नाशिक : भाजपा पक्षातील (BJP) दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण (Harischandra Chavan) यांचे आज सकाळी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून हरिश्चंद्र चव्हाण यांची प्रकृती खालावली होती. यादरम्यान, आज सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास कॉलेज रोड वरील पाटील लेन नंबर दोन येथील त्यांच्या निवासस्थानी दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ७३ वर्षी यांनी अखेरचा श्र्वास घेतला. सायंकाळी सुरगाण्यातील प्रतापगड या मूळ गावी चव्हाण यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार होणार आहे.
मालेगाव आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून त्यांनी अनेक वर्षे प्रतिनिधित्व केले आहे. हरिश्चंद्र चव्हाण यांनी २००९ आणि २०१४च्या लोकसभा निवडणुकीवेळी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. भाजपाशी एकनिष्ठ असलेले चव्हाण यांना २०१९ च्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपाने तिकीट दिले नव्हते. मात्र तरीही ते भाजपात राहून काम करत होते. (Harischandra Chavan)