मुंबई: ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला टी-२० मालिकेच्या पहिल्या सामन्यात २९ धावांनी हरवले. हा सामना केवळ ७ षटकांचा होता. मात्र पाकिस्तानच्या संघाने यात ९ विकेट गमावले. त्यांच्यासाठी हा लाजिरवाणा पराभव होता. बाबर आझम आणि कर्णधार मोहम्मद रिझवानसह अनेक दिग्गज खेळाडू फ्लॉप झाले. हा सामना २०-२० षटकांचा होणार होता. मात्र खराब हवामानामुळे षटके कमी करण्यात आली.
ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ७ षटकांत ४ विकेट गमावताना ९३ धावा केल्या. या दरम्यान ग्लेन मॅक्सवेलने ४३ धावांची शानदार खेळी केली. त्याने १९ चेंडूंचा सामना करताना ५ चौकार आणि ३ षटकार लगावले. मॅक्सवेलने पाकिस्तानी गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. राहिलेली कसर मार्क स्टॉयनिसने पूर्ण केली. त्याने ७ बॉलमध्ये नाबाद २१ धावा केल्या.
पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव
ऑस्ट्रेलियाला दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तान संघाने ७ षटकांत ६४ धावा केल्या. त्यांनी ९ विकेट गमावले. रिझवान शून्यावर बाद झाला. त्याला खातेही खोलता आले नाही. बाबर आझम ३ धावा करून बाद झाला. उस्मान खान ४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. साहिबजादा फरहान ८ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. आगा सलमानलाही ४ धावा करता आल्या. या पद्धतीने पाकिस्तानला २९ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.