Sunday, April 20, 2025
Homeताज्या घडामोडीWayanad : वायनाड लोकसभेसह ३३ विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान

Wayanad : वायनाड लोकसभेसह ३३ विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान

निकाल मात्र महाराष्ट्र, झारखंड निवडणुक निकालासोबतच होणार जाहीर

नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. झारखंड विधानसभेच्या पहिल्या टप्प्यांसाठी बुधवारी (दि. १३ नोव्हेंबर) मतदान होणार आहे. त्याबरोबरच देशातील विविध राज्यांमधील ३३ विधानसभा आणि वायनाड लोकसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठीही बुधवारीच मतदान होणार आहे. राजस्थान ७, पश्चिम बंगाल ६, आसाम ५, बिहार ४, कर्नाटक ३, मध्य प्रदेश २, सिक्किम २, गुजरात १, छत्तीसगडच्या १, मेघालय १, केरळच्या १ मतदारसंघामध्ये विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकीचा निकाल महाराष्ट्र आणि झारखंड निवडणुक निकालासोबत २३ नोव्हेंबर रोजी जाहीर केला जाईल.

महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा करताना केंद्रीय निवडणूक आयोगाने देशभरातील ४८ विधानसभा आणि २ लोकसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुकीची घोषणा केली होती. यामध्ये केरळच्या वायनाड आणि महाराष्ट्रातील नांदेड लोकसभेच्या जागेचा समावेश होता. यांपैकी उर्वरित ४७ विधानसभा आणि वायनाड लोकसभेसाठी १३ नोव्हेंबर रोजी आणि नांदेड लोकसभा, उत्तराखंडमधील केदारनाथ विधानसभा मतदारसंघामध्ये २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असल्याची घोषणा आयोगाने केली होती.

१४ विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबरला मतदान

उत्तर प्रदेश ९, केरळ १ आणि पंजाबमधील ४ अशा एकूण १४ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर रोजी घेतला. या मतदारसंघांमध्ये १३ नोव्हेंबर ऐवजी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. काँग्रेस, भाजप, बहुजन समाज पक्ष आणि रालोद या सर्व पक्षांनी केलेल्या विनंतीनंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला. विविध सण आणि उत्सवांमुळे मतदानाची टक्केवारी कमी होऊ नये म्हणून निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती सर्व पक्षांनी केली होती. त्यानुसार निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला.

वायनाडची जनता ठरवणार प्रियंका गांधींचे भवितव्य

राहुल गांधी यांनी वायनाड लोकसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिल्याने तिथे पोटनिवडणूक होत आहे. यामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रियंका गांधी यांना निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले आहे. प्रियंका गांधींची पहिल्यांदाच प्रत्यक्षपणे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे वायनाडची जनता त्यांच्यासोबत जाईल की नाही. याकडे देशभराचे लक्ष लागले आहे. राहुल गांधी यांना ६ लाख ४७ हजार ४४५ मते मिळाली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -