मुंबई: भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या घरी खुशखबर आली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार दुसऱ्यांदा बाबा बनल्याचा दावा केला जात आहे. त्याची पत्नी रितीका सजदेहने मुलाला जन्म दिला आहे. रोहित आणि रितीकाबाबत सोशल मीडियावर चाहत्यांनी पोस्ट शेअर केली आहे. दरम्यान, आतापर्यंत रोहित अथवा रितीका यांच्याकडून याबाबत कोणतेही विधान करण्यात आलेले नाही.
टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. यासाठी विराट कोहलीसह अनेक वरिष्ठ खेळाडू ऑस्ट्रेलियात पोहोचले आहेत. मात्र रोहित अद्याप गेलेला नाही. रोहितने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे सुट्टीची मागणी केली होती. रोहितची पत्नी रितीका मुलाला जन्म देणार होती. आता मिडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की रितीकाने मुलाला जन्म दिला आहे. मात्र अधिकृत घोषणा होणे अद्याप बाकी आहे.
रोहित आणि रितीकाने २०१५मध्ये लग्न केले होते. रितीकाने डिसेंबर २०१८मध्ये मुलीला जन्म दिला होता. मुलीचे नाव समायरा आहे. रोहित आणि रितीकाची लव्हस्टोरी अतिशय रंजक होतती.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघ पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेचा पहिला सामना २२ नोव्हेंबरला पर्थमध्ये खेळवला जाईल. जर सगळं काही व्यवस्थित असेल तर रोहित या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाला पोहोचू शकतो.