पूनम राणे
एकदा एक माता मंगेशाच्या दर्शनासाठी गेल्या असता गोमुखातून त्यांच्या ओंजळीत एक अखंड सुपारी आणि बेलपत्र आले. आपल्याला हा प्रसाद मंगेशाकडून प्राप्त झाला आहे. अशी श्रद्धा मातेच्या ठाई निर्माण झाली आणि पुढे कन्यारत्न जन्माला आले. बरं का मुलांनो, एकदा एक गंमतच झाली. नाटकात नारदाचे काम करणारा नट अचानक आजारी पडला. प्रयोगाची वेळ झाली होती, आता नारदाचे काम कोण करणार? ‘‘नाटकात संवादासोबत गाणी म्हणायची होती. अशा तंग वातावरणात एक चिमुरडी पुढे आली. आणि म्हणाली ,” मी, मी करेन नारदांचे काम!” अगं पण नाटकात संवादांसोबत गाणीही म्हणायची आहेत. मला पाठ आहेत. गाणे आणि संवादही. मी काम करेन आणि वन्समोअर घेईन. भगवे कपडे, हातात लहानसा तंबोरा, डोक्यावर केसाचा बुचडा, गळ्यात माळ, पायात खडावा, अशा थाटात रंगमंचावर प्रवेश करून आत्मविश्वासाने संगीत सौभद्र नाटकात वन्स मोअर तिने घेतलाही. असाच एक प्रसंग, वडिलांनी या मुलीला जवळ बोलवून तंबोऱ्यावर हात ठेवून म्हणाले, ‘‘मी तुम्हा मुलांना काही देऊ शकलो नाही. पण हा तंबोरा तुझ्या हाती देतोय.” हा आपल्या घराण्याचा साधू पुरुष आहे. यावर धूळ पडू देऊ नकोस .”
असा फार मोठा संगीताचा वारसा वडिलांनी तिला बहाल केला. “बाबा हे मी प्राणप्रणाली जपेन, तुमचे नाव मोठे करेन.”
वय अवघे बारा वर्षांचे. पितृछत्र हरपले. चार भावंडे आणि आईची जबाबदारी त्यांच्यावर आली. कल्पवृक्ष कन्येसाठी, सोडूनिया बाबा गेला, उक्तीनेच संगीताचा वारसा त्यांनी जपला. काही प्रसंगी दारिद्र्याचे चटके, अपमानाचे फटकेही त्यांनी अनुभवले. पण जिद्द सोडली नाही. वयाच्या अवघ्या पंधरा वर्षी अखंड धावपळ १६, १७ तास काम करून येणाऱ्या प्रसंगाला सामोरे गेल्या. सभोवतालच्या परिस्थितीवर तक्रार न करता परिस्थितीवर स्वार होऊन भावंडाची जबाबदारी हिमतीने पेलली. “टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही.’’ याचे उत्तम उदाहरण म्हणजे पांढऱ्या रंगाची, लाल निळ्या काठाची, पांढरी शुभ्र साडी. लांब दोन वेण्या, चेहऱ्यावरचे मोकळे हसू, तजेलदार डोळे अशा आपल्या स्वरमयी लतादीदी.
‘‘गगन सदन तेजोमय, घन:श्याम सुंदरा… श्रीधरा अरुणोदय झाला,’’ या भूपाळीने अवघ्या महाराष्ट्राला जागे करणारी, अगणित गीते विविध भाषेतून गाणाऱ्या, अनेक चित्रपटांमध्ये, नाटकांमध्ये काम करणाऱ्या महाराष्ट्र कन्या. गायन, अभिनय, चित्रकला, फोटोग्राफी, दागिने जमविणे, क्रिकेट नेमबाजी, फुटबॉल खेळणे हे त्यांचे अत्यंत आवडते खेळ. त्यांचे प्राण्यांवर आणि वृक्षांवर प्रेम होते. अनेक पुरस्काराने त्या सन्मानित होत्या. आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ दीनानाथ मंगेशकर रुग्णालय बांधून समाजाचे ऋण फेडले. आनंदवनच्या विकासासाठी बाबा आमटे यांना ३४ लाख रुपयांचा निधी अर्पण केला. श्रीकृष्णाची बासरी, मीरेची एकतारी, तुकारामांची विणा यांचा त्रिवेणी संगम, दीदींची गाणी ऐकताना अनुभवायला येतो. आणि या आनंदघनात रसिक डुंबून जातो.