मुंबई : विक्रोळी परिसरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने साडेसहा टन चांदीच्या विटा असलेली व्हॅन जप्त केली आहे. मुलुंडमधील एका गोदामात चांदीच्या विटा नेण्यासाठी ब्रिंक्स या कंपनीच्या गाडीतून त्या नेल्या जात होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मालवाहतूक अधिकृत असल्याचे दिसून येत आहे. तरीही, निवडणूक आयोग, आयकर विभाग आणि पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मुंबई आणि महाराष्ट्रात निवडणुकीच्या काळात अनेक ठिकाणी बेहिशेबी रोकड किंवा मौल्यवान वस्तू सापडल्याच्या घटना वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईतील भुलेश्वरमध्ये देखील सुमारे १ कोटी ३२ लाख रुपयांची रोकड सापडली होती. या प्रकरणात पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चौकशी करण्यात आली होती. तसेच, पुण्यातही पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रोकड जप्त केली होती.
विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर पोलिसांनी सर्वत्र बंदोबस्त कडक केला आहे, या आधीही, मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील खेड-शिवापूर टोल प्लाझाजवळ झालेल्या नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी बेहिशेबी रोकड जप्त केली होती. या कारमधील प्रवाशांना अटक करण्यात आली होती आणि त्यांची चौकशी करण्यात आली.