Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील आजवरच्या २० मुख्यमंत्र्यांपैकी मी एकटा मुख्यमंत्री आहे, ज्याचं मुंबईत स्वतःचे घर नाही. देवेंद्र फडणवीसने (Devendra Fadnavis) कधीही आपलं घर भरण्याचा विचार केला नाही. कधीही स्वतःचे उद्योग, व्यवसाय, शिक्षण संस्था उभारल्या नाहीत. माझे घर आजही नागपूर मध्येच आहे. असे म्हणत नागपूर दक्षिण पश्चिम (Nagpur South West Constituency) या स्वतःच्या मतदारसंघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मतदारांना भावनिक साद घातली आहे. दक्षिण पश्चिम नागपूरच्या प्रचार सभेत काल (रविवारी) रात्री उशिरा त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
नेमके काय म्हणाले फडणवीस?
तुम्ही ५ वेळा सातत्याने आमदार म्हणून निवडून दिले. कधी विरोधी पक्षात काम केलं, तर कधी मुख्यमंत्री म्हणून काम केलं, विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं, उपमुख्यमंत्री म्हणून ही काम केलं, मात्र मी महाराष्ट्रमध्ये या सर्व कारकिर्दीत आपल्या सर्वांची दक्षिण पश्चिम नागपूरच्या मतदारांची मान उंच ठेवली. कधीही तुम्हाला खाली पाहायला लावलं नाही. जो आमदार तुम्ही निवडून दिला त्या आमदाराने तुमचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात नंबर १ वर आणून दाखवले, हे मी गर्वाने बोलू शकतो.
२५ वर्ष झाली विधानसभेत काम करतो आहे, त्याच्याआधी नगरसेवक आणि महापौर ही राहिलो आहे. मात्र मी माझ्या या राजकीय वाटचालीत नेहमी समाजासाठी काम करण्याचा तत्व ठेवलं. स्वतःचा विचार मी कधीच केला नाही. देवेंद्र फडणवीसने कधीही आपलं घर भरण्याचा विचार केला नाही. कधीही स्वतःचा उद्योग किंवा शिक्षण संस्था उभी केली नाही. मेडिकल कॉलेज उभारले नाही. स्वतःचा व्यवसाय उभा केला नाही. फक्त तुमच्यासाठी काम केलं. म्हणून महाराष्ट्रात आजवर २० मुख्यमंत्री झाले, या २० मुख्यमंत्र्यांपैकी मी एकटा मुख्यमंत्री आहे, ज्याचं मुंबईत स्वतःचे घर नाही. आजही माझं घर नागपूर मध्येच आहे आणि मला नागपूरकर असल्याचा पूर्णपणे गर्व आहे. असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आज फडणवीसांची मालवणीत सभा
सोमवारी देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील मालवण परिसरात सभा होणार आहे. याठिकाणी भाजपचे विनोद शेलार निवडणुकीच्या रिंगणात असून हा परिसर मुस्लीमबहुल आहे. आज रात्री ९ वाजता राजे शहाजी मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. फडणवीसांची सभा लोखंडवालामध्ये वर्सोवा आणि गोरेगाव विधानसभेसाठी रात्री ८ वाजता होणार आहे. त्यामुळे मालाड पश्चिम मतदारसंघात देवेंद्र फडणवीस काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. भाजपकडून मालाड मालवणीत रोहिंग्या आणि बांग्लादेशींच्या घुसखोरीवर सातत्याने टीका केली जाते. धर्मांतर कायद्यासंदर्भात घोषणेनंतर मालाडमध्ये फडणवीसांच्या सभेकडे सर्वांचेच लक्ष लागलंय. ‘बटेंगे कटेंगे’वर फडणवीस पुन्हा बोलणार का?, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.