Chief Justice of India Sanjiv Khanna : न्यायाधीश संजीव खन्ना यांनी देशाचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात आज संजीव खन्ना यांच्या सरन्यायाधीश पदाचा शपथविधी पार पडला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संजीव खन्ना यांना सरन्यायाधीशपदाची शपथ दिली. भारताचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून खन्ना यांनी कार्यभार स्वीकारला आहे. अनेक ऐतिहासिक खटल्यांचा निकाल संजीव खन्ना यांनी दिला आहे. कलम ३७० रद्द करणे, इलेक्टोरल बॉण्ड रद्द करणे अशा अनेक महत्त्वाचे निर्णय देणाऱ्या खंडपीठाचे ते सदस्य होते.
संजीव खन्ना हे नवे सरन्यायाधीश
भारताचे नवे सरन्यायधीश संजीव खन्ना यांचा कार्यकाळ १३ मे २०२५ पर्यंत असणार आहे. सर्वोच्च न्यायालयात नवनियुक्त सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी आतापर्यंत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान २६ एप्रिल रोजी त्यांनी VVPAT आणि EVM यांच्यातील मतांची १०० टक्के जुळवाजुळव करण्याची मागणी फेटाळून लावली. त्यासोबतच संजीव खन्ना यांनीच इलेक्टोरल बाँण्ड असंवैधानिक असल्याचा निर्णय दिला होता. तसेच संजीव खन्ना यांनी मुख्य न्यायाधीश कार्यालयाला माहिती अधिकारात आणण्याचा निर्णय दिला होता. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून जानेवारी २०१९ मध्ये त्यांना बढती मिळाली.
Shri Justice Sanjiv Khanna sworn in as the Chief Justice of the Supreme Court of India at Rashtrapati Bhavan today pic.twitter.com/GltVkFYIAT
— President of India (@rashtrapatibhvn) November 11, 2024
संजीव खन्ना यांनी दिल्लीच्या मॉडर्न स्कूल आणि सेंट स्टिफन्स कॉलेजमधून शिक्षण घेतलेलं आहे. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी घेतलेली आहे. त्यांनी १९८३ साली तीस हजारी कोर्टात वकिलीला सुरुवात केली होती. 2005 साली ते दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. जानेवारी २०१९ मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून बढती मिळाली.