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे आपण सगळ्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे.

मतदानाचा टक्का वाढला तरच अधिक चांगले राज्यकर्ते मिळू शकतात, हे सगळ्यांनीच ध्यानात ठेवले पाहिजे. प्रत्येकाने आपल्याला योग्य वाटतो त्या उमेदवाराला मत द्यावे, पण मतदान आवर्जून करावे, असे आवाहन करावेसे वाटते. तसे पाहायला गेले तर देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रासारख्या राज्याला मतदानाचा टक्का वाढण्यासाठी प्रशासकीय पातळीवर मोहिमा राबवाव्या लागणे कितपत योग्य आहे, याचाही विचार आपण मतदारांनी करायला पाहिजे. राज्यात यासारखी निवडणूक यापूर्वी झाली नाही, असे अनेकांचे मत आहे. यापूर्वी महाराष्ट्राने इतके राजकीय पक्ष, इतक्या वेगळ्या आघाड्या, त्यांचे जाहीरनामे अशी निवडणूक बघितली नव्हती. यावेळी मात्र किमान सहा मोठे पक्ष, त्यांच्याबरोबर राज्य पातळीवरील काही पक्ष आणि अपक्ष अशी मोठी जत्रा या निवडणुकीत दिसते आहे. त्यामुळे मतांची नक्की विभागणी कशी होणार, इथपासून ते नक्की कोण कोणाची मते कापणार, त्यामुळे कोणाचा विजय सुकर होणार, कोणाला पराभवाचा धक्का बसणार याचे अंदाज प्रत्येकजण बांधत आहे. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेत मतदार म्हणून आपल्यालाच जबाबदारीने भूमिका बजावावी लागणार आहे. आपल्याला गृहीत न धरता, एकूणच समाजाची बांधिलकी मानणारे राज्यकर्ते आपल्याला हवे आहेत. विकास सगळ्यांनाच हवा आहे, पण तो शाश्वत असला पाहिजे व आपले जगणे सुकर करणारा असला पाहिजे. आपल्या आकलनानुसार या सगळ्या गोष्टींचा सखोल विचार करून आपल्या मनातील लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी अवश्य मतदान करा, असे पुन्हा एकदा सांगावेसे वाटते.

Recent Posts

वानखेडेवर धक्कादायक घटना, चोरांनी मारला डल्ला आणि न्यायदंडाधिकाऱ्यांना बसला फटका

मुंबई : भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत वानखेडे स्टेडियमवर एक धक्कादायक घटना घडली…

10 minutes ago

Shah Rukh Khan Wife Troll : शाहरूख खानच्या पत्नीच्या कपड्यांना बघून भडकले चाहते

मुंबई : बॉलीवूडचा किंग खान म्हणून शाहरुख खानची ओळख आहे. अनेकदा तो आणि त्याचे कुटुंब…

2 hours ago

Gaurav More: ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ गौरव मोरेचं स्वप्न पूर्ण; ही महागडी गाडी घेतली

मुंबई : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून स्वत:ची ओळख निर्माण करणारा 'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणजेच गौरव मोरे…

2 hours ago

Breaking News : मुख्यमंत्र्यांना जायचं होतं दिल्लीला पण उतरले…

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना विमान कंपनीच्या गैरव्यवस्थापनाचा चांगलाच फटका बसला. अब्दुल्ला…

2 hours ago

आईस्क्रीम कारखान्यातील धक्कादायक घटना, कामगारांना दिली अशी वागणूक की प्राणीही घाबरावेत !

छत्तीसगड : छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात आईस्क्रीम कारखान्यात एक धक्कादायक घटना घडली. कारखान्याच्या मालकाने चोरीच्या संशयावरुन…

3 hours ago

Viral News: ‘हे’ गाणे ऐकून लोक आत्महत्या करायचे; ६२ वर्षांनंतर बंदी हटवली!

मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…

4 hours ago