Saturday, May 24, 2025

किलबिलसाप्ताहिक

गर्विष्ठपणा

गर्विष्ठपणा

एक होता मोर,
मोठा बढाईखोर
म्हणे पक्षांच्या जगात,
मीच आहे थोर


नदी किनारी जायचा,
प्रतिबिंब पाण्यात पाहायचा
स्वतःचीच स्तुती,
स्वतः करत राहायचा


एके दिवशी त्याला,
करकोचा दिसला
त्याकडे पाहून मोर,
तुच्छतेने हसला


म्हणे तुझ्या पंखांकडे,
कुणीच न पाही
डौलदार पिसारा माझा,
लक्ष वेधून घेई


मोराच्या या बोलण्यावर,
करकोचा म्हणाला
तुझा पिसारा सुंदर आहे,
माहीत आहे मला


पण, जरी पंख साधे माझे,
राहणी माझी साधी
पारधी येतो पकडण्यासाठी,
उडतो तुझ्या आधी


एवढं बोलून करकोचा,
उंच उंच उडाला
मोर मात्र खजिल होऊन,
नुसता बघत राहिला...



काव्यकोडी - एकनाथ आव्हाड


१) लहानपणापासून त्यांना
क्रिकेटची फार आवड
फलंदाजी, गोलंदाजी
क्षेत्ररक्षणात वरचढ


रमाकांत आचरेकर
त्यांना लाभले गुरू
मास्टर ब्लास्टर
हा कोण खेळाडू?


२) मुळशी सत्याग्रहाचे
नेतृत्व त्यांनी केले
‘माणिकतोला बाग’ कटात
सामील ते झाले


क्रांतिकार्यातही त्यांची
होती सदा धाव
या सेनापती बापटांचे
काय पूर्ण नाव ?


३) मूकनायक नावाचे
पाक्षिक त्यांनी काढले
शिका, संघटित व्हा,
संघर्ष करा सांगितले


‘वाचाल तर वाचाल’
हे जगास पटवून दिले
भारतीय घटनेचे
कोण शिल्पकार झाले ?

Comments
Add Comment