नवी दिल्ली : अर्जेंटिनाचा (Argentina) स्टार फुटबालपटू (Football Player) लियोनेल मेस्सी (Lionel Messi) याच्या भारतातील चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लियोनेल मेस्सी १४ वर्षानंतर भारतात खेळणार आहे. मेस्सी अखेरचा २०११ मध्ये भारतात खेळला होता. त्यावेळी कोलकाता येथील साल्ट लेक मैदानावर अर्जेंटिनाचा सामना व्हेनेझ्युएलाशी झाला होता. आता त्याच्या खेळाची जादु पुन्हा एकदा भारतात पाहायला मिळणार आहे. केरळचे क्रीडा मंत्री व्ही.अब्दुरहिमन (V. Abdurahiman) यांनी याबाबत माहिती दिली.
त्यांनी सांगितले की, दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचा अर्जेंटिना फुटबॉल संघ पुढील वर्षी आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी केरळमध्ये येईल. ते पत्रकार परिषदेत पुढे बोलताना म्हणाले की, हा सामना संपूर्णपणे राज्य सरकारच्या देखरेखीखाली होईल. या हाय-प्रोफाइल फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनासाठी सर्व आर्थिक साहाय्य राज्यातील व्यापारी करतील. या ऐतिहासिक फुटबॉल इव्हेंटचे आयोजन करण्याची क्षमता केरळकडे असल्याचा विश्वासही क्रीडा मंत्री व्ही.अब्दुरहिमन यांनी व्यक्त केला.
१३ वर्षांपूर्वी खेळला शेवटचा सामना
मेस्सी शेवटचा सामना २०११ मध्ये भारतात खेळला होता. कोलकाता येथील सॉल्ट लेक मैदानावर अर्जेंटिना विरुद्ध व्हेनेझ्युएला यांच्यात झालेला आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामना गोलशुन्य बरोबरीत सुटला होता. भारतात क्रिकेट हा लोकप्रिय खेळ असला तरी जागतिक फुटबॉल आयकॉन मेस्सीचा भारतात मोठा चाहता वर्ग आहे. विशेषतः केरळमध्ये फुटबॉल हा फार पूर्वीपासून लोकप्रिय खेळ राहिला आहे.