मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. अशातच महायुती आणि महाविकास आघाडीमधील संघर्ष आता कमालीचा तीव्र झाला आहे. सोमवारी मुंबईच्या चांदिवली परिसरात याचा प्रत्यय आला. सोमवारी रात्री या परिसरातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा ताफा जात होता. चांदिवली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नसीम खान हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकनाथ शिंदे यांचा ताफा त्यांच्या कार्यालयाबाहेरुन जात होता. काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यावेळी एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी ‘गद्दार, गद्दार’च्या घोषणाही देण्यात आल्या. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून संतोष कटके या तरुणाने अपशब्द वापरले. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या संतापाचा पारा चढलेला पाहायला मिळाला.
नेमकं प्रकरण काय?
मुख्यमंत्री शिंदेंचा रौद्रावतार कॅमेरामध्ये चित्रित झालेला आहे. सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. काल संतोष कटके यानी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला आणि त्याने ‘गद्दार गद्दार’ अशा घोषणा केल्या होत्या. गद्दार घोषणा देणाऱ्यांवरती मुख्यमंत्री शिंदे संतापले. संतोष कटके जो कार्यकर्ता होता त्याने काही अपशब्द मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी वापरले. मुख्यमंत्री त्यामुळे प्रचंड चिडले. गाडीतून रागातच ते खाली उतरले आणि समोर असलेल्या नसीम खान यांच्या कार्यालयात रंगात चालत गेले. तेथील काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना, ‘ऐसा सिखाते हे क्या आप लोग?’, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी जाब विचारला. यानंतर संतोष कटके आणि काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मात्र, नंतर त्यांना सोडून देण्यात आले.
संतोष कटकेला ठाकरेंची फूस
संतोष कटकेचे वडील साधू कटके हे आरपीआय (आठवले गट) पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. संतोष कटके यांनी थेट मुख्यमंत्र्यांचा ताफा आडवल्यामुळे त्याला उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावून घेतले. आज संतोष कटके हे सकाळीच मातोश्रीवर गेले होते. यावेळी संतोष काटके यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.