शिर्डी: विश्वाला श्रद्धा आणी सबुरीचा संदेश देणाऱ्या श्री साईबाबांनी ६० वर्ष वास्तव केलेल्या शिर्डीतील पवित्र द्वारकामाई मध्ये रूढी परंपरेनुसार बुधवारी सायंकाळी तुळसी विवाह मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला.दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री साईबाबा संस्थानच्या वतीने तुलसी विवाहाचे श्री द्वारकामाई मंदीर येथे आयोजन करण्यात आले होते.
तुलसी विवाह निमित्ताने सायंकाळी साडेसहा ते साडेसात यावेळेत द्वारकामाई मंदीराच्या सभामंडपात साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते तुलसी विवाह पूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी श्रीगणेश पूजन, नैवेद्य दाखविणे आदी कार्यक्रम पार पडले.
तर शिर्डी ग्रामस्थांनी देखील आपापल्या घरी तुलसी विवाह मोठ्या उत्साहात साजरा केला असून शहरात सर्वत्र आकाशात फटाक्यांची अतिशबाजी बघायला मिळाली. साईबाबांच्या द्वारकामाई मंदिरातील हा आगळ्यावेगळा तुलसी विवाह सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने साईभक्त उपस्थित होते.