पितांबरी शायनिंग पावडर. ‘बायको गेली माहेरी, काम करी पितांबरी’ ही टॅग लाईन पितांबरी प्रॉडक्ट्सला मिळाली आणि ‘पितांबरी शायनिंग पावडर’ घरोघरी जाऊन बसली. खरंतर साबण, पावडर, डिटर्जंट ही उत्पादनं बनवणाऱ्या अनेक कंपन्या आहेत तरीही १९८९ साली पितांबरी ही तांबे-पितळ लख्ख करणारी पावडर हे उत्पादन रवींद्र प्रभुदेसाई यांनी दाखल केले.
शिबानी जोशी
काही काही उत्पादने आपल्या वर्षानुवर्ष त्यांच्या एखाद्या जाहिरातीमुळे लक्षात राहतात. ती कंपनी किंवा त्या कंपनीचे मालक आपल्याला माहीत नसले तरी ते उत्पादन मात्र जाहिरातीमुळे लाखो लोकांच्या मनात कायमच घर करून बसतं. असेच एक उत्पादन म्हणजे पितांबरी शायनिंग पावडर. “बायको गेली माहेरी, काम करी पितांबरी” ही टॅग लाईन पितांबरी प्रॉडक्ट्सला मिळाली आणि ‘पितांबरी शायनिंग पावडर’ घरोघरी जाऊन बसली. खरंतर साबण, पावडर, डिटर्जंट ही उत्पादनं बनवणाऱ्या अनेक कंपन्या आहेत तरीही १९८९ साली पितांबरी ही तांबे-पितळ लख्ख करणारी पावडर हे उत्पादन रवींद्र प्रभुदेसाई यांनी दाखल केले. सुरुवातीला केवळ छोटी-मोठी हॉटेल्ससाठी लिक्वीड सोप आणि क्लीनिंग पावडरची निर्मिती ते करीत होते. त्यातून अशा प्रकारचे उत्पादन काढण्याची कल्पना त्यांच्या मनात आली आणि छोट्या उद्योगाला सुरुवात केली. खरं तर अशा प्रॉडक्ट्सची निर्मिती करणाऱ्या एफएमसीजी क्षेत्रातील अनेक बहुराष्ट्रीय तसेच नावाजलेल्या राष्ट्रीय कंपन्या होत्या त्यामुळे सुरुवातीला धोका होता, खूप स्पर्धा होती; परंतु उद्या पितळेच्या भांड्यांसाठी हे त्या पावडरचे वैशिष्ट्य होते. स्पर्धेत जिद्दीन टिकून राहत पितांबरी प्रॉडक्ट्सने आज खूप मोठा पल्ला गाठला आहे. पूर्वी घरातील बायका तांब्या पितळ्याची भांडी घासण्यासाठी चिंच, राख, लिंबू वापरत असत त्यावर उपाय म्हणून संशोधन करत करत अभिनव अशा ‘पितांबरी शायनिंग पावडरचा’ जन्म झाला. तांब्याची पितळेची भांडी चकचकीत करणारी पावडर असं त्याचं वैशिष्ट्य ठरल आणि जाहिरातीमुळे तर ही पावडर घरोघरी पोहोचली.
उद्योगाचं मोठं जाळं विणायच असेल तर ‘कंझ्युमर प्रॉडक्ट’ क्षेत्रामध्ये एकाच उत्पादनावर अवलंबून राहणं शक्य नाही आहे, अनेक उत्पादन बनवण्याची गरज आहे, हे लक्षात घेतल्यावर नवनवीन उत्पादन ते बाजारात आणू लागले आणि दर्जा राखून योग्य दरात ती ग्राहकांसाठी उपलब्ध केल्यामुळे उत्पादनांना चांगली बाजारपेठ मिळाली. आज ३५ वर्षांत पितांबरीची ७० हून जास्त उत्पादन १४५ SKU मध्ये बाजारात आहेत. पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि.ची सुरुवात १९८९मध्ये रवींद्र प्रभुदेसाई आणि त्यांचे वडील स्वर्गीय वामनराव प्रभुदेसाई यांनी लहान घरगुती व्यवसाय म्हणून केली होती. हळूहळू ती एक आघाडीची उत्पादन आणि विपणन कंपनी बनली. होमकेअर डिव्हिजनमध्ये एफएमसीजी उत्पादनांसह सुरुवात करून, आता कंपनीचे एकाच छताखाली १० विभाग आहेत. होमकेअर, हेल्थकेअर, फूड प्रॉडक्ट्स, अग्री केअर, अग्रो टुरिझम, मॉडर्न ट्रेड, एक्स्पोर्ट अशा मुख्य विभागात पितांबरीचा उद्योग पसरला आहे. एखादा मोठं कार्य उभ राहण्यासाठी काहीतरी निमित्त घडतं तसंच कारण रवींद्र प्रभुदेसाई यांच्या बाबतीत घडलं. जागतिक मराठी व्यापार परिषदेच्या एका कार्यक्रमाला गेले असताना त्या वेळचे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री मनोहर जोशी यांनी विचारलं की, इथल्या प्रेक्षकांमध्ये शंभर कोटींच्या वर टर्न ओवर असलेले किती उद्योजक आहेत? त्यावेळी त्या ठिकाणी एकही हात वर गेला नाही. ते पाहून स्वतः मनोहर जोशी सुद्धा काहीसे निराश झाले. त्यावेळी प्रभुदेसाई यांच्या कंपनीचा टर्नओव्हर केवळ दहा कोटी होता. तेव्हाच त्यांनी ठरवलं की आपल्याला आपली कंपनी शंभर कोटीवर न्यायची आहे आणि त्यातूनच व्यवसाय वाढवण्याच प्रोत्साहन, उर्मी त्यांना मिळाली. कार्यक्रम संपल्यावर प्रभुदेसाई मनोहर जोशींना भेटायला गेले आणि त्यांना म्हणाले की, पुढच्या दहा वर्षांत मी माझा उद्योग शंभर कोटींपर्यंत नेईन त्यानंतर जेव्हा जेव्हा मनोहर जोशी त्यांना भेटत तेव्हा त्यांना किती टर्न ओव्हर झाला? असा प्रश्न विचारत.
प्रभुदेसाई यांच्या लक्षात आलं होतं की धंद्यात वाढ होण्यासाठी अनेक उत्पादन आणि विविध राज्यात आणि जगभरात आपल्याला उत्पादन पोहोचवावी लागतील आणि म्हणूनच त्यांनी महाराष्ट्राबाहेर मार्केटिंग सुरू केलं. आज त्यांच्या उत्पादनांची वीसहून अधिक देशात निर्यात होत आहे. उत्पादनात अभिनवता आणल्यानं पितांबरी रूपेरी सिल्वर शाईन, क्युअर ऑन प्लस पेन रिलीफ ऑईल, रूचियाना गूळ पावडर, रूचियाना खरवस, लाईम सॉस कंठकेर सिरप, वटी, बाम ही पितांबरीची उत्पादने ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. कंपनीला DNV, नेदरलँड्सकडून ISO ९००१-२००८ प्रमाणपत्रे प्राप्त झाली आहेत तसेच अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. रवींद्र प्रभुदेसाई स्वतः संशोधनाला खूप महत्त्व देतात. सऱ्याच्या उत्पादनाची कॉपी न करता स्वतः संशोधन करून काहीतरी नावीन्यपूर्ण-अभिनव प्रॉडक्ट तयार केलं तर त्याला उत्तम बाजारपेठ मिळते असा प्रभुदेसाई यांचा विश्वास आहे. त्यामुळे त्यांचं स्वतःचं नवी मुंबईतील रबाळे येथे १०,००० चौरस फूट क्षेत्रात सुसज्ज असे ‘रिसर्च अँड डेव्हलपमेंट’ युनिट सुद्धा आहे. भारत सरकारने त्याला मान्यताप्राप्त R&D केंद्र म्हणून प्रमाणित केले आहे. प्रभुदेसाई अस्सल ठाणेकर आहेत. हेड ऑफिस ठाण्याला असून त्यानी विविध ठिकाणी आपले कारखाने उभे केले आहेत. जवळपास १३०० सक्षम मनुष्यबळ त्यांच्या कंपनीत कार्यरत आहेत. कंपन्यांमधील प्रमुख निर्णय संशोधन आणि विकासाच्या आधारे घेतले जातात. स्पर्धा, उत्पादन प्रक्रिया आणि पद्धती झपाट्याने बदलत आहेत. नावीन्यपूर्ण आणि दर्जेदार उत्पादने देऊन आधुनिक ट्रेंडशी सुसंगत राहणं गरजेचं आहे हे त्यांनी ओळखलं आहे. संशोधन आणि विकास ही उद्योगाची मूळ ताकद आहे, असं प्रभुदेसाई सांगतात. कंपनीचा २०१५ साली १०० कोटींचा टर्न ओव्हर झाल्यावर रवींद्र
प्रभुदेसाई, मनोहर जोशी यांना भेटायला गेले आणि त्यांना दिलेलं आश्वासन पूर्ण केल्याचं सांगितल. जोशी सरांच्या चेहऱ्यावर पाहिलेला आनंद हेच आपल्या मेहनतीचं फळ आणि प्रोत्साहनाचं गमक आहे, असं प्रभुदेसाई आवर्जुन सांगतात. व्यवसाय वृद्धीच आणखी एक मोठं कारण असतं ते म्हणजे काळाबरोबर चालणं. किराणा दुकानदारांबरोबर आता मोठमोठे मॉल्स् आले आहेत. अशा मॉल्समध्येही पितांबरीची उत्पादनं त्यांनी पोहोचवली. ग्राहकांना घरबसल्या उत्पादन मिळावी म्हणून विविध ई-कॉमर्स साईटसवर सुद्धा पितांबरी उत्पादनं उपलब्ध आहेत. कृषी क्षेत्रात सर्वसमावेशक काम करावं, यासाठी पितांबरीने ‘ऍग्री केअर’ डिव्हिजन सुरू केली. यामार्फत पितांबरी गोमय सेंद्रिय खत, नीम पावडर, पितांबरी सुबहर लिक्वीड फर्टिलायजर अशी उत्पादने घेतली जातात. याशिवाय खास शेतकऱ्यांसाठी ‘नर्सरी फ्रँचायसी’ हे बिजनेस मॉडेल ही त्यांनी सुरू केले आहे. ज्यामुळे खात्रीशीर आणि जातिवंत रोपांच्या विक्रीतून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आज ३५ हून अधिक पितांबरी नर्सरी फ्रँचायसी यशस्वीपणे कार्यरत आहेत. उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘पितांबरी शॉपी फ्रँचायसी’ हे बीजनेस मॉडेल खास उद्योजकांसाठी सुरू केले आहे. या अंतर्गत दुकानदार तसेच व्यावसायिकांना पितांबरी उत्पादनांच्या विक्रीतून उद्योग वाढीस चालना मिळू शकते. जवळपास ११५ हून अधिक पितांबरी शॉपी फ्रँचायसी आज भारतभरात यशस्वीपणे सुरू आहेत.
आज अमेरिका, मलेशिया, दुबई, दक्षिण आफ्रिका, रशिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया अशा २० देशांमध्ये पितांबरीची उत्पादने निर्यात होतात. जगभरातील पाच कोटी ग्राहक पितांबरीची उत्पादने वापरतात. आज एमबीए फायनान्स, मार्केटिंग या क्षेत्रातलं उच्चशिक्षण हल्लीची मुलं घेतात; परंतु याचा खरोखरच उद्योग सुरू करण्यासाठी उपयोग होतो का? असं प्रभुदेसाई सरांना विचारलं असता ते म्हणाले की, मी सुद्धा यातला डिप्लोमा इन बिजनेस मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. माझा मुलगा परीक्षित प्रभुदेसाई यानेही एमबीए पूर्ण केलं आहे. या थिअरीटीकल अभ्यासाचा सुद्धा उपयोग होतो; परंतु तो आपण करून घेतला तर आज माझा मुलगा एमबीए करून अगदी प्रॉडक्शनपासून मार्केटिंगपर्यंत सर्व अनुभव घेत घेत तयार झाला आहे व आज कंपनीची व्हॉईस चेअरमन म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. त्यामुळे शिक्षण कधीही वाया जात नाही मात्र त्याचा वापर करून घेता आला पाहिजे. ‘पितांबरी देवभक्ती अगरबत्ती’ हे उत्पादन निर्माण करताना कोकणात जागा घेऊन स्वतःच फूल शेती करून उदबत्ती उत्पादन त्यांनी सुरू केलं. देवभक्ती अगरबत्ती रेंजमध्ये सेवन इन वन अगरबत्ती सोबतच आता देवभक्ती गुरू उपासना, श्रीराम उपासना, कुलदेवी उपासना, श्रीकृष्ण उपासना अगरबत्ती तर ग्रह दोष निवारण अगरबत्तीमध्ये शनी उपासना साडेसाती स्पेशल अगरबत्ती आणि राहू दोष निवारण अगरबत्ती अशा अभिनव अगरबत्तीचा समावेश आहे. त्याच वेळेस कोकणासारख्या निसर्गरम्य भागात पर्यटन का सुरू करू नये? स्थानिकांना रोजगारही मिळेल असं वाटल्यावर त्याच ठिकाणी आणखी जागा विकत घेऊन पर्यटन उद्योगांमध्ये देखील झेप घेतली. त्या ठिकाणी अद्ययावत रेस्टॉरंट, राहण्याची सोय उपलब्ध करून दिली आणि त्यामुळे आज कोकणातील दापोली आणि तळवडे येथे ‘पितांबरी ऍग्रो टुरिझमच्या’ माध्यमातून पितांबरीचा पर्यटन व्यवसायामध्ये सुद्धा पाया रचला गेलाय. आता ३५ वर्षांनंतर पितांबरी प्रॉडक्ट्स खूप भरभराटीला आली आहे; परंतु कधीकधी निराशेचे, पराभुततेचे क्षणही आले असतील. अशावेळी आपण त्यावर मात कशी केलीत? असे विचारले असता प्रभुदेसाई म्हणाले की, धंद्यात काय किंवा आयुष्यात असे क्षण बऱ्याचवेळा येतात पण त्यावर आपण सकारात्मकतेने वाट काढली पाहिजे. मी सुद्धा जेव्हा अनेक उत्पादन घ्यायचं ठरवलं आणि २००० साली फक्त विक्रीकडे लक्ष देत होतो. मग अनेक ठिकाणी पैसे अडकले, येणी वाढली. त्यामुळे मनावरील ताण येऊन दडपण येत होतं. मग मानसिक संतुलनासाठी मी साधना करू लागलो. कोणतीही साधना करा पण साधना आपल्याला मन शक्ती देते. माझ्या गुरूंनी मला सांगितलं की, उद्योग ही सुद्धा साधनाच आहे. तू साधना समजून उद्योग कर, म्हणजे स्ट्रेस, फ्रस्ट्रेशन येणार नाही. त्यानंतर नामस्मरण वगैरेही सुरू केलं आणि मग कधीच स्वतःला मानसिक ताण येऊ दिला नाही.
आज अनेक मराठी युवक उद्योगात शिरू इच्छितात, तुम्हाला गुरुस्थानी देखील मानतात. त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? यावर ते म्हणाले की, प्रथमतः तर तुम्ही व्यवसायाचं नियोजन करा. उत्पादन सुरू झालं की वार्षिक नियोजन करा. वार्षिक आराखडा घ्या, कुठे चुकलंय? कुठे जास्त लॉस होत आहे? हे लक्षात घेऊन पुढे जा. ब्रेन स्टर्मिंग, फंड फ्लो पण विचारात घ्या. पितांबरी शायनिंग पावडर भारतभर पोहोचली आहे. तशीच इतर उत्पादने ही देशभरातील ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यासाठी पितांबरीची वाटचाल सुरू आहे आणि त्याच उत्पादनांवर समाधान न मानता कालानुरूप उत्पादन घेत राहण्याचे देखील प्रभुदेसाई यांचं मिशन आहे.
joshishibani@yahoo. com