
राजश्री वटे
अत्तर... नुसतं उच्चारलं तरी त्याचा घमघमत येणारा सुगंध श्वासातून हृदयात शिरतो... भरभरून श्वासात भरून घ्यावा... रोमारोमात दरवळत जातो! राजारजवाड्यांच्या काळापासून अत्तराचं फार महत्त्व आहे. राणीच्या शृंगारात, शाहीस्नानात अत्तर अग्रगण्य असतं!! पूजेच्या तबकात अत्तर हे मानाचं. देवाला उष्णोदक झाले की, अत्तर लावलं जातं. पूर्वी फक्त श्रीमंत लोकं अत्तर वापरत असत. अत्तरामध्ये भिजलेला कापूस म्हणजे अत्तराचा फाया कानाच्या वरच्या दुमडीत खोचून ठेवत, आपला श्रीमंती थाट असा घमघमत मिरवत असत... बाजूने गेलं तरी... अहाहा... घेतच राहावा सुगंध भरभरून!! लहानशा सुबक, अनेक आकाराच्या बाटल्या असत अत्तराच्या... अंगठ्या एवढ्या... ‘दरबार’ असं लिहिलेलं असे त्यावर, अतिशय सुंदर दिसायच्या, त्याला सोनेरी झाकण... श्रीमंती रूप!! खस, हिना, केवडा, दवणा हे शाही सुगंध त्या एवढ्याशा बाटलीत जपून ठेवले जात... लग्नाच्या मांडवात अत्तराचा गंध वातावरणात उत्साह, आनंद द्विगुणित करतो, पूर्वी अत्तर लावण्याची मक्तेदारी जणू पुरुषांचीच... फक्त हळदी-कुंकू प्रसंगीच काय ते स्त्रियांच्या हाताला अत्तर लावले जात असे... तेवढाच तिचा गंधाळलेला सुगंधी क्षण!! त्याकाळी स्वारी दारात पादत्राण काढतांनाच कळून जायचं, येणारा अत्तराचा सुगंध तिला बरंच काही सांगून जायचा... आज काय बाजीराव... XXX कडे? जीवात काहूर उठायचं तिच्या....

तुझ्यात व्यस्त राहतो - डॉ. मनोज वराडे तुझ्यात व्यस्त राहतो अजूनही अजूनही तुझा वसंत मागतो अजूनही अजूनही! सुखावतो सखे मला तुझा विचार सारखा तुला कवेत ...
हृदयाला अत्तराच्या कुपीची उपमा म्हणूनच दिली आहे की, कुठलीही गोष्ट जपून ठेवावी हृदयात, ती कायम राहते तिथे दरवळणाऱ्या अत्तरासारखी! स्त्रीच्या संदूकमध्ये एका मखमली पेटीत छोटीशी अत्तराची बाटली कायम जपून ठेवलेली असायचीच, तिच्या भरजरी वस्त्रांना अत्तराचा गंध लपेटलेला असायचा, संदूकमधून बाहेर काढलेल्या वस्त्राला असलेला अत्तराचा गंध जुन्या आठवणींशी सलगी करायचा... मग गंधाळलेला वाराही हलकेच लाजणार... आता तर अनेक महागडे परफ्युमस उपलब्ध आहेत तरीसुद्धा अत्तराची सर कशालाच नाही! मात्र एक अपवाद... पहिल्या पावसाच्या सरीने भिजलेल्या मातीचा सुगंध... मृदगंध...!! अत्तर देखील फिकं त्यापुढे...