अमरावती: जयस्तंभ चौक परिसरातील कोतवाली पोलिस ठाण्यासमोर असलेल्या एका खेळण्याच्या दुकानाला सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत तेथील खेळणी व अन्य साहित्य जळून खाक झाले. त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. सुमारे तासभरानंतर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे १९ बंबाच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविले. या भीषण आगीची झळ महावितरणच्या विद्युत तारांना देखील पोहोचली. स्पार्किंगमुळे आगीत भर पडली.क्रिष्णानगर येथील रहिवासी विजय बजाज यांचे जयस्तंभ चौक- श्याम चौक मार्गावर बजाज खिलौना सेंटर आहे.
रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास दुकानातील वरच्या माळ्यावर अचानक आग लागली. ही बाब लक्षात येताच बजाज यांच्यासह कर्मचारी दुकानाबाहेर पडले. त्यांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली. त्याचवेळी आगीने रौद्र रूप धारण केले. दुकानाच्या वरच्या माळ्यावरून आग खालच्या माळ्यावर पसरली. त्यामुळे दुकानातून आगीचे प्रचंड लोळ निघू लागले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळ गाठून आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अथक परिश्रमाअंती एक तासानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. तोपर्यंत या आगीत दुकानातील खेळणेव अन्य साहित्य पूर्णतः जळून खाक झाले. या आगीची शेजारी असलेल्या अन्य एका खेळण्याच्या दुकानालाही काहीप्रमाणात झळ बसली. सिटी कोतवालीचे ठाणेदार मनोहर कोटनाके हेदेखील घटनास्थळी पोहोचले होते. तब्बल तीन तासानंतर ही आग आटोक्यात आली तो पर्यंत लाखो रुपयांचा माल जळून राख झाला होता.