अल्पेश म्हात्रे
मुंबई जागतिक पातळीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगत शहर मानले गेले असले तरी शहराची परिस्थिती पाहता ही खूप गुंतागुंतीची व बकालतेची दिसते. एकीकडे उंचच उंच बांधले गेलेले टॉवर दुसरीकडे घनदाट परिस्थितीत असलेल्या झोपडपट्ट्या हे शहराची सर्वसामान्याची व गरीब लोकांची जगण्याची तफावत दर्शवून देते, तर दुसरीकडे आपल्या रोजच्या प्रपंचाच्या नादात असलेला मध्यमवर्ग दिवस-रात्र काम करताना दिसतो. मुंबईच्या समस्या मांडाव्या एवढ्या कमीच आहे. त्यातच आरोग्य, समस्यांची स्थिती विविध तशी समाधानकारक नाही. नुकताच मुंबईतील आरोग्य सेवा, मुख्य आजारांचा प्रादुर्भाव, श्वसनाचे आजार आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या यांच्यावर एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यात बऱ्याच अंशी काही भयानक गोष्टी समोर आल्या. ज्या खरंच मुंबईकरांना विचार करण्यास प्रवृत्त करणाऱ्या आहेत. जीवन शैलीशी निगडित मधुमेहासारख्या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या २०१४ साली २४२८ होती. जी २०२२ पर्यंत १४,२०७ झाली. मधुमेहाच्या मृत्यूच्या संख्येत ४८५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आता मृत्यूच्या कारणांमध्ये मधुमेह सर्वात वरचे कारण ठरत आहे. आजाराचे हे प्रमाण आटोक्यात आणणे खूपच जरुरीचे आहे. त्यासाठी शहरी नियोजन आणि विकासाच्या संदर्भात भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे शहरी आणि प्रादेशिक विकास योजना आखणी आणि अंमलबजावणी दिशा निर्देश महत्त्वाचे असून त्यांचे पालन होणे अत्यंत गरजेचे आहे.
व्यक्तीचे आरोग्य स्वास्थ आणि शारीरिक हालचालींकरता दरडोई किमान दहा चौरस मीटर खुली जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे. मात्र मुंबई विकास आराखडामध्ये दरडोई केवळ तीन चौरस किलोमीटर खोली जागा प्रस्तावित केली आहे. मुंबईत दर व्यक्तीमागे उपलब्ध खोली जागा वाढवण्यासाठी त्वरित पावले उचलण्याची गरज यावरून अधोरेखित होत आहे. तसेच नागरिकांचे आरोग्य व स्वास्थ जपण्यासाठी उपलब्ध पायाभूत सेवा सुविधा पुरेशा नसून त्या विस्तारण्याची गरज आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरत चालली आहे. २०१९ ते २०२२ या कालावधीत शहरातील सरासरी हवेच्या गुणवत्तेची घसरण समाधानकारक वरून मध्यम समाधानकारक वर झाली आहे. याच कालावधीत श्वसनाचे गंभीर आजारामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या ३३ हजार ७११ होती, तर आणखी १६,३४५ जणांचे मृत्यू टीबीमुळे झालेले आहेत. हवा प्रदूषणाचा जबरी फटका नागरिकांना बसत आहे. २०२३ मध्ये हीच हवेची गुणवत्ता आणखी घसरली आहे. कारण वर्षभरात हवेची गुणवत्ता एकाही महिन्यात चांगली नव्हती हे गंभीर आहे. मुंबईत दिशा निर्देशनाच्या तुलनेत ५२५ दवाखाने कमी आहेत. शहरात सध्या महापालिकेचे १९१ दवाखाने अस्तित्वात आहे; परंतु यातील ९५ टक्के दवाखाने दिवसाचे केवळ सात तास चालू असतात. २०२२ पासून वाढवत महापालिकेने २०७ हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे क्लिनिक सुरू केली. आरोग्य सेवा विस्तारण्यासाठी उचललेले पाऊल चांगले होते; परंतु २०७ पैकी केवळ ९७ क्लिनिक आधीच्याच महापालिका दवाखान्यांमध्ये चालवली जातात आणि केवळ सहा टक्के म्हणजेच २०७ पैकी १३ दवाखाने १४ तास सेवा देतात. आरोग्य सेवांची उपलब्धता वाढवण्यासाठी सर्व महापालिका दवाखाने १४ तास चालू राहिले पाहिजेत. विशेषत: झोपडपट्टी बहुल प्रभागांमध्ये जिथे लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे तिथे दवाखान्याची सर्वाधिक गरज आहे. २०१८-१९ ते २०२५ या सात वर्षांत महापालिकेने आरोग्याचे बजेट ३६३७ कोटींवरून ७१९१ कोटी आहे. म्हणजेच त्यात ९८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या दशकात मुंबई महापालिका दवाखान्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता तिप्पट झाल्याचे आढळून आले आहे.
२०१४ साली हे प्रमाण वाढून १२ टक्क्यांनी वाढून हे प्रमाण ३७% झाले आहे. दर पंधरा हजार लोकसंख्येमागे एक दवाखाना पाहिजे असा शहरी आणि प्रादेशिक विकास योजना आखणी आणि अंमलबजावणी दंडक असून २०२३ पर्यंत त्याची पूर्तता मुंबईतील एकही वार्डामध्ये झालेली नाही. गेल्या तीन वर्षांपासून महापालिका निवडणूक प्रलंबित आहेत. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थित महापालिकेचा कारभार चालू आहे. त्यामुळे सक्रिय आरोग्य समिती अस्तित्वात नाही. मुंबईतील आरोग्याची सद्यस्थिती सुधारण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था कार्यक्षम करण्यास प्राधान्य द्यायला हवी आणि यासाठी नागरिकांनी पुढाकार व सहभाग घ्यायला हवा. आरोग्य संबंधित तसेच मृत्यू आजारासंबंधी डेटा तत्काळ संकलित होण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य व्यवस्थापन माहिती यंत्रणा पूर्णत: कार्यान्वित करणे गरजेचे आहे. महापालिकेने मुंबईकरांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि जागतिक दर्जाचे शहर म्हणून मुंबईचे स्थान उंचावण्यासाठी खुल्या जागांच्या विस्तारण्याला आणि आरोग्य सेवा सक्षम करण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवे. नागरिकांचे आरोग्य व जीवनशैली सुधारण्यासाठी केलेल्या अशा बदलांमुळे जीवनशैली निगडित आराजाचे आव्हान आटोक्यात यायला मदत होईल.