मुंबई: महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई करत सुमारे २.६७ कोटी रुपयांचे साडेतीन किलो सोने जप्त केले. अबुधाबीहून सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न केला जात होता. यात विमानतळावर काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. डीआरआयला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, अबुधाबीहून येणाऱ्या विमानातून हे सोने आणले जाणार होते. त्याप्रमाणे डीआरआयने विमानतळावर सापळा रचला आणि ग्राहक सेवा प्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्यास ताब्यात घेतले. तिच्याकडून झडती घेतल्यावर ३,३५० ग्रॅम सोन्याची पेस्ट आढळली.
तिच्या चौकशीतून ग्राउंड स्टाफ सदस्याचाही यात सहभाग असल्याचे उघड झाले. या दोघांनी सोने विमानातील कर्मचऱ्याच्या कंटेनरमधून बाहेर काढून तस्करीचा प्रयत्न केला होता. डीआरआयच्या माहितीनुसार, महिला कर्मचाऱ्याला सोने पुढे सुपूर्द करण्यासाठी एक व्यक्ती येणार होता. मात्र, त्या आधीच डीआरआयने दोन्ही कर्मचाऱ्यांना अटक केली. सेलेबी एनएएस एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया प्रा. लि.च्या ग्राउंड हँडलिंग स्टाफ सदस्यासह या महिला कर्मचाऱ्याचा या कारवाईत सहभाग आढळला आहे. डीआरआयने जप्त केलेल्या सोन्याची किंमत सुमारे दोन कोटी ६७ लाख रुपये आहे. पुढील तपास सुरू असून या प्रकरणातील तस्करीचे विस्तृत जाळे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.