महायुतीच्या विजयाचा एल्गार

वैजयंती कुलकर्णी आपटे


'एक है तो सेफ है’चा नारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी महाराष्ट्रात अनेक मतदारसंघात जाहीर सभा घेत विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयाचा एल्गार केला. मुंबईत शिवाजी पार्क येथे झालेल्या जाहीर सभेत, तर युती सरकारच्या शपथविधीचे आमंत्रण दिले. दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे ही महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. ह्या विधानसभा निवडणुकीत व्होट जिहादला टक्कर देण्यासाठी हिंदूंमध्ये जागृती निर्माण करत आहेत. लोकसभा निवडणुकीत मविआ आणि इंडिया आघाडीने संविधान बदलणार असा चुकीचा प्रचार केल्याने त्याचा फटका भाजपा आणि महायुतीला बसला. पण आता हरियाणामध्ये झालेल्या विजयानंतर भाजपामध्ये उत्साह संचारला आहे आणि महाराष्ट्रातील विधान सभा निवडणुकीत प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत फुट पडून उद्धव ठाकरे ह्यांचे सरकार पाडून एकनाथ शिंदे ह्यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यात अमित शहा ह्यांचा मोठा वाटा होता. नंतर काही दिवसांनी शरद पवार ह्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पाडून अजित पवार ह्यांना उपमुख्यमंत्री करण्यामागेही अमित शहा ह्यांचीच रणनीती होती. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत या निर्णयावर मतदार काय कौल देतात यावर महायुतीचे भवितव्य अवलंबून आहे.


अमित शहा यांच्या पाठोपाठ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याही प्रचार सभा दणक्यात चालू आहेत. ‘कटेंगे तो बटेंगे’असा नारा देत योगिजींच्या माध्यमातून धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न चालू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर धर्म युद्धास तयार रहा असा इशाराच दिला आहे. एकूणच महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने खूपच गांभीर्याने घेतलेली दिसते. मोदी आणि अमित शहा पाठोपाठ केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, शिवराजसिंह चौहाण, नड्डा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत असे अनेक स्टार प्रचारक ह्या निवडणुकीत अनेक ठिकाणी जाहीर सभा घेत आहेत. यामुळे नक्कीच भाजपाच्या बाजूने वातावरण निर्मिती होत आहे. अमित शहा यांनी तर गेल्या ८ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात प्रचाराचा धडाका लावला आहे. अनेक ठिकाणी रोड शो आणि जाहीर सभा घेतल्या. शिराला, कऱ्हाड, सांगली, इचक्करंजी, यावल, मलकापूर, बुलढाणा, अमरावती, धुळे, चाळीसगाव, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर अशा पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मुंबईतील घाटकोपर येथे अमित शहा यांच्या जाहीर सभा झाल्या. मुंबईत तर पक्षाचा जाहीरनामा त्यांच्याच हस्ते प्रसिद्ध करण्यात आला, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धुळे, नाशिक, अकोला, नांदेड, चिमुर, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, रायगड आणि मुंबई अशा उत्तर आणि दक्षिण महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोंकण, खारघर आणि मुंबई अशा जाहीर सभा झाल्या. एकीकडे विकासाचा नारा, तर दुसरीकडे इंडिया आघाडी म्हणजेच महाविकास आघाडीवर टीका अशा दुहेरी पद्धतीने महाराष्ट्रात प्रचार चालू आहे. पंतप्रधान मोदी ह्यांचे लक्ष्य राहुल गांधी आणि कोंग्रेस आहे, तर अमित शहा उद्धव ठाकरे यांनी भाजपाशी केलेल्या गद्दारीवर सडकून टीका करतात. गेल्या अडीच वर्षांच्या काळात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने विकासाची अनेक कामे केली हे तर विरोधकही नाकारू शकत नाही. अटल सेतू, कोस्टल रोड, मुंबईत आणि पुण्यात मेट्रो रेल्वेचे अनेक मार्ग, वाढवण बंदर, नवी मुंबई विमानतळ अशी अनेक कामे केली. मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाचे म्हणजे टोल माफीचा मोठा निर्णय शिंदे सरकारने घेतला आणि सगळ्यात महत्त्वाची आणि लोकप्रिय योजना ठरली ती लाडकी बहीण.



आज अडीच कोटी महिलांच्या खात्यात आतापर्यंत साडेसात हजार रुपये जमा झाले आहेत. महाराष्ट्रात महिला मतदारांची संख्या ५० टक्क्याहुन अधिक आहे, त्यामुळे ह्या योजनेचा फायदा महायुतीला नक्कीच होईल. या प्रचारात केवळ महाराष्ट्रातील मुद्यांची चर्चा आहे असे नाही, तर जम्मू-कश्मीरमधील ३७० कलम हटवणे हा मुद्दाही चर्चेत आहे. जम्मू-कश्मीर विधानसभेत हे कलम पुन्हा लागू करण्याचा ठराव समत झाला. त्यामुळे मुसलमानांचे मशिदीतून महाविकास आघाडीला मतदान करण्याचे फतवे निघताहेत. याशिवाय राहुल गांधी जाती-जातीमध्ये तेढ पसरवत आहेत. मागासवर्गीय, अनुसूचीत जाती, जमाती इतर मागासवर्गीय यांच्यामध्ये फूट पाडत आहेत असा आरोप मोदी यांनी केला आहे. तसेच राहुल गांधी यांना हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि वीर सावरकर यांचे नाव सन्मानाने घ्यायला अजूनही उद्धव ठाकरे यांनी भाग पाडले नाही असेही मोदी म्हणाले. जाती आणि धर्माच्या नावावर लोकांना फसवत राहायचे हा तर काँग्रेसचा अजेंडा आहे, असा आरोपही मोदी ह्यांनी केला. महाविकास आघाडीतर्फे राहुल आणि प्रियंका गांधी यांच्यासह मल्लिकार्जुन खरगे हेही निवडूक प्रचारात उतरले आहेत. शरद पवार तर या वयातही महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. एकूणच ही निवडणूक म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात अटीतटीची होत आहे. ह्या निवडणुकीत नक्की कोण जिंकणार हे निवडणूक विश्लेषकही सांगू शकत नाही.

Comments
Add Comment

कांद्याच्या दरासाठी आणखी किती काळ संघर्ष?

स्थिर निर्यात धोरण स्वीकारण्याची सध्या गरज आहे. निर्यात धोरण धरसोड वृत्तीचे असल्यामुळे देखील कांदा भाव खाली येत

मोदींची दूरदृष्टी: मिशन कर्मयोगी

सार्वजनिक प्रशासनाच्या क्षेत्रात भारत काहीतरी अभूतपूर्व करण्याचा प्रयत्न करत आहे. तो केवळ अधिकाऱ्यांच्या

कोकणात निवडणुकीची मोर्चेबांधणी...!

कोकणातील चारही जिल्ह्यांचा विचार करताना भारतीय जनता पक्ष, शिवसेना एकनाथ शिंदेगट या दोन पक्षांचे प्राबल्य आहे.

नितीन गडकरींनीच केली डॉ. जिचकारांची कदर

नागपूरच्या अमरावती महामार्गावरील बोले पेट्रोल पंप चौक ते विद्यापीठ कॅम्पस चौकपर्यंतच्या उड्डाणपुलाचे

जातीपातीच्या लढ्यात मराठवाडा भरकटतोय!

जातीपातीचे राजकारण हे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील जुने सत्य आहे. गेल्या अनेक दशकांपासून राजकीय पक्षांनी

मोहन भागवत : राष्ट्रनिर्माणाचा मार्गदर्शक

माझे मोहनजींच्या कुटुंबाशी अगदी जवळचे संबंध आहेत. मोहनजींचे वडील कैलासवासी मधुकरराव भागवत यांच्यासोबत मला