नवी दिल्ली: दिल्ली सरकारने प्रदूषण(Delhi pollution) रोखण्यासाठी कोणतीही विशेष तयारी केली नाही, सरकारने स्थापन केलेल्या हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाला यासाठी पुरेशी पावले उचलण्यात यश आले नाही, असे म्हणत दिल्ली सरकारसह आयोगालाही सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फटकारले.
दिल्ली जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर बनू नये असे न्यायालयाने म्हटले आहे.यापूर्वी फटाके बंदीवरून न्यायालयाने सरकारला फटकारले होते. दिल्लीतील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस गंभीर श्रेणीत पोहोचत आहे. गुरुवारी दिल्लीतील काही भागात हवा गुणवत्ता निर्देशांक ५०० च्या पुढे गेला.
दरम्यान, दिल्लीचे पर्यावरणमंत्री गोपाल राय यांनी दिल्लीतील प्रदूषण रोखण्यासाठी श्रेणीबद्ध उपाय योजनांचा दुसरा टप्पा लागू करण्यात आल्याचे सांगितले. या टप्प्यात दिलेल्या निर्देशांचे पालन झाले पाहिजे, यासाठी त्यांनी संबंधितांना आवश्यक सूचनाही दिल्या. यापूर्वी १४ ऑक्टोबरला श्रेणीबद्ध उपाययोजनांचा पहिला टप्पा लागू करण्यात आला आहे.
दिल्लीतील विविध भागात प्रदूषण आज, गुरुवारी सकाळी ६ वाजता अत्यंत वाईट श्रेणीतून गंभीर श्रेणीत पोहोचले. दिल्लीच्या जहांगीरपुरीमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक सर्वाधिक ५६७ नोंदवला गेला. तर पंजाबी बागेत आणि आनंद विहारमध्ये 465 नोंदवले गेले. राजधानीत थंडीसह दाट धुके आहेत.
प्रदूषण कमी करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून काही ठिकाणी धुररोधक यंत्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी परिसरात गेल्या २४ तासांत किमान तापमानात घट झाली आहे. त्यामुळे नागरिकांना थंडी जाणवत आहे. किमान तापमान १८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरले आहे.
पुढील काही दिवस राजधानीत असेच वातावरण राहणार असल्याने धुके आणि प्रदूषणाचा(Delhi pollution) दुहेरी फटका दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी परिसरात राहणाऱ्या लोकांना सहन करावा लागू शकतो.