Friday, December 13, 2024
Homeताज्या घडामोडीगुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतरच्या उपचारात क्रांती आणणारे यंत्र विकसित

गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतरच्या उपचारात क्रांती आणणारे यंत्र विकसित

नवी दिल्ली: आयआयटी रोपडने गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर गुडघ्याच्या सांध्यांचे नियंत्रण, हालचाल, ताकद पुन्हा मिळवण्यासाठीच्या उपचार पद्धतीत नवोन्मेषी उपाय शॊधला आहे. यामुळे सीपीएम म्हणजे कंटिन्यूअस पॅसिव्ह मोशन उपचार पद्धती अधिक सुलभ आणि किफायतशीर होणार आहे. आयआयटी रोपडने गुडघा पुनर्वसनासाठी संपूर्णपणे यांत्रिक पॅसिव्ह मोशन (परनिर्मित हालचाल) यंत्र विकसित केले असून त्याला पेटंट (क्र. ५५३४०७) मिळाले आहे.

पारंपरिक मोटारवर चालणारी सीपीएम यंत्रे महाग असून विजेवर अवलंबून आहेत. नव्याने विकसित हे यंत्र मात्र पूर्णपणे यांत्रिक असून वीज,बॅटरी किंवा मोटरची आवश्यकता भासणार नाही, अशा प्रकारे त्याची रचना केली आहे. हे यंत्र वजनाला हलके असून कुठेही नेण्यासारखे आहे.

ग्रामीण भागात वीज पुरवठा सुरळीत नसलेल्या ठिकाणी हे यंत्र अत्यंत उपयोगाचे ठरणार आहे. हे कुठेही नेता येण्यासारखे असल्यामुळे रुग्ण ते घरीही वापरू शकतो. यामुळे रुग्णालयात अधिक दिवस राहण्याची आवश्यकता तसेच उपचारासाठीच्या भेटी कमी होतील.

गुडघ्यावरच्या शस्त्रक्रियेनंतर सांध्याची हालचाल सुधारण्यासाठी,लवकर बरे होण्यासाठी सीपीएम उपचार पद्धती अत्यंत महत्त्वाची आहे. सर्वांसाठी आरोग्यसेवा सहज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हे यंत्र महत्त्वपूर्ण पाऊल आहे. विशेषतः जिथे संसाधनांची कमतरता आहे, तिथे हे यंत्र उपयुक्त असून ते पर्यावरणपूरकही आहे. जगात इतरत्रही हे यंत्र उपयुक्त ठरणार आहे.

“ग्रामीण भागात प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञान मर्यादित असलेल्या ठिकाणी गुडघा पुनर्वास उपचार पद्धतीत क्रांती घडवण्याची क्षमता या यंत्रात आहे.”असे संशोधन चमूतील प्रमुख संशोधक डॉ.अभिषेक तिवारी यांनी सांगितले.सूरज भान मुंडोतिया आणि डॉ. समीर सी. रॉय यांचाही या चमूत समावेश आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -