नवरात्र, दिवाळी असे सणांचे दिवस संपले. सण म्हटले की, छान छान रेशमी महागातले कपडे घालून मिरवणे आलेच. एका ट्रेनच्या प्रवासात या छान छान कपड्यांविषयी बोलणे चालू होते. बापरे! आता घरी जाऊन धोबीघाट काढावा लागणार. बॅगेतले कपडे लाँड्रीला द्यावे लागणार. तो खर्चही किती वाढलाय वगैरे. यांची कटकट असते. घरी धुता येत नाहीत. मग ड्राय क्लीनिंग, वॉशिंग, इस्त्री यासाठी लॉन्ड्रीवर अवलंबून राहावे लागते. तसेच सुट्ट्यांमधील ट्रीपवरून आल्यावर सुद्धा जाकीट, सूट, स्वेटशर्ट हे देखील ड्राय क्लीनिंगला द्यावे लागतात. अशाच एका ट्रीपवरून येताना आमचे आपापसात बोलणे चालू होते. ही सर्व चर्चा समोर बसलेले एक गृहस्थ ऐकत होते. ते म्हणाले तुम्ही लाँड्रीबद्दल बोलत आहात तर तुम्हाला एक खरी घडलेली गोष्ट सांगू का? गोष्ट म्हटल्यावर आम्हीही सरसावून बसलो. ही गोष्ट घडली गोव्यात. श्री गुरुदास यांनी गोम्स लाँड्रीत २० एप्रिल रोजी कपड्यांच्या ३ जोड्या ड्राय क्लीनिंगसाठी दिल्या. कपडे त्यांनी एका लग्नासाठी मुंबईतून खरेदी केले होते. ते रेशमी आणि महागातले होते. त्यांना लाँड्रीतून बिल दिले गेले आणि कपडे २५ तारखेला मिळतील असे सांगितले. गुरुदास २५ तारखेला कपडे आणण्यासाठी लाँड्रीत गेले तेव्हा कपडे तयार नव्हते. ते २८ तारखेला मिळतील असे सांगितले. त्यानुसार गुरुदास २८ तारखेला जाऊन कपडे घेऊन घरी आले. घरी येऊन सर्व आटोपल्यावर कपडे कपाटात ठेवताना उघडले तर कपड्यांची एक जोडी गायब झालेली, तर दुसरे कपडे फाटलेले आणि जळालेले दिसले.आता एवढ्या रात्री लाँड्री तर बंद झालेली. म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी बिलावरील नंबर पाहून त्यांनी लाँड्रीत फोन केला. लाँड्री मालकाने जरा उडवाउडवीच केली. म्हणून गुरुदास दुसऱ्या दिवशी लाँड्रीत गेले. सर्व कपडे दाखवून जाब विचारला. त्यावर मालकाने जळलेल्या, फाटलेल्या कुर्ता, पायजाम्याच्या बाबतीत झालेला निष्काळजीपणा मान्य केला. तेवढ्याची भरपाई देण्याची तयारीही दाखवली. पण गहाळ झालेल्या कपड्याची जबाबदारी घेण्याचे टाळले. त्याने गुरुदास यांचे बिल काढले आणि त्यावर बारीक अक्षरात लिहिलेली अट दाखवली. ती होती ‘कपडा खराब अथवा गहाळ झाल्यास आमची जबाबदारी रु. १००/-पर्यंत मर्यादित असेल.’ त्यामुळे तो फक्त तेवढेच पैसे देऊ शकेल असेही सांगितले.
गुरुदास यांनी परत परत समजावूनही लाँड्री मालक काही ऐकण्यास तयार नव्हता. शेवटी नाईलाजाने गुरुदास यांनी गोवा राज्य ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली. तक्रारीत त्यांनी कपड्यांची किंमत अकरा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये लिहिली होती. सोबत खरेदीचे बिलही जोडलेले. कपड्यांचे नुकसान झाल्याबद्दल रु. १५०००/- आणि जो मानसिक त्रास झाला त्याबद्दल रु. ५००००/- नुकसानभरपाई मिळावी अशीही मागणी केलेली. या फिर्यादींविरुद्धच्या बचावात लाँड्रीच्या वकिलांनी असा दावा केला की, त्यांच्या अाशिलाकडून कोणताही निष्काळजीपणा झालेला नाही. उलट गुरुदास यांनी २५ तारखेलाच कपडे परत नेले. तसेच गुरुदास यांनी ड्राय क्लीनिंगला घेतलेल्या कपड्यांसाठी लाँड्रीकडे विमा संरक्षण आहे का अशीही चौकशी केली होती. याचाच अर्थ ते विमा कंपनीविरुद्ध दावा दाखल करून रक्कम वसूल करू इच्छित होते. गुरुदास यांना दिलेल्या पावतीवरची अट मान्य करूनच कपडे ड्राय क्लीनिंगला दिले होते. याअर्थी लाँड्रीच्या सेवेत कोणतीही कमतरता नव्हती. कपड्यांची डिलिव्हरी घेण्याआधी गुरुदास यांनी कपडे तपासूनही पहिले होते. त्यांचा पुढचा युक्तिवाद असा होता की एकदा ग्राहकाने कपड्यांची डिलिव्हरी घेऊन कपडे नेले की लाँड्रीला त्यापुढे जबाबदार ठरवू शकत नाही. राज्य आयोगाने दोन्ही पक्षांची सर्व लेखी निवेदने, प्रतिज्ञापत्रे आणि युक्तिवाद तपासले. इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्राहक आयोगासमोर प्रत्येक गोष्ट/ घटना संपूर्ण संशयातीत असल्याचे सिद्ध करणे आवश्यक नसते. खून किंवा मोठ्या गुन्ह्यामध्ये असा अविवादीत पुरावा आवश्यक असतो. कारण अशा प्रकरणांमध्ये आरोपीच्या स्वातंत्र्याचा किंवा आयुष्याचा प्रश्न असतो. त्यामुळे ग्राहक न्यायालयातील निर्णय हे नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांवर, परिस्थितीनुसार काढलेल्या निष्कर्षांवर आणि व्यावहारिक दृष्टिकोन समोर ठेवून घेतले जातात.
ड्राय क्लीनिंगचे कपडे जेव्हा ग्राहकाला परत दिले जातात तेव्हा ते बंद पॅकेजमध्ये असतात असे खुद्द लाँड्रीनेच कबूल केले होते. आपणही सर्वांनी हे अनुभवले असेलच. परत घेतलेले कपडे हे जाड तपकिरी कागद, प्लास्टिक किंवा वर्तमानपत्रात गुंडाळून दोऱ्याने बांधून दिले जातात. साधारणतः हे पॅकिंग आपण उघडून बटन तुटलेले, फाटलेले जळलेले आहेत का हे लाँड्रीत तपासत नाही. असे केले तर इस्त्री केल्याचा काय उपयोग? फार तर एका कोपऱ्यातून कपडे आपलेच आहेत ना हे तपासून बघतो. बाकी गोष्टी घरी आल्यावरच कळतात. त्यामुळे गुरुदास यांनी डिलिव्हरी घेताना कपडे तपासून घेतले हा लाँड्रीच्या वकिलांचा दावा फोल ठरला. दुसरे म्हणजे पावतीवर बारीक अक्षरात छापलेली एकतर्फी अट ग्राहक कायद्यास मान्यच नाही. या सर्व बाबींचा विचार करता ग्राहक आयोगाने गुरुदास यांची तक्रार ग्राह्य ठरवून लाँड्रीच्या सेवेत खरोखरच कमतरता होती असा निर्णय दिला. लाँड्री मालकांनी गुरुदास यांना गहाळ आणि खराब झालेल्या कपड्याची किंमत अकरा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये देण्याचे निर्देश दिले. तसेच रु. १५०००/- नुकसान भरपाई देण्याचेही आदेश दिले. ही सगळी रक्कम ३० दिवसांच्या आत नाही दिली तर त्यापुढील कालावधीसाठी दंडात्मक व्याज आकारण्यात येईल अशी ताकीद देण्यात आली. ही गोष्ट ऐकल्यावर मी त्या गृहस्थांना विचारले की, तुम्हाला एवढे सविस्तरपणे कसे काय माहीत? तर त्यांनी सांगितले की, ते स्वतःच गोवा राज्य आयोगाचे निवृत्त अध्यक्ष होते. थोडक्यात काय? जिथे ग्राहक न्यायालयाच्या अध्यक्षांनाही न्यायालयाची पायरी चढावी लागते तिथे सामान्य ग्राहकाची काय कथा? त्यामुळे न घाबरता, निडरपणे ग्राहक न्यायालयात आपली तक्रार मांडा आणि न्याय मिळवा.
mgpshikshan@gmail.com
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…