Tuesday, February 11, 2025
Homeताज्या घडामोडीAssembly Election : मतदानाचा आकडा वाढवण्यासाठी मुंबईत प्रशासनाकडून जोरदार जनजागृती

Assembly Election : मतदानाचा आकडा वाढवण्यासाठी मुंबईत प्रशासनाकडून जोरदार जनजागृती

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या(Assembly Election) मतदानासाठी केवळ पाच दिवस शिल्लक आहेत. सर्वच राजकीय पक्ष यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर संपूर्ण मुंबई महानगरातील प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीला अधिक बळकट करण्याचे कार्य करावे, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्हा प्रशासनाकडून नियोजन, अंमलबजावणी, सोयीसुविधांच्या पूर्ततेसोबतच जनजागृतीसाठीही जोरदार प्रयत्न केले जात आहेत.

मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी ‘मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभागासाठी सुनियोजित कार्यक्रम’ (स्वीप) उपक्रम अंतर्गत पारंपरिक माध्यमांसोबतच अनेक अभिनव उपक्रमांच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात जनजागृती सुरू आहे. आतापर्यंत सुमारे ४० लाख वीजदेयकांवर संदेश प्रकाशित करण्यात आले आहेत. तर, २७ लाख बँक ग्राहकांना मतदान करण्याचे आवाहन करणारे एसएमएस पाठवण्यात आले आहेत.

MNS Manifesto : “आम्ही हे करू”… राज ठाकरेंनी केला मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, महाराष्ट्र राज्य निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण मुंबईभर विविध जनजागृतीपर उपक्रम सुरू आहेत. या अंतर्गत मुंबई महानगरात ६५ ठिकाणी मतदार मदत केंद्र उपलब्ध करण्यात आले आहेत. कारखाने तसेच आस्थापनांच्या ठिकाणी ९६ तसेच मॉल्स, बाजारपेठ, उद्याने, समुद्रकिनारे आदी एकूण ५१३ ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सुमारे ६ लाख ४० हजार ७८० मतदारांना आजवर मतदानाची शपथ देण्यात आली आहे. दरम्यान, विविध भागांमध्ये ४१६ रॅली काढण्यात आल्या. त्यामध्ये सुमारे २ लाख नागरिकांनी सहभाग नोंदवला. ३९५ ठिकाणी पथनाट्यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.

प्रकाशित, प्रसारित साहित्यांच्या माध्यमातून व्यापक प्रसिद्धी

नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी आणि मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी विविध प्रकाशित तसेच प्रसारित साहित्याच्या माध्यमातूनही व्यापक प्रसिद्धी केली जात आहे. या अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या साहाय्याने त्यांच्या पालकांमध्ये मतदानासंदर्भात जनजागृती करण्यासाठी संपूर्ण महानगरात २ लाख ८५ हजार ७३० संकल्पपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. ऑटो रिक्शा तसेच टॅक्सीवर सुमारे ११ हजार ५०० स्टिकर्स लावण्यात आले आहेत. महामार्गांवर ५३ ठिकाणी जाहिरात फलक (होर्डिंग), शासकीय कार्यालयांच्या १७१ ठिकाणी बॅनर, ६३ शासकीय कार्यालयांच्या पत्रांवर तसेच सुमारे ४० लाख वीज देयकांवर मतदानाचा संदेश प्रकाशित करुन वितरीत करण्यात आले. बँकांमध्ये सुमारे ३१५ ठिकाणी डिजिटल स्क्रिन तसेच बॅनरद्वारा जनजागृती केली जात आहे.

२७ लाख बँक ग्राहकांना एसएमएस, सार्वजनिक ठिकाणी उद्घोषणा

मतदानासंदर्भात जनजागृतीसाठी प्रशासनाने विविध मोबाइल कंपन्यांच्या माध्यमातून सुमारे २७ लाख बँक ग्राहकांना एसएमएस पाठवले आहेत. तसेच, मध्य, पश्चिम आणि मेट्रो रेल्वेद्वारा ७६ रेल्वे स्थानकांवर डिस्प्लेच्या माध्यमातून तसेच उद्घोषणांच्या माध्यमातून मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. सुमारे २ हजार ३८८ हॉटेल्स तसेच क्लबच्या ठिकाणी मतदानाचा संदेश देणारे डिस्प्ले लावण्यात आले आहेत. तसेच, १ हजार ३१५ स्वच्छताविषयक वाहनांवरुन जिंगल्स तसेच गीतांच्या माध्यमातून मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे.

क्रीडा, चित्रपट आदी क्षेत्रातील सेलिब्रिटींकडून चित्रफितींद्वारे आवाहन

मतदान बजावून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन करण्यासाठी प्रशासनाने चित्रपट, कला तसेच क्रीडा क्षेत्रातील नामांकित सेलिब्रिटींची मदत घेतली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध समाज माध्यम खात्यांवरुन आजवर सुमारे ५० हून अधिक सेलिब्रिटींच्या आवाहनात्मक चित्रफिती जारी करण्यात आल्या आहेत. तसेच, क्रिएटीव्हज आणि पोस्टच्या माध्यमातून सातत्याने आवाहन केले जात आहे. याशिवाय, अन्य अनेक उपक्रमांच्या माध्यमातूनही जनजागृती केली जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -