डाॅ. स्वाती गानू
खरं म्हणजे एका एव्हरेज मुलालाही दिवसभरात शंभर प्रश्न पडत असतात. पण मुलांना त्यांचा पोर्शन तयार करण्याचा, टेस्टसाठी तयारी करण्याचा, रिझल्ट काय लागेल याच्या टेन्शनचा, होमवर्क, असाईनमेंट वेळेत पूर्ण करण्याचा, कधीही न संपणाऱ्या अचिव्हमेंट्स मिळवण्याच्या रेसमध्ये धावण्याचा इतका स्ट्रेस असतो की, मुले प्रश्न विचारणे जणू विसरूनच जातात. दहा ते बारा वर्षांनंतर तर प्रश्न विचारण्यापेक्षा योग्य उत्तरे पाठ करून परीक्षेत लिहिणे, मार्क्स मिळवणे त्यांना महत्त्वाचे वाटते आणि म्हणूनच मुलांमधील सृजनाची, नवनिर्माण करण्याची, काही इनोव्हेटिव्ह, क्रिएटिव्ह करण्याची, तसा विचार करण्याची संधी मुलांना देणे, अनुकूल परिस्थिती मुलांसाठी निर्माण करणे हे जसे पालक म्हणून कर्तव्य आहे तसेच ते पाहणे, अनुभवणे हे आनंददायी आहे हे आपण लक्षात ठेवायला हवे. असे पाहा की, जी मुले ‘इनोव्हेटिव्ह थिंकिंग’ करतात ते समस्या अगदी सहज सोडवू शकतात. त्याचे कारण म्हणजे इतर मुले ठरवून दिलेल्या रिजिड पद्धतीने प्राॅब्लेम्स सोडविण्याचा विचार करतात. पण ‘इनोव्हेटिव्ह थिंकिंग’ करणारी मुले आऊट ऑफ बाॅक्स जाऊन विचार करतात. मुले खरे म्हणजे निसर्गतःच क्रिएटिव्ह असतात. आपले काम काय तर त्यांना स्वातंत्र्य आवश्यक वस्तू, जागा उपलब्ध करून देणे. जेणेकरून त्यांच्यातील ‘इनोव्हेटिव्ह थिंकिंग’ अधिक चांगल्या पद्धतीने उमलत राहील. मुलांमधील ‘इनोव्हेटिव्ह थिंकिंग’ हे त्यांच्या साक्षर होण्याइतकेच महत्त्वाचे आहे. ठरावीक, साचेबंद पद्धतीने प्रश्न न सोडवता त्या गोष्टींकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणे यात मुलांच्या इनोव्हेटिव्ह थिंकिंगचे रहस्य दडलेले आहे. यासाठी सगळ्यात महत्त्वाचे विशेष म्हणजे ‘औत्सुक्य’. हा एक असा कम्पास आहे ज्यामुळे मुले आपल्यातल्या पॅशनला फाॅलो करू शकतात.
Curious–Find Out–connect actions–with outcomes अशी ही साखळी असते.
●मग मुलांमध्ये इनोव्हेटिव्ह
थिंकिंग कल्टिव्हेट करण्यासाठी काय करता येईल?
१) जेव्हा तुमचे मूल एखादा प्राॅब्लेम सोडवण्यासाठी, कठीण होमवर्क पूर्ण करण्यासाठी, असाइन्मेंट्स पूर्ण करण्यासाठी तुमची मदत मागते तेव्हा त्याला रेडिमेड उत्तर देऊ नका. तुला काय वाटते, काय करता येईल? काय करून पाहता येईल? असे विचारले की, मुले इनोव्हेटिव्ह थिंकिंग करायला
प्रवृत्त होतात.
२) मुलांबरोबर खेळा पण लीड त्यांनाच करू द्या जेणेकरून ते आपल्या कल्पनेनुसार गेम पुढे नेतात.
३) मुलांना काम करू दे, अंग मळू दे, कपडे खराब होऊ दे, मोकळेपणाने, आनंदाने त्यांना एखादा अनुभव घेऊ दिल्याने, करू दिल्याने त्यांच्यातील इनोव्हेटिव्ह थिंकिंगला वाव मिळतो.
४) कधी त्यांना कल्पना करता येईल असे प्रश्न विचारा जसे की, तुला जगातल्या प्रत्येक मुलाला काही गिफ्ट करायचे असेल तर काय देशील? तू सायंटिस्ट झालास तर लोकांच्या भल्यासाठी काय करशील?
५) तुम्ही एखादी गोष्ट सांगा आणि ती अपूर्ण गोष्ट पूर्ण त्याला करायला सांगा. मुलांचा विचार, भावना, कल्पना, मन सारे त्यात प्रतिबिंबित होते.
६) स्वयंपाकघरात नवीन पदार्थ तयार करू देत. त्यासाठी आवश्यक साहित्य आणून द्या. त्याने रेसिपीत बदल (टेस्ट, शेप, गार्निशिंग) केले तर करू द्या. ओरिजिनलचे न्यू व्हर्जन करू देत.
७) काही घरातल्या प्राॅब्लेम्सवरही कल्पना करू देत. जसे की आपला हाॅल सारखा अव्यवस्थित होतो. तुला काय वाटते काय सोल्युशन्स असू शकतील? त्यामुळे काय होते तर मुलांना जाणवते की, आपल्याला महत्त्व आहे, हे आपले घर आहे. प्रश्न दिले, ते सोडवण्याची संधी दिली की, इनोव्हेटिव्ह थिंकिंगला चालना मिळते.
८) एखादा गेम खेळताना जुन्या रुल्सच्या ऐवजी नवीन रूल्स तयार करायला सांगणे व त्यातून एखादा ब्रॅन्ड न्यू गेम तयार करण्याची संधी ही सुद्धा इनोव्हेटिव्ह थिंकिंगला वाव देत असते.
९) मुलांना शाळेत जाण्याचा, दुकानात किंवा ट्यूशनला जाण्याचा नेहमीचा रस्ता तर माहीत असतो.
नवीन रस्ता, पर्यायी रस्ता शोधायला प्रवृत्त करणं यातून शोधक वृत्तीला प्रोत्साहन मिळतं.
१०) समुद्रकिनारी दगड, शंख शिंपले, इतर समुद्री गोष्टी गोळा करणं, त्यांचा शोध घेणं, निसर्गात फिरणं, पानं-फुलं, प्राणी त्यांची जीविका माहीत करून घेणं हे अनुभव सृजनशीलतेला समृद्ध करतात.
११) ड्रेस डिझाईनिंग करणं, खेळणी डिझाईन करणे, किल्ले, जहाजांच्या प्रतिकृती तयार करणे हे फार आवडीचे आणि नवे करण्याचे आव्हान मुलांना खूप आवडते.
१२) आपल्या परस्पेक्टिव्हने एखादा प्रसंग सांगून तुझ्या दृष्टिकोनातून तू कसा मांडशील असे विचारणे हे कल्पनाशक्ती विकसित करण्याची संधी देते.
हे सारे करताना कधी कधी मुलांना अपयशही येईल तेव्हा जाऊ दे असे म्हणण्यापेक्षा तुला हे चांगले, यशस्वी करण्यासाठी काय करता येईल तो विचार कर असे प्रोत्साहित करा. मुलाच्या प्रयत्नांचे कौतुक करा. रिझल्टचे एकवेळ नाही केले तरी चालेल. अतिशय महत्त्वाचे काय तर जेव्हा मुलांना प्रश्न पडतात तेव्हाच खऱ्या अर्थाने मुले शिकतात हे
लक्षात ठेवा.