आयुष्यात अनुभवलेली सहल प्रत्येकासाठी एक सुंदर अनुभव असतो. कोण्याएका संध्याकाळी त्या एका शांतसंमयी या आठवणी ताज्या होतात आणि हळूच अंग मोहरून जातं. तसंच बालपणाचं आहे. ‘बालपण’ ही एक आठवणीतली सहल. ही सहल आणि त्या सहलीतला प्रत्येक टप्पा आपल्यासाठी आठवणींची ओंजळ असते. ती जपत ही सहल आयुष्यभर आपण एन्जॉय करतो. खूप सखाचे क्षण असतात या सहलीत. आज बालदीनानिमित्त या सहलीतल्या सुखद आठवणी जगताना…
साक्षी रूपाली दिलीप माने
बाल युवा दोस्तांनो आज तुमचाच खास दिन, म्हणजेच ‘बालदिन’ अर्थात ‘चिल्ड्रन्स डे’. या बालदिनाच्या तुम्हा सर्वांना खूप-खूप शुभेच्छा! या दिवसाचा इतिहास डोकावून पाहिला तर भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे बालकांविषयी असणारे प्रेम प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचावे म्हणून १४ नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिवस बालदिनाच्या रूपात साजरा केला जातो, हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. लहान मुले ही पंडितजींच्या हृदयातला एक अमूल्य ठेवा होता. चळवळी आणि राजकारणाच्या धबडग्यात ते केवळ बच्चेकंपनीमध्ये रमायचे आणि मुलांनाही ‘चाचा नेहरू’ अगदीच जवळचे वाटायचे. दरवर्षी विशेषत: बालदिनानिमित्त शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिवशी मुले त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करतात. त्यांच्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धाचे आयोजन केले जाते. मुलांना नृत्य, गाण्याची आणि भाषणे देण्याची संधी मिळते. तसेच लहान मुले ही कायमच त्यांच्या आगळ्यावेगळ्या कलागुणांनी सर्वांनाच आकर्षित करतात. जशी नेहरूजींना मुले आवडायची तशी आपल्या प्रत्येकालाच आवडतात. म्हणतात ना लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात हे अगदी खरं आहे, त्यात काडीमात्र शंका नाही. एखादे मूल आपल्यासमोर हसत जरी असेल तर त्याला पाहून आपल्यालाही हसू येते आणि सहजच आपल्या लहानपणीच्या आठवणी जाग्या होतात.
लहानपण ही एक वारंवार हवीशी वाटणारी सहल असते. जसं आपण एखाद्या सहलीला मनमुरादपणे मज्जा, धमाल करतो असेच आपले बालपण; परंतु या सहलीचा कितीही ‘वन्स मोअर’ हवासा वाटत असला तरी पुन्हा जसाच्या तसा अनुभवणे शक्य होत नाही. बालपण हा आयुष्यातला सर्वात सुंदर टप्पा असतो, याबद्दल तर काहीच किंतु नाही. वयाचा कोणत्याही आकडा पार केला तरी लहानपणीच्या आठवणी काही पाठ सोडत नाहीत. लहानपणी केलेल्या चुका, आईचा मार, बाबांचा ओरडा, मित्र-मैत्रिणींसोबतची कट्टी-बट्टी, भूत-भूत, भांडीकुंडी, लपाछुपी, शाळेत न जाण्यासाठी केलेली कारणं, आई आज पोट दुखतंय गं असं म्हणत शाळेला मारलेली बुट्टी, कमी मार्क आल्यावर थोडसं बोललेलं खोटं आणि इतकंच नव्हे तर खेळता-खेळता आपण कुठे पडलो त्याच्या खुणा, मोठं होऊन डॉक्टर, पोलीस, टीचर बनायची स्वप्न शेवटच्या क्षणापर्यंत काही साथ सोडत नाहीत. या गोष्टी ही सारी स्वप्नं कायम आठवणींचे घर करून आपल्यासोबत राहतात.
एका विशिष्ट वयानंतर आपण मोठे होतो. जबाबदारी वाढते आणि नकळत खांद्यावर त्याचे दप्तर घेऊन एका वेगळ्याच प्रवासाला सुरुवात होते. मग तो अल्लडपणा, निरागसपणा, मज्जा-मस्ती या गोष्टी करणारे ते लहान मूल हळूहळू नाहीसं होऊ लागतं आणि एका नवीन गोष्टीशी आपली मैत्री होते. ती नवीन मैत्री म्हणजेच परिपक्वता किंवा समंजसपणा आणि सर्वांना सोयीस्कर असं म्हणायला गेलं तर मॅच्युरिटी. ही मैत्री गरजेची असते; परंतु या मैत्रीमुळे खूप गोष्टी सहज आपल्याकडून सुटत जातात आणि एक वेगळीच रेस सुरू होते. या स्पर्धेत सगळ्यांनाच पहिल्या क्रमांकावर यायचे असते. यासाठी रक्ताचे पाणी करून मेहनत करायची तयारी, जिद्द, चिकाटी आपोआप प्रत्येकामध्ये येते. हीच गोष्ट पिढ्यान-पिढ्या सुरू आहे, पण या सर्व गोष्टींमध्ये आपल्यातलं ते लहान मूल केव्हाच हरवून गेलेलं असतं.
मान्य आहे परिवर्तन गरजेचं असतं, मोठं होऊन समोर येणारी जबाबदारी पूर्ण करणे हे कर्तव्य असतं पण आपल्यातलं लहान मूल कायम जपणं देखील तितकंच गरजेचं आहे. या धकाधकीच्या जीवनामध्ये एक ब्रेक अत्यावश्यक आहे. कधी तरी आपल्यातलं ते लहान मूल पुन्हा हसताना, खेळताना, धडपडताना, चिडवताना दिसलं पाहिजे. रोज तर शक्य नाही प्रत्येकाने पण एक दिवस बालपणीच्या आठवणींमध्ये नाही तर प्रत्यक्षात बालपण जगले पाहिजे. हे सगळ्यांनाच करता आलं पाहिजे. आपल्या मुलांना तर मनमुरादपणे त्यांच्या या गोड क्षणांचा आस्वाद घेऊ द्या, पण कधी तरी तुम्ही लहान होऊन आपल्या बालपणीची ती हवीहवीशी वाटणारी सहल नक्कीच एकदा तरी करू या.