श्रीनिवास बेलसरे
पूर्वी आकाशवाणीवर पहाटेच्या मंगल प्रहरात भक्तिगीते लावली जात. अवघा महाराष्ट्र सकाळची कामे करता करता ती गाणी ऐकत असे. त्याकाळी सर्वांच्या दिवसाची सुरुवातच प्रसन्न, सकारात्मक विचाराने करून देण्याचे काम आकाशवाणी मनोभावे करत होती. त्याशिवाय संगीताच्या, गाण्याच्या वेगवेगळ्या कार्यक्रमातही भावगीते लावली जात. ती आवडीने ऐकणारा एक मोठा श्रोतृवर्ग होता. अशाच भावगीतातील काही गाणी ही भक्तीगीत म्हणूनही जन्माला आली होती. ती श्रोत्यांना सकाळच्या मंगलप्रहरी चिंतनशील करून टाकत असत. तशीही जी मने केवळ शारीरिक पातळीवरच जगत नसतात, ज्यांना खाणे-पिणे, रंगीबेरंगी पोशाख परिधान करणे, सृष्टीसौंदर्य पाहणे, आणि शरीरसुखाचा अनुभव घेणे यापलीकडेही काही करण्यासारखे आहे असे वाटत असते ती वयाच्या कोणत्या तरी टप्प्यावर चिंतनशील होतातच.
त्यांना हे जग काय आहे? मी कोण आहे? मी या जगात कशाला आलो? आणि अनिच्छेनेच का होईना पण मला इथून एक दिवस कुठे जावे लागणार आहे? असे प्रश्न पडू लागतात. पुढे पुढे या सर्व प्रश्नांच्यापेक्षा एक प्रश्न अधिकच महत्त्वाचा वाटू लागतो. तो म्हणजे हे जग कुणी आणि कशाला निर्माण केले? शिवाय खरेच असा कुणी निर्माता आहे का?
माणसाला विचार करण्याची क्षमता आल्यापासून, म्हणजे खरे तर हजारो वर्षांपासून, हे प्रश्न माणसाला पडत आले आहेत. त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. त्यातूनच तर सगळे अध्यात्म सुरू झाले. त्याचा उपयोग काही माणसांनी आपापले क्षुद्र आर्थिक हितसंबंध, अनावर अमर्याद राजकीय महत्वाकांक्षा साधण्यासाठी एखाद्या धर्माच्या नावाने सुरू केला, तर भारतीय ऋषीमुनी, भगवान बुद्ध, महावीर यांच्यासारख्या विरक्त मुमुक्षूंनी खरोखर सत्य शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.
भारतीय अध्यात्मात सर्वात महत्त्वाचा मानला जाणारा प्रश्न आहे ‘कोहम?’ म्हणजे मी कोण आहे? माणसाने हा प्रश्न आधी स्वत:ला विचारला होता. आणि मग त्याला ज्याने हे विश्व निर्माण केले असावे, असे वाटते ‘त्यालाही’ विचारला. या प्रश्नाचाच पुढचा भाग आपोआपच मनात येतो. तो म्हणजे ‘कोत्वं?’ म्हणजे हा सर्व जगडव्याळ पसारा निर्माण करणारा तू कोण आहेस? अनेक संवेदनशील, सकारात्मक साधकांनी आणि भाविकांनीही यावर चिंतन केलेले दिसते.
प्रसिद्ध भावगीतकर सुर्यकांत खांडेकरांनी एका सुंदर भावगीतात परमेश्वराला असेच काही विचारले आहेत. खरे तर सूर्यकांतजींचे व्यक्तिमत्त्व एका सात्विक आणि भाविक व्यक्तीचेच आहे. पण तरीही त्यांना ईश्वराकडून त्यांच्या श्रद्धेला पुष्टी देणारा होकार हवा आहे. म्हणून आपल्या कवितेत ते विचारतात, मातीतून एक तांबूस कोंब उगवतो, पुढे त्याला चिमुकली पाने येतात आणि त्याचे फुलझाड बनते. एक दिवस त्याला नाजूक डहाळ्या फुटतात. त्या नाजूक डहाळ्यांच्या अजून हळुवार झालेल्या टोकांवर मग सुंदर रंगाच्या कळ्या उमलतात, त्यांची सुगंधी फुले होतात. सगळ्या आसमंतात तो सुवास दरवळत राहतो.
कवी विचारतात, हे परमेश्वरा, तूच त्या सुंगधाचा निर्माता असतोस का रे? तूच त्या फुलांच्या कोशात लपून बसलेला असतोस का?
त्या फुलांच्या गंधकोषी,
सांग तू आहेस का?
सगळ्या जगाला प्रकाशमान करण्यासाठी दिवसभर तळपणारा तुझा सूर्यतारा सायंकाळी अस्तास जातो तेव्हा तुझ्या अमर्याद आकाशात असंख्य तारे चमकू लागतात. त्यांना युगानुयुगे पुरेल इतकी ऊर्जा कोण पुरवते रे? तूच ना?
त्या प्रकाशी तारकांच्या
ओतिसी तू तेज का?
तुझ्या नभातून वायू सतत इकडून तिकडे वेगाने फिरत असतो. त्यातूनही अनेकदा आगळेवेगळे सूर ऐकू येतात. तुझी अवघी निर्मितीच जणू सतत एक गीत गुणगुणत असते असे वाटते. त्या अविरत संगीताच्या मागे उभा असलेला मुरलीधर
तूच ना रे?
त्या नभांच्या नीलरंगी
होऊनिया गीत का
गात वायूच्या स्वरांनी,
सांग तू आहेस का?
त्या फुलांच्या गंधकोषी
भगवान श्रीकृष्णांनी गीतेत सांगितले आहे. “समोऽहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रियः।” (भगवद्गीता ९/२९) म्हणजे मी सर्व प्राणीमात्रात समानपणे सामावलेलो आहे. सुर्यकांतजी त्यांच्या अदृश्य ईश्वराला तोच प्रश्न विचारतात. ‘माणसाचा प्राण म्हणून तूच त्याचे सगळे जीवन चालवत असतोस ना?’ निसर्गात प्रचंड उत्पात घडवणारी वादळासारखी, विद्युलतेसारखी तेज:पुंज शक्ती किंवा जीवनाची निर्मिती शक्य करणाऱ्या अमृताने भरलेल्या मेघातील सृजनशक्ती तूच आहेस ना?
मानवाच्या अंतरीचा
प्राण तू आहेस का?
वादळाच्या सागराचे
घोर तें तू रूप का?
जीवनीं या वर्षणारा,
तू कृपेचा मेघ का?
आसमंती नाचणारी
तू विजेची रेघ का?
त्या फुलांच्या गंधकोषी…
अवघ्या ब्रम्हांडात अगदी सूत्रबद्धपणे, शांतपणे युगानुयुगे सुरू असलेली प्रचंड कामे पाहिली की, माणसाला खात्री होते या सर्वामागे एक महाबुद्धिमान दिव्य शक्ती आहे, तिची अनंत काळासाठी आखलेली एक भव्य योजना अविरत कार्यरत आहे.
गाईला जेव्हा वासरू होते तेव्हा त्याच्या पोषणासाठी तिला तत्काळ दुध येणे सुरू होते आणि ते वासरू स्वावलंबी झाले की, त्याच्या मातेला आपोआप येणाऱ्या जीवनरसाचा पुरवठा आपोआप बंदही होतो? हे कसे काय? सर्वच प्रजातीतील मातांच्या लेकरांची एवढी काळजी घेणारी ती अदृश्य शक्ती आहे तरी कोण? ‘देवा, तूच ही व्यवस्था करून ठेवली आहेस ना?’ असे सुर्यकांतजी कुतूहलाने विचारतात. कारण खरेच आहे. या विश्वाचे संचालन इतके सूत्रबद्धपणे सुरू असते की, फारसा विचार न करणाऱ्यालाही त्याचे आश्चर्य वाटावे. नवजात शिशूच्या पालनपोषणाची, आरोग्याची व्यवस्था देवाने त्याच्या मातेच्या शरीरातच निर्माण होणाऱ्या दुधात करून ठेवलेली असते. तीही कालबद्ध. असेच या जगात काहीतरी पराक्रम केलेल्यांच्या, कष्टकाऱ्यांच्या डोळ्यांत एक तेज आलेले असते. तेही ईश्वरी तेजच नसते का?
जीवनी संजीवनी तू
माऊलीचें दूध का?
कष्टणाऱ्या बांधवांच्या
रंगसी नेत्रांत का?
ईश्वराचे अमूर्त, अदृश्य, निर्गुण, निराकार रूप ही तर अनेक धर्मांची धारणा आहे. त्यात ते सगळे मानवाला देवाने आपल्या रुपात निर्माण केले आहे असेच मानतात. म्हणून कवी विचारतो, ‘देवा तुझे दृश्य, साकार रूप म्हणजेच आम्ही मानव ना, लहान बालकाच्या निरागस हसण्यातून तूच प्रकट होत असतोस ना?
मूर्त तू मानव्य का रे?
बालकांचे हास्य का?
या इथें अन् त्या तिथें रे,
सांग तू आहेस का?
त्या फुलांच्या गंधकोषी….
कधी कधी मनस्वी कवींनी निर्माण करून अर्धवट सोडून दिलेले आणि प्रश्नातच त्यांची उत्तरे खुबीने गुंफलेले विचारही अनुभवणे सुखद असते. जीवनावरील श्रद्धा वृद्धिंगत करणारे ठरते.