राज चिंचणकर
मराठी रंगभूमीला तब्बल पावणेदोनशे वर्षांची परंपरा आहे आणि या कालावधीत संगीत नाटकांपासून विविध पठडीतल्या अगणित नाट्यकृती रंगमंचावर दृश्यमान होत आल्या आहेत. गेल्या शंभर-दीडशे वर्षांपूर्वीच्या नाट्यकृती रसिकांच्या मनात आजही ठाण मांडून बसल्या आहेत आणि अनमोल ठेवींप्रमाणे मायबाप रसिकांनी हृदयाच्या कप्प्यात त्या जपून ठेवल्या आहेत. सध्याच्या काळात अनेक नवीन नाटके रंगभूमीवर येत असली, तरी ‘जुने ते सोने’ म्हणत रसिकांच्या तीन पिढ्यांच्या मनात रुंजी घालणाऱ्या नाटकांनाही तितकीच मागणी आहे. हे लक्षात घेत, काही नाटकमंडळी अनेक जुनी नाटके रंगभूमीवर पुन्हा आणताना दिसतात. अशा पुनरुज्जीवित नाटकांना आजही मिळणारा उदंड प्रतिसाद त्या नाटकांचे महत्त्व अधोरेखित करत आहे. काही अपवाद सोडल्यास, सध्या अनेक नवीन नाटकांचे प्लॅन्स व्यावसायिक दृष्ट्या विचार करायला लावणारे असताना, पुनरुज्जीवित नाटकांना मात्र तिकीटबारीवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. साहजिकच, पुनरुज्जीवित नाटकांवर रंगदेवता प्रसन्न असल्याचे स्पष्ट होत आहे.
मराठी नाट्यसृष्टीत एक सूर कायम आळवला जात असतो आणि तो म्हणजे नवीन ‘स्क्रिप्ट’ सहज उपलब्ध होत नाहीत. ज्या प्रमाणात नवीन लेखक उदयास यायला हवेत; तसे ते येत नसल्याने रंगभूमीवर सातत्याने नवीन नाटकांचा अभाव जाणवतो. नव्या दमाचे काही लेखक, नव्या पद्धतीच्या ‘स्क्रिप्ट’ लिहितातही आणि त्यांची नाटके रंगभूमीवर येतातही. मात्र तरीही नवीन संहिता हव्यात, हा नाट्यसृष्टीतला सूर काही कमी होत नाही. कदाचित, याचा परिणाम म्हणून काही काळाच्या अंतराने जुन्याजाणत्या रंगकर्मींनी गाजवलेली नाटके पुन्हा रंगभूमीवर ‘एन्ट्री’ घेताना दिसतात. नव्या पिढीच्या रंगकर्मींनाही जुन्या नाटकांची मोहिनी पडावी आणि त्यातला काळाचा संदर्भ तसाच ठेवत त्यांनी ती आजच्या काळात रंगभूमीवर आणावीत; यात खरे तर त्या नाटकांच्या लेखकांचा सन्मान आहे. त्या काळची भाषा, शब्दलालित्य, साहित्य, संवादांचा बाज, गद्यासह पद्याचा असलेला आविष्कार, श्रेष्ठ रंगकर्मींनी अजरामर करून ठेवलेल्या त्या-त्या नाटकांतल्या भूमिका आणि या सगळ्याचा परिपाक म्हणजे त्या नाटकांना लाभलेली उदंड लोकप्रियता आजच्या काळातल्या नाटकमंडळींनाही खुणावत राहते. साहजिकच, नव्याला हात घालण्यासोबतच जुनी रसिकप्रिय नाटके रंगभूमीवर आणली जातात. या सगळ्यात त्या नाटकांचे महत्त्व अधिकच ठळकपणे उठून दिसते आणि नाट्यसृष्टीत त्या ज्येष्ठ व श्रेष्ठ रंगकर्मींनी वर्षानुवर्षे करून ठेवलेल्या कार्यासाठी आपसूक हात जोडले जातात. रंगभूमीवर सध्या सादर होत असलेल्या पुनरुज्जीवित नाटकांमध्ये जुनी नटमंडळी आणि नवे कलावंत हातात हात घालून रमलेले दिसतात. नव्या नटसंचातली ही नाटकेही रसिकांच्या पसंतीस उतरलेली दिसतात. अनेक नाट्यसंहिता जरी जुन्या असल्या, तरी कलावंत व दिग्दर्शक यांना त्यात वेगवेगळे प्रयोग करण्यास मिळतात. काही नाटकांचा अपवाद वगळता आजही नाट्यगृहात जाऊन नाटकांचा आस्वाद घेण्यात मध्यमवयीन रसिकांचीच गर्दी अधिक होते. त्यामुळे या पिढीच्या पसंतीला उतरतील अशी नाटके रंगभूमीवर आणण्याकडे नाट्यनिर्मात्यांचा सर्वसाधारण कल दिसतो. त्याचाही परिणाम पुनरुज्जीवित नाटके नव्याने आणण्यावर होतो आणि रंगभूमीवर पुनरुज्जीवित नाटकांची नव्याने नांदी होत राहते.
तिकीटबारीचा विचार करतानाही, पुनरुज्जीवित नाटकांना उत्तम प्रतिसाद असल्याचे दिसून येते. मराठी रंगभूमीवर अनेक नाट्यकृती ‘माईलस्टोन’ म्हणून ओळखल्या जातात आणि त्यांनी रसिकांच्या मनात कायमस्वरूपी जागा निश्चित केली आहे. या नाटकांना अविस्मरणीयतेचे वरदान लाभल्याने ही नाटके ‘ऑल टाइम हिट’ ठरली आहेत. साहजिकच, पुनरुज्जीवित नाटकांसाठी रंगभूमीवर आजही मनाचे पान मांडलेले दिसते. ही नाटके कधीही रंगभूमीवर आली; तरी त्यांना चांगलाच प्रतिसाद मिळतो. साहजिकच, या नाटकांचे प्रयोग लावण्यासाठी निर्माते पुढे सरसावतात. आजही रंगभूमीवर पुनरुज्जीवित नाटके त्यांचा आब राखून असल्याचे दिसून येते. मायबाप रसिकांचे मराठी नाटकांवर उदंड प्रेम आहे आणि हे लक्षात घेता नवीन नाटकांच्या स्वागतासह, पुनरुज्जीवित नाटकांवरही रंगदेवता कायम प्रसन्न राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे.