
महाड : आमदार भरत गोगावले (Bharat Gogavale) यांचे कौतुक करताना हभप कोकरे महाराज यांनी सांगितले की महाराष्ट्रात पाच प्रांत आहेत विदर्भात शास्त्रज्ञ, मराठवाड्यात संत, खानदेशात कवी, पश्चिम महाराष्ट्रात पुढारी तर कोकणात लेखक व क्रांतीकारक जन्माला येतात मात्र विदर्भ, मराठवाडा, खांदेश, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या पाचही प्रांतावर राज्य करणारे भरतशेठ हे एकमेव नेते आहेत. भरतशेठ हे केवळ महाडचे नेते नाही तर राज्यातील कानाकोपऱ्यातून येणारे दिन दलित, गोरगरीब, निराधार, अनाथ यांचे मंत्रालयातील काम फक्त भरतशेठ मुळे होते असे वारकरी सांप्रदाय कोकण प्रांताचे अध्यक्ष भगवान काकरे यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व माजी मुख्यमंत्री उबाठा यांच्यावर टिकास्त्र सोडताना कोकरे यांनी महाराष्ट्राला खाईत लोटण्यासाठी शरद पवार व उबाठा यांनी जातीजातीत धर्मांधर्मात भांडणे लावून जातीय वाद निर्माण केला. कष्टकरी, मराठी माणसाची गळचेपी थांबवण्यासाठी शिवसेनेचा भगवा हाती घेतलेल्या बाळासाहेबांनी मोठ्या विश्वासाने उबाठा यांच्या खांद्यावर पक्षाची धुरा सोपवली मात्र स्वार्थ आणि खुर्चीसाठी त्यांनी सेनेचा भगवा काँग्रेसकडे गहाण ठेवला. मुख्यमंत्री पदाचे खुर्चीत बसल्यानंतर गड किल्ले, मराठी अस्मितेचा उद्धार होईल अशी स्वप्ने मराठी माणसांनी पाहिली मात्र उबाठा यांनी शिवसेना प्रमुखांचे विचार आणि पक्ष संपवून मराठी माणसाची स्वप्ने धुळीला मिळवली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गद्दारी केल्याचा उबाठा यांच्याकडून आरोप केला जातो त्याचा समाचार घेताना एकनाथ शिंदे यांनी शिवसेना प्रमुखांचे विचार आणि पक्ष वाचवण्यासाठी, गहाण ठेवलेला भगवा, धनुष्यबाण सोडवण्यासाठी उठाव केला असे कोकरे यांनी सांगितले. दिवाळीत ३ तारखेला सर्व लाडक्या बहिणींची भाऊबीज झाली. आता २० तारखेला आ. गोगावले यांना मताच्या रुपाने भाऊबीजेचा आहेर द्या. देश संकटात असेल तर मातृशक्ती जागी होत असते महिषासुर उन्मत झाला होता त्यावेळी कालीकामा प्रकटली, सुलतानीने नंगा नाच सुरु केला त्यावेळी जिजाऊ धावून आली आता महाविकास आघाडी देश गिळंकृत करायला बसली आहे तेव्हा मातृशक्तीने जागे व्हावे असे आवाहन कोकरे यांनी केले.
पन्हाळगडाला जेव्हा शत्रुंचा वेढा पडला होता त्यावेळी आपला राजा जोवर गडावर पोचत नाही तोपर्यंत बाजीप्रभु देशपांडे यांनी पावन खिंड लढवली होती त्याप्रमाणे आजपासून पुढील पाच दिवस शिवसैनिकांनी बाजीप्रभू प्रमाणे खिंड लढवून २० तारखेला शेवटचं मत मतपेटीत पडत नाही तोपर्यंत जागरूक राहावे असे आवाहन केले. यावेळी आ. गोगावले यांनी नाते गणासाठी २० कोटी तर नडगांव गणासाठी १८ कोटीचा निधी आणल्याचे सांगितले. नाते ते डोंगरोळी लोणेरे रस्ता, रवळनाथ सोमजाई देखणं मंदीर (१ कोटी मंजुरी ) जगदीश्वर मंदीर ३० लाख, निरंजन डावखरे यांच्या माध्यमातून पुल गारपाटला, सानेकोंड अशा दुर्गम भागातील रस्ते, पाणी योजना आपल्या आमदारकीच्या काळात झाल्याचे सांगत पुन्हा महायुतीची सत्ता येणार असून महाडकरांसाठी हा सुवर्णकाळ असणार आहे. त्यामुळे तुमच्या आमदाराला (Bharat Gogavale) भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन केले.