महाराष्ट्रासह देशात अराजकता पसरवण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. हे एक व्यापक कारस्थान आहे. अराजकता का निर्माण केली जात आहे आणि त्यामागे कोण आहे हे समजून घेणे आवश्यक आहे.
संघर्षातील नैतिकता ज्यावेळी संपते त्यावेळी अराजकता हे पाठीवर वार करण्यासाठी वापरण्याचे अस्त्र असते आणि सद्यस्थितीत म्हणजे साधारण २०१४ पासून विरोधकांनी विफलतेतून हे अस्त्र मुख्य अस्त्र म्हणून वापरण्यास सुरुवात केली आहे. २०१४ पासून विरोधकांकडे परिस्थिती पालटू शकेल असा नेता नाही, सामान्यजनांपर्यंत पोहोचू शकते अशी संघटन शक्ती नाही, समाज एखाद्या ध्येयाच्या मागे उभा राहील असे तत्त्वज्ञान किंवा ध्येयवाद नाही आणि त्यामुळे वैफल्यग्रस्त विरोधकांना अराजकता एवढे एकच अस्त्र ऐव्हरी टॉवरमध्ये बसणारे विचारवंत देत असतात. भारतातील जनसामान्य त्याचा अनुभव घेत आहेत. जगाच्या पाठीवर कोठेही व कितीही प्रयत्न केले तरी सर्व जनहिताय, सर्व जनसुखाय असे घडत नसते. एवढेच कशाला? बहुजनहिताय, बहुजन सुखाय सुद्धा परिपूर्णपणे घडत नाही. त्यासाठी आवश्यक ते प्रयत्न जरूर सुरू असतात. त्यात यशही येत असते. मात्र तसे अव्याहत प्रयत्न करूनही समाजात दु:ख, वेदना या राहातच असतात आणि त्याचे वेळोवेळी प्रकटीकरणही होत असते. हीच ती वेळ व संधी असते, अराजकता रूपी कलीला समाजजीवनात प्रवेश करून ते समाजजीवन विषमय करण्याची. भारत याला अपवाद नाही. पण भारतात धर्म हे समाजधारणेचे मुख्य अंग असल्याने स्वाभाविक हजारो वर्षांपासून संयम व विवेक या गुणद्वयावर समाजवर्तन अवलंबून राहिले.
अराजकता हे भारताचे मुख्य अस्त्र बनले नाही पण २०१४ पासून परिस्थिती बदलली. भारतात धर्म संस्कार म्हणजे हिंदू संस्कार असतात. पण २०१४ पासून देशातील सरकार विरोधी भूमिका ज्यांना घ्यावी लागली ते वैचारिकदृष्ट्या कधीही हिंदू जीवनपद्धती आणि संस्कार पद्धती स्वीकारू शकले नाहीत. त्यामुळे शांत, संयमाने संघर्ष करत परिस्थिती पालटू असे कधीही विरोधकांना वाटले नाही आणि त्यामुळे लवकरच वैफल्यग्रस्तता आली. स्वाभाविकपणे अराजकतेचा आधार घेण्यासाठी ते अगतिक झाले. अराजकता पसरविण्यासाठी आंदोलने, त्यातील प्रक्षोभकता, त्यातील विषयांतरे, परदेशी पैसा, परदेशी मदतीवर चालणाऱ्या स्वयंसेवी संस्था, सामान्यांची अडवणूक, अनावश्यक आक्रमण, विविध समाजमाध्यमे व करमणूक क्षेत्र यांची मदत घेऊन अपप्रचार असे अनेक पदर तपासताना आंदोलनातून फक्त असंतोष निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे हे सहजपणे कळते. अशी यादीच बनवता येईल, की ही आंदोलने का झाली. यामागे कोण होते? त्या आंदोलनांचे पुढे काय झाले? शाहीनबागमध्ये आंदोलन झाले आणि त्या काळातील सर्वच आंदोलने रस्ते अडवणारी अशीच झाली. महिनोनमहिने रस्त्यावर मुक्कामी महिला, पुरुष होते. मुस्लीम महिलांना स्वतःच्या तलाकसारख्या शहाबानो प्रकरणात आंदोलन जमले नाही पण नागरिकत्व कायदा येताच आकाश कोसळल्या सारख्या मुस्लीम महिला रस्त्यावर आल्या. अशा प्रकारच्या आंदोलनासाठी कोण पैसे देत होते? कोण गर्दी करत होते. कोण भाषणबाजी करत होते? कोणाच्या मुलाखती छापल्या जात होत्या. शेतकरी आंदोलन झाले. दिल्ली घेरली गेली. त्यातही सर्व व्यवस्था कोण करत होते.
२६ जानेवारीला राष्ट्रध्वज जाळण्याचा प्रयत्न झाला. परदेशात बातम्यांची धूम. कधी सरकार कृती करते व कधी आम्ही जगभर रान पेटवतो असा दबा धरून बसलेली जगभरची प्रसिद्धी माध्यमे, या आणि अशा अनेक आंदोलनांच्या, हेतूतः केलेल्या विविध संघर्षात्मक कार्यक्रमांमागील नेमका उद्देश स्पष्टपणे देशात अराजकता पसरवणे हाच होता. काय गंमत असते अशा आंदोलनाची तेही लक्षात घ्यावे लागेल. आंदोलन शेती कायद्यासंदर्भात आणि घोषणा खालिस्तानच्या. झेंडे खालिस्तानचे. अस्वस्थता कॅनडात आणि सर्व माध्यमे फक्त मोदींना घेरले की नाही याच चिंतेत. अमेरिकेत भारतीय लोकशाहीची चिंता, परिसंवाद आणि आणखी काही. अशी आंदोलने फटाक्यांच्या माळेसारखी सुरू ठेवायची आणि नंतर व्यवस्थाच नको हा आक्रोश करायचा, अशी त्याची पद्धती आहे. हे झाल्यानंतर सामान्य माणूस व्यवस्थेविषयी चिंतित झाला की, अराजकता निर्माण होते. मग कुठेही काडी टाका, भडका उडालाच पाहिजे. महाराष्ट्रात आरे कारशेड विषय आला की, स्वयंघोषित पर्यावरणवादी आणि त्यांच्या मागे चर्चने गोळा केलेली गर्दी. परदेशी पैशानी पोसलेल्या स्वयंसेवी संस्था अशावेळी एकदम कृतिशील होतात. न्यायालयाने सरकारच्या बाजूने निकाल दिला. त्या निकालानंतरही त्यांचे समाधान होत नाही. यात नेमका अराजक निर्माण करणाऱ्यांचा काय रस असतो? एकदा विकास थांबला की जनमत तापते आणि त्यासाठी हा अट्टहास असतो. त्यामुळे अशी वेगवेगळी कारणे उभारून अराजकता निर्माण करायची म्हणजे विकास थांबतो, राष्ट्रीयत्व बदनाम होते. इस्लाम व ख्रिश्चॅनिटीच्या अराष्ट्रीय कृत्यांकडे कानाडोळा होतो, असे हेतू आहेत. एकदा हे घडले की लोकप्रिय सरकार जाते आणि बिनबुडाचे सरकार येते. या आंदोलनजिवींची चांदी होते. भारत सशक्त बनू नये म्हणून काम करत असलेल्या परदेशी उपद्रवींचा उद्देश सफल होतो. मग जॉर्ज सोरेस, ग्रेटा अशा टूलकी टसची कामे सोपी होतात. हे घडू लागले की हिडनबर्गला अदानी भारताला बुडवणार असा साक्षात्कार होतो.
सामान्य गंतुवणूकदार घाबरू लागतो. मग राहुल गांधी अदानी, अंबानी ही प्लेट वाजवू लागतात. अराजकता झिंदाबाद अशी वाटचाल सुरू होते. त्यात मग संविधान धोक्यात हे व्यवस्थेविरुद्धचे महत्त्वाचे अस्त्र बाहेर पडते. दुरान्वयानेही ज्यांनी संविधानाचा आदर केला नाही तेही या वाहत्या गंगेत हात धुवून घेतात. अशा शेकडो अदृश हातांनी देश, संस्कृती आणि स्थैर्य तसेच शांतता आणि समृद्धी, विकास यावर अराजकतेचा घाला येतो. हे सामान्य जनतेने ओळखले पाहिजे. भारताचे जगातील सध्याचे स्थान, देशाची गंगाजळी, देशातील भ्रष्टाचारावर येत असलेले नियंत्रण, होणारा चौफेर विकास हे कोणाला नको आहे, हे समजून घेतले पाहिजे. काही मंडळी परदेशात जाऊन देशाची प्रतिमा मलीन का करतात? याचे कारण हेच आहे की, नेतृत्व नाही, संघटन नाही, ध्येयवाद नाही मग उरतो एकच मार्ग, अराजकता निर्माण करण्याचा, असंतोष निर्माण करण्याचा, मी काही करणार नाही पण तुझ्या कोणत्याही प्रयत्नांना बदनाम करून ते हाणून पाडीन, असा हा प्रकार आहे. पण सामान्य माणूस ओळखून आहे की अशी जी आंदोलने होतात ती निवडणूक संपली की संपून जातात. आरे कारशेड उभी राहण्यास अडीच वर्षे उशीर झाला, कोकणातील प्रकल्प सुरू झाले नाहीत याचे उत्तरही तो शोधतो. अराजकता हिंदू स्वभावाविरुद्ध आहे आणि म्हणूनच भारतात अराजकता जिंकू शकत नाही. तरीही लोकांनी सावध राहाणे गरजेचे आहे.
(अनामिक)