पुणे : महाविकास आघाडीतील काँग्रेसची तीन राज्यात सरकार आहे. त्या ठिकाणी काँग्रेसने जेवढी वचने दिली, आश्वासने दिली आणि गॅरंटी दिली. त्यापैकी अनेक गॅरंटी पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या गॅरंटी म्हणजे निश्चित फसवणूक करण्याचा जाहीरनामा आहे, अशी टीका भाजपचे नेते, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी केली.
जावडेकर म्हणाले, हिमाचल प्रदेशात काँग्रेसने दरवर्षी एक लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात दीड लाख सरकारी पद त्यांनी रद्द केली. पुढील दोन वर्ष भरती न करण्याचा निर्णय घेतला. दुसरे आश्वासन जुनी पेन्शन देण्याचे होते. परंतु, प्रत्यक्षात सध्याचा पगारच वेळेवर मिळत नाही अशी व्यथा आहे.
कर्नाटकमध्ये काँग्रेसने दोन लाख युवकांना दरमहा तीन हजार रुपये बेरोजगार भत्ता देण्याचे गॅरंटी दिली होती. प्रत्यक्षात तोंडाला पाने पुसली आहेत. महिलांना मासिक दोन हजार रुपये देण्याचे मान्य करून प्रत्यक्षात गेल्या दोन महिन्यात हे पेन्शन देण्यात आले नाही.
तेलंगणामध्ये बेरोजगार आणि महिला पेन्शन दिलेच नाही. त्यामुळे काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या गॅरंटी म्हणजे निश्चित फसवणूक करण्याचा जाहीरनामा आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मध्यंतरी एक लेख लिहून देशातील उद्योग जगतामध्ये मक्तेदारी होऊन, ठराविक उद्योगांनाच वाव मिळतो,अशी मांडणी केली आहे. परंतु, ही सर्वथा धूळफेक आहे. अशी व्यवस्था काँग्रेस सत्तेत असताना होती. तेव्हा लायसन्स, परमिटराज होते. आता व्यवस्था नीट झाल्यामुळे नवे उद्योग फार मोठ्या संख्येने स्थापन होत आहेत. मक्तेदारी आणि काही लोकांनाच उद्योगाला लायसन्स परमिट देण्याचे काम काँग्रेस करत होते. मोदी सरकारच्या काळात,उद्योगधंद्यांचे लोकशाहीकरण झाले असून, सर्वांना उद्योग करायला आता खऱ्या अर्थाने प्रोत्साहन मिळत आहे, असेही जावडेकर (Prakash Javadekar) यांनी सांगितले.