उबाठा बोलल्यास जीभ छाटण्याची अमित पेडणेकर यांची जाहीर सभेत धमकी
दोनशे कार्यकर्त्यांकडून दगडफेक आणि दंगल घडवण्याचा प्रयत्न
खासदार रवींद्र वायकर यांचा गंभीर आरोप
पोलीस आणि निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी
मुंबई : जोगेश्वरी पूर्व मतदार संघातील (Assembly Election 2024) उबाठा गटाचे उमेदवार अनंत (बाळा) नर यांची मतदार संघात गुंडगिरी सुरू असून मंगळवारी रात्री दोनशे कार्यकर्त्यांसह दगडफेक करून दंगल घडवल्याचा गंभीर आरोप शिवसेना खासदार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी आज केला. मातोश्री क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी उबाठा उमेदवार अनंत नर यांच्यावर कठोर कारवाईची मागणी पोलीस आणि निवडणूक आयोगाकडे केली.
रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर या जोगेश्वरी पूर्व मतदार संघाच्या शिवसेना महायुतीच्या उमेदवार (Assembly Election 2024) आहेत. याच मतदार संघात मागील काही दिवसांपासून अनंत नर यांची गुंडगिरी सुरू असून मतदारांना धमकावले जात आहे असा आरोप वायकर यांनी केला. ते पुढे म्हणाले की मंगळवारी रात्री अनंत नर याने दीडशे दोनशे कार्यकर्ते घेऊन आले आणि शिवीगाळ केली. त्यांच्या कार्यकर्त्यांने महिलांचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला असता महिलांचा व्हिडिओ काढणाऱ्यांनी त्या महिलांचे कपडे फाडून महिलांचा विनयभंग केला. यावेळी कार्यकर्त्यांनी दगडफेक केली तसेच मुलीचा विनयभंग केला असा गंभीर आरोप वायकर यांनी यावेळी केला. अनंत नर याचा कार्यकर्ता अमित पेडणेकर याने वायकर जर उबठा बोललात तर त्यांची जीभ छाटली जाईल अशी खुलेआम धमकी दिली असाही आरोप त्यांनी केला.
उबाठा उमेदवार अनंत नर याने सुनेचा छळ केल्याचे व्हिडिओ क्लिप आहेत. घरगुती हिंसा, सुनेला जाळण्याचा प्रयत्न, भावाच्या बायकोला घरा बाहेर काढण्याचा प्रयत्न अनंत नर याने केला होता. जोगेश्वरीत अशी गुंडगिरी असेल तर आम्ही निवडणूक लढवू शकत नाहीत. इथे सुरक्षित वातावरण नाही. पोलिस आणि निवडणूक.आयोगाने या घटनेसंदर्भात ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी वायकर यांनी केली. याप्रकरणी अमित पेडणेकर विलास जाधव, मंदार मोरे, बाळा सावंत, संदीप कोठारकर आणि एका अनोळखी इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इथे आठ वेळा निवडणूक लढलो
दंगलग्रस्त जोगेश्वरीचे आम्ही सोन बनवलं असे खासदार वायकर म्हणाले. आमच्या प्रचाराबाबत (Assembly Election 2024) त्यांची काही तक्रार असेल तर त्यांनी कायद्याने पोलिसांना आणि निवडणूक आयोगाला तक्रार करावी असे खासदार वायकर (Ravindra Waikar) यांनी सांगितले.