प्रा. देवबा पाटील
आईने आज बटाटा-टमाट्याच्या भाजीला फोडणी दिली. आधीच बटाटा-टमाटा मिश्रित मसालेदार रस्स्याची चटकदार भाजी जयश्रीच्या आवडीची. त्यातही आता फोडणीचा खमंग वास सर्व घरभर पसरला नि तिच्या तोंडाला पाणी सुटले. न राहवून तिने विचारलेच,“आई, हे तोंडाला पाणी कसे सुटते गं?” आईने भाजीवर झाकण ठेवले व भाजी शिजत राहू दिली. कणकेची परात जवळ घेऊन त्या कणकेच्या छोट्या छोट्या पोळ्या करणे व तव्यावर टाकून शेकणे सुरू केले नि सांगायला सुरुवात केली, “आपल्या तोंडात लाळग्रंथी असतात. आपण जेव्हा अन्नाचा घास खातो तेव्हा या लाळग्रंथींतून तोंडात लाळ निर्माण होते व ती तोंडातील घासात मिसळून अन्नाला पाचक बनविते. या लाळग्रथींवर मेंदूतील मज्जासंस्थेचे नियंत्रण असते. जेव्हा लोणचे, चिंच, कैरीसारख्या एखाद्या आवडत्या पदार्थाची नुसती आठवणही झाली किंवा तो पदार्थ केवळ दुरूनही बघितला अथवा आवडत्या भाजीचा वा पदार्थाचा वास जरी आला तेव्हा संबंधित अवयव आपल्या मेंदूला तसे संदेश देतात आणि मज्जासंस्था लाळग्रंथींना जास्त लाळ निर्माण करण्याचा आदेश देते. त्यामुळे आपल्या तोंडात आपोआप भरपूर लाळ तयार होते. त्यालाच तोंडाला पाणी सुटणे असे म्हणतात.”
“आई आनंदात माणूस का हसतो?” जयश्रीने विचारले. “माणूस हा भावनाशील असल्याने प्रत्येक घटनेचा त्याच्या शरीरावर व मनावरही परिणाम हा होतच असतो. माणूस आनंदी असताना ज्या स्नायूंच्या साहाय्याने आपण श्वासोच्छ्वास करतो ते विशिष्ट प्रकारे हलायला लागतात. त्यामुळे ज्या स्नायूंच्या साहाय्याने आपला आवाज निघतो त्यांना गुदगुल्या होतात व तेही तसेच विशिष्ट प्रकारे हलायला लागतात. स्नायूंच्या या हालचालींसोबतच तोंडातून हा:हा:हा किंवा खि:खि:खि असे ध्वनी आपोआप बाहेर पडतात. तोंडाच्या या हालचालींना व ध्वनींनाच हसणे म्हणतात.” आईने हसत हसत सांगितले. “ दु:खात माणूस का रडतो गं आई?” जयश्रीने प्रश्न विचारला. “आपल्या डोळ्यांत पापण्यांच्या खाली अश्रुपिंड किंवा अश्रुग्रंथी असतात. कोणत्याही प्रकारच्या दु:खाच्या भावनांचा उद्रेक झाला म्हणजे या अश्रुग्रंथींवरील नियंत्रण आपोआपच सुटते व भरपूर प्रमाणात अश्रू निर्माण होतात नि ते डोळ्यांतून बाहेर वाहू लागतात. म्हणजे दु:खात माणूस आपोआपच रडतो. असे दु:खात रडल्याने मन आपोआप मोकळे होते, हलके होते व त्या दु:खाची तीव्रता कमी होते, दु:ख झेलणे सहज होते नि मग मन हळूहळू शांत होते.” आईने खुलासा केला. “आई एका दिवशी आमच्या वर्गात एक मुलगा एकाएकी बेशुद्ध पडला होता. असा एखादेवेळी मनुष्य बेशुद्ध कसा काय पडतो?” जयश्रीने विचारले.
“बेशुद्ध पडण्याची किंवा चक्कर येण्याची अनेक कारणे असतात. बेशुद्ध पडणे ही एक शारीरिक कमतरतेमुळे घडणारी एक क्रिया आहे. कोणत्याही बाह्य किंवा अंतर्गत कारणामुळे मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाह काही काळासाठी थांबतो. त्यामुळे प्राणवायूचा पुरवठा बंद होऊन मनुष्य बेशुद्ध पडतो. पण नंतर थोड्याच वेळात रक्तप्रवाह पुन्हा चालू होऊन मनुष्य शुद्धीवर येतो व सर्व काही ठीक होते. सहसा अन्न कमी प्रमाणात मिळाल्याने किंवा योग्य प्रमाणात न मिळाल्याने, पोट न भरल्यामुळे चक्कर येते किंवा मनुष्य बेशुद्ध पडतो.” आईने सांगितले. “बेशुद्ध व्यक्तीच्या नाकाला कांदा फोडून का लावतात गं आई?” जयश्रीने पुन्हा शंका काढली. आई सांगू लागली, “बऱ्याचदा माणूस बेशुद्ध पडल्यानंतर कांदा फोडून त्याला हुंगवतात किंवा त्याच्या नाकपुड्यांना लावतात. कांद्यामध्ये अमोनियाचे संयुग असते. कांदा फोडल्यानंतर या संयुगातून अमोनिया हा वायू बाहेर पडतो. त्याला उग्र व झिणझिण्या आणणारा वास असतो. तो वायू नाकातील त्वचेला झोंबतो व नाकातील मृदू त्वचेची खूप जळजळ होते. ही संवेदना जेव्हा मेंदूला पोहोचते तेव्हा मेंदूलाही झिणझिण्या लागतात व तो माणूस पटकन शुद्धीवर येतो. म्हणजे नाकातील ती जळजळ थंड करण्यासाठी मेंदू ताबडतोब त्यावर प्रतिक्रिया म्हणून त्या माणसाला त्वरित शुद्धीवर आणतो. तसेच जुने खेटर, बूट किंवा चप्पलसुद्धा हुंगावयास देतात. त्यातील उग्र वासाने हीच प्रक्रिया होते. या गोष्टी करेपर्यंत घरातील इतरांना त्या व्यक्तीला दवाखान्यात नेण्याची तयारी करता येते. या गोष्टी करूनही माणूस शुद्धीवर न आल्यास मात्र त्याला त्वरित दवाखान्यात डॉक्टरांकडे घेऊन जावे.”
“बरोबर आहे आई तू म्हणते ते. आता मी अभ्यासाला जाते,” असे म्हणून जयश्री तेथून उठली.