Thursday, June 19, 2025

Prime Minister Modi : पंतप्रधान मोदी विदेश दौऱ्यावर रवाना! नायजेरिया, ब्राझील आणि गयाना या देशांना भेटी देणार

Prime Minister Modi : पंतप्रधान मोदी विदेश दौऱ्यावर रवाना! नायजेरिया, ब्राझील आणि गयाना या देशांना भेटी देणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Modi) शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास नायजेरियाला रवाना झाले. त्यांचा हा दौरा ५ दिवसांचा असेल. यावेळी ते नायजेरिया, ब्राझील आणि गयाना या देशांना भेट देणार आहेत. ब्राझीलमध्ये १९ व्या जी-२० शिखर परिषदेत ते सहभागी होतील. तर नायजेरिया आणि गयाना या देशांच्या राष्ट्रपतींनी दिलेल्या निमंत्रणामुळे पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन्ही देशांना भेट देत आहेत.


राष्ट्रपती अहमद टिनुबू यांच्या निमंत्रणावरून नायजेरियाला पहिल्यांदाच भेट देत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. भारत-नायजेरिया द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर त्यांच्यात चर्चा होईल. यानंतर पंतप्रधान मोदी राजधानी अबुजामध्ये भारतीय समुदायाच्या लोकांनाही संबोधित करतील. नायजेरियामध्ये १५० हून अधिक भारतीय कंपन्या आहेत, ज्यांची उलाढाल २ लाख कोटींहून अधिक आहे. नायजेरियातील भारतीय समुदायाच्या लोकांना भेटण्यास उत्सुक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.


त्यानंतर ब्राझीलमध्ये, १९ व्या जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्यावर्षी भारताने जी-२० शिखर परिषदेचे यशस्वी आयोजन केले होते. यंदा ब्राझील या शिखर परिषदेचे आयोजन करत आहे. शिखर परिषदेत अनेक नेत्यांसोबत द्विपक्षीय चर्चा करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे १८ आणि १९ नोव्हेंबर रोजी रिओ दी जानेरो येथे होणाऱ्या शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत.


१९ नोव्हेंबर रोजीच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Modi) गयाना या देशाला भेट देणार आहेत. राष्ट्रपती मोहम्मद इरफान अली यांच्या निमंत्रणावरून गयानाला भेट देत असल्याचे त्यांनी सांगितले. वारसा, संस्कृती आणि मूल्यांवर आधारित संबंधांना धोरणात्मक दिशा देण्यासाठी गयाना दौऱ्यात चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. गयाना दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या भारत-कॅरिकॉम शिखर परिषदेतही सहभागी होणार आहेत, असे त्यांनी सांगितले. या दौऱ्यानंतर २१ नोव्हेंबर रोजी ते भारतात परतणार आहेत.

Comments
Add Comment