विलास खानोलकर
श्रीस्वामींचे ‘अरे, तू शास्त्र शिकण्यास केव्हा जाणार आहेस’ असे पाहा की, या शास्त्रांनी कामादी षड्रीपूस जिंकले आहे काय?’ हे वाक्य ऐकून बावडेकरांस मोठा पश्चातापच झाला. दुसऱ्या दिवशी त्यांच्याजवळ येऊन बावडेकरांनी श्री स्वामींना सांष्टांग नमस्कार घालून शास्त्रीबुवांबरेाबर जाण्याचा बेत रद्द केला. नंतर श्री समर्थांजवळ राहिले. श्री स्वामींचे पुराणिकावर फार प्रेम होते. त्यामुळे महाराजांनी देह सोडण्यापूर्वी त्यास बार्शी गावी पाठवून दिले होते. कारण हे शरीर पडलेले पाहून त्यास फार दुःख होईल व त्याच्या नित्य ध्यानात विघ्नता येईल. पुढे अंतकाळी श्री समर्थांनी त्यांची खेळणी जवळच्या एका सेवेकऱ्याजवळ देऊन सांगितले, ‘ही खेळणी बावडेकर येथे आल्यावर त्यांना दे.’
श्री स्वामींच्या देहावसानानंतर बावडेकर अक्कलकोटला आले, तेव्हा ती खेळणी त्यांच्या स्वाधीन केली. ती हल्ली बार्शी येथे पुराणिकांचे देवघरात आहेत. असेच पूर्वी एकदा बावडेकर नृसिंहवाडीस गेले होते. तेथे यज्ञ करावयाचा होता. तेव्हा बावडेकरांना टेंबेस्वामींनी सांगितले की, ‘तुमचे गुरू जे अक्कलकोटचे स्वामी ते प्रत्यक्ष दत्तावतार आहेत. अगोदर त्यांची आज्ञा घेऊन या, मग यज्ञ करा.’ यावरून टेंबे स्वामीही श्री समर्थांस दत्तअवतारी मानीत असत.