रमेश तांबे
एक होता मुलगा त्याचे नाव शिवा. शिवा शाळेतला एक हुशार विद्यार्थी होता. दरवर्षी वर्गातून तोच पहिला येणार ही गोष्ट नेहमीचीच असायची. खरे तर शिवा खूप अभ्यास करायचा. दिवसरात्र प्रश्नांची उत्तरे पाठ करत बसायचा. अभ्यासाशिवाय इतर कुठल्याही गोष्टीत त्याला रस नव्हता. तो ना कधी मैदानात दिसायचा, ना कुठल्या सांस्कृतिक कार्यक्रमात! या गोष्टीत वेळ घालवणे म्हणजे वेळ वाया घालवणे असे त्याला वाटायचे. त्यामुळे अभ्यास एके अभ्यास. असे करून तो प्रथम क्रमांक अगदी सहज मिळवायचा. पण नेहमीच मिळणाऱ्या यशामुळे तो खूप गर्विष्ठ बनला होता. वर्गात आपणच ते काय हुशार असे त्याला वाटू लागले. तो इतरांना तुच्छ समजू लागला. त्याच्या वागण्या-बोलण्यात अहंकार जाणवू लागला. वाळिंबे सरांच्या ही गोष्ट लक्षात आली होती. वाळिंबे सर शाळेतील एक जुने जाणते शिक्षक होते. शाळेच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. शिवासारखे असंख्य विद्यार्थी त्यांच्या हाताखालून गेले होते. त्यामुळे “मीच हुशार” हे खूळ शिवाच्या डोक्यातून कसे बाहेर काढायचे याची वाळिंबे सर वाट पाहत होते.
थंडीचे दिवस सुरू झाले की, शाळेच्या सहली निघायच्या. कधी लेण्या बघायला, तर कधी गड किल्ल्यावर चढाई करण्यासाठी! यावर्षी जुन्नर जवळच्या शिवनेरी किल्ल्यावर सहल जाणार होती. नेहमीप्रमाणे मुलांचा उत्साह टिपेला पोहोचला. सगळ्यांनी सहलीसाठी नावे दिली. पण शिवाचे नाव काही आले नाही. वाळिंबे सरांनी शिवाच्या आई-बाबांना शाळेत बोलावून घेतले. पैशाची काहीच समस्या नव्हती. पण शिवाच सहलीला जाण्यास तयार नव्हता. खरे तर शिवाच्या आई-बाबांनाही शिवा सारखा पुस्तकात डोके खूपसून बसतो हे पटत नव्हते. मुलांना सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजेत. खेळ, नाच, गाणी, दुसऱ्याच्या मदतीला धावणे या गोष्टीसुद्धा शिवाला आल्या पाहिजेत असे त्यांना वाटायचे. पण तो कशातही भाग घेत नसे. उलट त्याचा कल इतरांना कमी लेखण्याकडेच असायचा. यामुळे शिवाचे आई-बाबादेखील चिंताक्रांत झाले होते. म्हणूनच शिवाच्या मर्जी विरुद्ध त्याला आई-बाबांनी सहलीला पाठवले. मुलांमध्ये तो खेळेल, रमेल या उद्देशाने! सकाळी सात वाजता शाळेतून तीन गाड्या निघाल्या. पाच तासातच त्या शिवनेरीच्या पायथ्याशी पोहोचल्या. एवढ्या वेळात मुलांनी गाडीत गाणी म्हटली, भेंड्या खेळल्या, नाच केला, एकमेकांची टर उडवली, हास्यविनोद केले, गप्पा मारल्या. पण शिवा मात्र एखाद्या शिष्टासारखा बसून राहिला. वाळिंबे सर शिवाकडे, त्याच्या वागण्याकडे लक्ष ठेवून होते. एवढ्या प्रवासात त्याच्या चेहऱ्यावर “मी कोणीतरी वेगळा आहे” हा भाव सरांना सतत जाणवत होता.
दुपारी बारा वाजता आडवाटेने शिवनेरी गडावर चढाई सुरू झाली. मुले भराभर गड चढू लागली. पण शिवा मात्र सर्वात मागे राहिला. त्याला दगड-धोंड्यात चालणे जमत नव्हते. गडावर चढावे कसे याचे त्याला अजिबात ज्ञान नव्हते. अर्ध्या वाटेपर्यंत शिवा दमून गेला आणि एकटाच एका दगडावर बसून राहिला. आपण एकटेच मागे राहिलो हे लक्षात येताच तो पुन्हा उठला पण घाईघाईने चढण्याच्या नादात शिवाचा पाय घसरला. तो घसरत घसरत खाली जाऊ लागला. शिवा पडला शिवा पडला एकच कल्ला झाला. तेव्हा त्याच्या वर्गातला मिलिंद नावाचा टवाळ आणि अगदी ढ मुलगा शिवाच्या मदतीला धावला. कशाचीही पर्वा न करता तो झपझप खाली आला. एका झाडाच्या फांदीत अडकलेल्या शिवाला त्याने हात दिला. शिवा अगदी रडवेला झाला होता. त्याच्या हातापायांना खरचटले होते. नाका तोंंडातून रक्त वाहत होते. मिलिंदने लगेच बॅगेतून प्रथमोपचाराचा डबा बाहेर काढला. त्याच्या जखमा त्यांने पुसल्या. तेवढ्या वेळात वाळिंबे सरदेखील पोहोचले. तोपर्यंत
मिलिंदने शिवाच्या जखमांवर बँडेज बांधून त्याला पाठीवर घेतलेसुद्धा! वाळिंबे सर शिवाला म्हणाले, “अरे शिवा, तुला चालेल ना रे मिलिंदने पाठीवर घेतलेले. कारण तुला तर माहीत आहे तो फारच टवाळ आणि अगदी ढ मुलगा आहे.” शिवाच्या डोळ्यांत पाणी आले. तो म्हणाला, “सर माफ करा मला. केवळ पुस्तकी ज्ञान म्हणजेच सर्व काही असे मी समजत होतो. पण तसे नव्हे. हे या प्रसंगाने मला शिकवले. दुसऱ्याच्या मदतीला धावणे, त्यांची सेवा करणे या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत सर! प्रत्येक जण हुशारच असतो. फक्त ज्याचे त्याचे आवडीचे क्षेत्र वेगळे! इतकाच तो काय फरक!” शिवाचे विचार ऐकून वाळिंबे सरांना समाधान वाटले. “आजची सहल खूपच यशस्वी झाली.” असे म्हणत सर गड चढू लागले.