प्रा. प्रतिभा सराफ
बऱ्याच वेळा प्रयत्न करूनही ‘बाली’ला जाण्याचा योग काही आला नाही; परंतु त्यानिमित्ताने बालीविषयी बऱ्याच गोष्टी वाचनात आल्या होत्या. कोणत्याही प्रवासाला जाण्याआधी मी त्या ठिकाणाचा खूप अभ्यास करते जेणेकरून त्या प्रवासात छोट्या-मोठ्या गोष्टी आपल्याकडून राहून जात नाहीत. कालच माझ्या बीएस्सीच्या मित्राचा बालीवरून फोन आला तो एका डेस्टिनेशन वेडिंगसाठी बालीला गेलेला आहे. मी त्याला तिकडच्या वातावरणाविषयी विचारत असताना तो म्हणाला की, जर तुला शक्य असेल तर तू या ठिकाणी मार्चमध्येच ये आणि त्याचे कारणही मला त्यांनी सांगितले ज्याविषयी मला हा लेख लिहावासा वाटला. भारतातील सर्व जाती-धर्मात तसेच सर्व देशांमध्ये सुद्धा नवीन वर्ष खूप धुमधडाक्यात साजरे केले जाते असे आत्तापर्यंतचे माझे ज्ञान होते. या धुमधडाक्यामध्ये मित्रपरिवाराचे एकत्र भेटणे आणि त्यानिमित्ताने खाण्यापिण्याच्या पार्ट्या, रंगीत दिव्यांनी घर सजावट, नाचगाणी असा जल्लोष करतात हे माहीत होते; परंतु ‘बाली’ या ठिकाणी नवीन वर्ष हे फार वेगळ्या प्रकारे साजरे केले जाते हे कळल्यावर खूप नवल वाटले शिवाय ही चांगली गोष्ट आपणा सर्वांना सांगावीशी वाटली.
बालीच्या नववर्ष दिनाला न्येपी (Nyepi) असे नाव आहे. ‘बाली डे ऑफ सायलेन्स’ म्हणूनही ओळखले जाते. ‘साका’ हे नवीन वर्षाच्या कॅलेंडर मार्च महिन्यातल्या पौर्णिमेपासून सुरू होते. ते त्यांचे नवीन वर्ष. हे नवीन वर्ष मार्चमधल्या कोणत्याही दिवशी असू शकते. कारण ते पौर्णिमेवर अवलंबून आहे. त्यामुळे त्याची तारीख ही ठरलेली नसते ती पुढे मागे होऊ शकते. दिव्याची रोशनाई, संगीत किंवा गोंगाट असे काहीच त्या दिवशी त्या बेटावर नसते. म्हणजे अक्षरशः चोवीस तास बेट ठप्प होते म्हणजे काय? तर छोट्या-मोठ्या रस्त्यावरच्या वाहनांपासून ते विमान वाहतूकपर्यंत त्यादिवशी सगळेच बंद असते. त्यादिवशी आपण साधे रस्त्यावरून फिरायला जायचे नसते असा संकेत आहे. ‘सोशल मीडिया’ वापरावरही प्रत्येक जण स्वतःहूनच बंदी घालतो. तो त्यांचा सार्वजनिक सुट्टीचा दिवस असतो आणि त्यानिमित्ताने शाळा कॉलेजेसपासून ऑफिसेस तसेच दुकाने इत्यादी सर्वच बंद असते. प्रत्येक माणूस आपापल्या घरात बसतो. चिंतन, ध्यान आणि आत्मशुद्धी करण्याची ही वेळ असते.
न्येपी हा एक अत्यंत आध्यात्मिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे, असे ते मानतात. त्यात सहभागी होणे हा खरोखरच आयुष्यातला एक महत्त्वाचा आणि वेगळा अनुभव आहे. हे तुम्हाला दैनंदिन जीवनातील गोंगाटापासून थोडे बाजूला होऊन आतल्या शांततेशी जोडण्यासाठी वेळ देणारा सण आहे. बाली या बेटावरील सर्व दुष्टात्मे संपून जावोत आणि चांगल्या आणि वाईट गोष्टींचा बोध प्रत्येक माणसाला होवो अशी त्यामागची भावना असते. एकंदरीत सर्व स्तब्धतेमुळे निसर्गाचा समतोल साधला जातो. त्यादिवशी २००० टन इतक्या मोठ्या प्रमाणात कार्बन डाय-ऑक्साइड कमी वातावरणात फेकला जातो. ६० टक्के विजेची बचत होते. पाच लाख लिटर डिझेलची बचत होते. या दिवशी पक्षी, प्राणी मनसोक्त विहारतात. रात्रीच्या वेळी अनेक तारे लुकलुकताना स्पष्ट दिसतात. कारण वातावरण प्रदूषणमुक्त असते. प्रत्येक माणूस घरातच बसून आपल्या आत्म्याच्या शुद्धीकरणासाठी ध्यान करतात. बालीच्या समृद्ध संस्कृती आणि परंपरांचा अनुभव पर्यटकांनाही घेता येतो. त्यामुळे माझ्या बालीची पुढची सहल ही सहसा बालीच्या नववर्षादरम्यान मी आखण्याचे ठरवले आहे. शरीराचे शुद्धीकरण आपण रोजच करतो पण मनाचे शुद्धीकरणही महत्त्वाचे आहे. या पलीकडे जाऊन बाली येथील रहिवाशांना वाटते की, आत्म्याच्या शुद्धीसाठी ‘आत्मचिंतन’ करण्यासाठीही वेळ असावी आणि यानिमित्ताने जगातल्या सर्व माणसांना या दिवशी आपल्याकडूनच आपण माफ करून टाकावे. हे त्यांचे अध्यात्म खरोखरी माझ्या मनाला खूप भावले. भारतात असा ‘शांती दिवस’ आपल्याला साजरा करता येईल का? असा मनात विचार आला. कोणतीही गोष्ट अशक्य नसते; परंतु ती शक्य करण्यासाठी अनेक चांगल्या विचारांच्या माणसांनी एकत्र येऊन विचार करण्याची गरज असते, तर आपण तसा विचार करायला काय हरकत आहे?
pratibha.saraph@ gmail.com