पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांनी महाराष्ट्रात वातावरण चांगलेच पेटले आहे आणि महायुतीच्या विजयाची ग्वाही तर मिळालीच. पण मोदी यांच्या सभांनी ठिकठिकाणी म्हणजे धुळे, नाशिक आणि अकोला येथील सभेत काल काँग्रेसवर हल्ला बोल केला आणि काँग्रेसच्या प्रचाराच्या धज्जीया उडवल्या. मोदी यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवरच मुख्यतः आरोप केले आणि यावरून स्पष्ट झाले की आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा मुख्य शत्रू हा काँग्रेसच आहे. काँग्रेसने गेल्या सत्तर वर्षांत देशाला किती विकासाच्या मागे नेले आणि देशाला किती मागास ठेवले आणि इतर जातीपातींचे राजकारण करत कसे देशाला एकमेकांशी झुंजत ठेवले याचा लेखाजोखा मोदी यांनी आपल्या भाषणात ठिकठिकाणी मांडला. त्यांच्या या भाषणांचा मुख्य भर हा काँग्रेसच्या देश विघातक राजकारणावर होता आणि त्यासाठी मोदी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रत्येक भारतीय मतदाराला सावध राहावे लागेल असा इशारा दिला. दलित, ओबीसी आणि एसटी आदिवासींमध्ये फूट पाडण्याचा काँग्रेसचा डाव उधळून लावा असे आवाहन त्यांनी नांदेडच्या सभेत केले.
मोदी यांच्या आवाहनामुळे आदिवासींना तसेच दलितांना आपल्या नावावर काँग्रेसने कसे फेक नरेटिव्ह लोकसभेच्या वेळेस सेट केले होते याची चांगलीच जाणीव झाली. यावेळी दलित आणि आदिवासी तसेच अन्य मागास जाती काँग्रेसच्या या फेक नरेटिव्हच्या जाळ्यात फसणार नाहीत याचा पुरावा मोदींच्या सभांना झालेल्या गर्दीवरून दिसून आला आहे. मोदींच्या भाषणांत प्रामुख्याने काँग्रेसवर जशी जोरदार टीका होती तशीच ती महाविकास आघाडीवर होती. महाविकास आघाडीने विशेषतः उबाठा यांनी काँग्रेसशी हातमिळवणी करून भाजपाला त्याचा न्याय हक्क दिला नाही आणि अडीच वर्षांसाठी स्वतःच मुख्यमंत्री कसे बनले आणि त्यात शिवसैनिकांनाही कसे फसवले याचा लेखाजोखा मोदी यांनी मांडला. त्यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात मोदी यांना प्रतिसाद दिला. काँग्रेसकडून विभाजनाची विखारी भाषा केली जात असल्याचे मोदी यांनी ठणकावून सांगितले. त्यामुळे यंदाची निवडणूक ही अत्यंत सावध राहून प्रत्येकाला सामोरे जावे लागणार आहे हे मोदी यांचे प्रतिपादन निश्चितच डोळ्यांत अंजन घालणारे आहे.
महाराष्ट्रात हरियाणाची पुनरावृत्ती होईल याचे मोदी यांचे प्रतिपादन कुणालाही पटणारे होते. कारण हरियाणात काँग्रेसने फेक नरेटिव्ह सेट केला होता. पण अखेरीस हरियाणात काँग्रेस पूर्वीपेक्षा जास्त फरकाने हरली. त्याचीच पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार आहे हे मोदी यांचे प्रतिपादन निश्चितच लोकांना पटणारे होते. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक वाक्यावाक्याला टाळ्यांचा कडकडाट होत होता. मोदी यांच्या सभांना अकोल्यात चांगला प्रतिसाद मिळाला आणि अकोला हा भाग, तर एकेकाळचा भाजपाचा गडकिल्ला समजला जात होता. त्यामुळे त्या जिल्ह्यातील सभेला जोरदार प्रतिसाद मिळणार हे उघडच होते. या सर्व प्रचारसभांवरून एक बाब स्पष्ट होते ती अशी की मोदी यांनी प्रमुख लक्ष्य काँग्रेसला केले आहे, कारण काँग्रेसनेच त्यांना फेक नरेटिव्ह सेट करून लोकसभा निवडणुकीत पराभूत केले होते. ही चूक भाजपा पुन्हा विधानसभेला होऊ देणार नाही अशी ग्वाही मोदी यांच्या सभांना मिळाली आहे. धुळे आणि नाशकात पंतप्रधानानी महायुतीसाठी जोरदार बॅटिंग केली, तर दूर गेलेल्या आदिवासी मतदारांना साद घालत जवळ आणण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे मोदी यांची सभा म्हणजे भाजपासाठी विजयाची गॅरंटी दिली आहे असे वाटते. धुळे आणि नाशिकमध्ये पंतप्रधानांनी जोरदार बॅटिंग लावून भाजपासाठी जोरदार प्रचाराची पेरणी केली.
मोदी यांच्या या सभांमध्ये विविध समाजघटकांना आकर्षित करून घेण्याच्या योजनांचा सपाटा होता आणि त्यातही आचारसंहितेत भाजपा कसा अडकला जाणार नाही याचे भानही होते. त्यामुळेच कृषी बहुल नाशिकमध्ये मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेची मदत १२ हजारांवरून १५ हजार रुपये करण्याची घोषणा केली आणि महायुतीच्या विजयाची पायाभरणी केली असे म्हणायला हरकत नाही. त्याचबरोबर केंद्र आणि राज्य सरकार एकाच विचाराचे असले, तर देशात मतदारांनाही जनताभिमुख निर्णय घेण्यास ते सोयीचे पडते असा विश्वास मोदी यांनी आपल्या भाषणातून दिला. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्होट जिहादचा मुद्दा धुळ्यातील प्रचारसभेत काढला आणि यामुळे भाजपाला असलेल्या संभाव्य धोक्याच्या परिणामाची कल्पना दिली. त्यांचा हा मुद्दा निश्चितच दुर्लक्षणीय नव्हता. या फेक नरेटिव्ह आणि मुस्लीम व्होट जिहादनेच भाजपाला धुळ्यात हरवले होते.
काँग्रेसने सातत्याने दलितांना विरोध केला आहे आणि हेच मोदी यांनी सांगितले. मोदी यांनी सांगितले की पंडित नेहरूंच्या काळापासून दलितांचा द्वेष केला जात होता आणि आजही राहुल गांधी दलितांना जातीनिहाय जनगणनेचे गाजर दाखवत त्यांच्या मतांवर डोळा ठेवून आहेत असे मोदी यांचे प्रतिपादन निश्चितच देशाल जागृक करणारे आहे. नेहरूंच्या काळापासून काँग्रेसने हा फेक नरेटिव्ह सेट केला आहे आणि आता याचा बीमोड केला पाहिजे हे मोदी यांचे धुळ्यात किंवा अकोला आणि नाशिकमधील सभेत केलेले प्रतिपादन हे निश्चितच डोळ्यांत अंजन घालणारे आहे. मोदी यांनी महाराष्ट्र गाजवला आहे, तर भाजपाचे दुसरे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी साखर पट्ट्यात काँग्रेसच्या आत्मघातकी धोरणामुळे महाराष्ट्राची कशी वाट लागली आहे हे जीव तोडून सांगितले. एकूणच काय तर या दोन भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या प्रचारांच्या सभांनी महाराष्ट्र पिंजून निघाला असून महायुतीत विजयाची चाहुल लागली आहे. महायुतीच विजयाचा गुलाल उधळणार. हे आता स्पष्ट झाले आहे. त्यात लाडकी बहीण योजना महायुतीच्या दिमतीला आहेच, त्यामुळे महायुतीचे पारडे जड आहे हे सांगण्याची भविष्यवेत्याची गरज नाही.