मुंबई : मुंबईतील बीकेसी मेट्रो स्थानकात (BKC Metro Station) आज दुपारी १ वाजून ९ मिनिटांच्या सुमारास भीषण (Fire News) आग लागली. या आगीत मेट्रोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीकेसी मेट्रोच काम सुरू असताना वेल्डिंगमुळे खाली ठेवलेल्या लाकडी समानाने पेट घेतल्यामुळे ही घटना घडली. ४०-५० फूट खाली आग लागली असून या ठिकाणी मेट्रो स्थानकाचे काम सुरू होते १०० बाय ६० फूट च्या भागात हे काम सुरू होते या ठिकाणी लाकडं आणि इतर साहित्य असलेल्या भागात ही लागली. त्यामुळे संपूर्ण मेट्रो स्टेशनवर धूराचे लोट पसरले होते.
आगीची माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने अग्निशमन दलाचे १० ते १२ बंब दाखल झाले. तसेच प्रशासनाकडून सर्व मेट्रो ऑपरेशन्स थांबवून मेट्रो स्टेशनमधील (Mumbai Metro) सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. या आगीचा फटका मेट्रो सेवेला बसल्यामुळे बीकेसी स्थानकावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली. आतापर्यंत मेट्रोच्या तीन फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास आग विझवण्यात आली.
दरम्यान, आग पूर्णपणे नियंत्रणात आणल्यानंतर दुपारी २ बाजून ४५ मिनिटांनी परवानगी मिळाल्यानंतर बीकेसी स्थानकावरील सेवा पूर्ववत करण्यात आल्या. तसेच या घटनेत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाली नसून प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत असे मेट्रोने म्हटले आहे. (BKC Fire)