डॉ. विजया वाड
श्यामलाबाई डबा घेऊन इस्पितळाच्या पायऱ्या चढल्या. डॉक्टरांनी काल रात्रीच सांगितले होते की, राधूताईंना सकाळी जे हवे ते खाऊद्यात म्हणून! “याचा अर्थ काय समजायचा डॉक्टर?” “अर्थ आणखी उघड करून सांगायला हवा का श्यामलाबाई?” “पण राधूताई म्हणतात की, त्या यातून तरून जाणार आहेत म्हणून. महाराजांच्या कृपेचा परिस स्पर्श त्यांना झाला आहे.” “तसे झाले तर कुणाला दुःख का आहे श्यामलाबाई? त्या जगल्या तर सर्वांनाच हव्या आहेत. पण खरं सांगतो… कॅन्सर डोक्यापर्यंत पोहोचला आहे. वैद्यकीय सत्य असे सांगते की, आता फार तर चाळीस ते साठ दिवस…”
“राधूताई म्हणतात की, त्यांना केमोथेरपी हवी आहे.” “श्यामलाबाई तुम्ही त्यांची भावजय आहात. तुमचे नुसते नात्याचे संबंध नाहीत… तुम्ही चांगल्या मैत्रिणीही आहात. केमोथेरपीच्या यमयातना कशाला द्यायच्या? वैद्यकीयदृष्ट्या त्याचा फायदा आता शून्य आहे. तुम्ही सांगा त्यांना समजावून. ओके?” कालची रात्र श्यामलाबाईच्या मनातून हटत नव्हती. सारखं सारखं भरून येत होतं. आता फक्त चाळीस ते साठ दिवस…! फक्त दीड दोन महिने? या आपल्या मैत्रिणीबरोबर चिंचा-बोरं खात लहानपण गुजारलं. आपण झाडावर सरसर चढायचो नि हीच्या परकराच्या ओच्यात आवळे टाकायचो. ही पळून गेली आवळे घेऊन की, काठी घेऊन हीच्या मागे…नदीत पोहोताना एकमेकींच्या तंगड्या धरायच्या नि डबा खाताना पहिला घास एकमेकींना भरवायचा.
“आपण एकाच घरात लग्न करू. सख्ख्या बहिणी… सख्ख्या जावा!” उमलत्या वयात दोघींनी ठरवलं. पण श्यामला राधूच्या मोठ्या भावाच्या प्रेमात पडली अन् राधू प्रोफेसर ताम्हणकरांच्या.“किती वेड्या होतो न् आपण लहानपणी?” असं म्हणत दोघी मग मनमुराद हसल्या होत्या.सख्खी नणंद झालेली राधू मग राधूताई झाली. अहो राधूताई. सासूची कडक आज्ञा होती ती. जिभेला वळणच पडून गेलं मग. नणंद, दीर, नवरा, सासू… सासरे सगळेच अहो… जाहो!… प्रोफेसर ताम्हणकर वर्षभरात वर्गात वर्डस्वर्थची कविता शिकविता शिकविता गेले नि श्यामला राधूपेक्षाही गडबडली. भांबावून गेली. पण राधू म्हणायची… “ते मुळी गेले नाहीतच. आपलं माणूस आपल्या काळजात असतं. ते थोडंच दूर जातं आपल्यापासून? तुम्ही त्यांचं शरीर नेलंत ना? न्या बापडे… पण त्यांचा आत्मा मजजवळ आहे. माझी पाठराखण करतो आहे. आमच्या गुजगोष्टी कधीही संपणार नाहीत. ही जीवाशिवाची गाठ कोणीही तोडू नाही शकणार.तिचं असं बोलणं घरादाराची चिंता होऊन बसलं. पण राधू तशीच आत्मरत जगली. तिला ना पुरुष सहवासाची भूक उरली ना मातृत्वाची आस उरली. प्रोफेसर ताम्हणकरांच्या बंगल्याचं एका मंदिरात रूपांतर झालं. सारं वातावरण दत्तचित्त झालं. त्यांचे आवडते दत्तगुरू. बस्. प्रोफेसर ताम्हणकरांची पिढीजात प्रचंड प्रॉपर्टी आणि राधू!…राधू ना माहेरी आली ना जगाची उरली.
।। दत्त दत्त ऐसे
लागले ध्यान
हरपले मन झाले उन्मन ।।
श्यामलाबाईच्या तनयवर मात्र जीव होता. तनय आता मोठा आर्किटेक्ट झाला होता. भारतातल्या अग्रभागी असणाऱ्या पहिल्या पाच आर्किटेक्ट्समध्ये तनयचं नाव होतं. “ ही सारी दत्तगुरूंची कृपा ” राधूआत्या म्हणे.“आत्तू… तुझा बंगला आपण पूर्ण कायापालट करून बदलून टाकू. मी स्वत: ते काम करीन.” तनय सांगायचा अलीकडे अलीकडे. पण… तसं काही व्हायच्या आतच…हल्ली माणसं किती किती जगतात. मग राधूच का ५४ व्या वर्षी चालली? प्रोफेसर ताम्हणकरांना आता राहावत नाही का स्वर्गात तिच्याशिवाय? श्यामलाबाईचा जीव राधूच्या खोलीत प्रवेश करताना गलबलला…
“हे काय? डबा कसला वहिनी?”“तुमच्यासाठी आणलाय राधूताई. शिरा आहे. छान प्रसादासारखा केला आहे.”“मला कुठे खायला परवानगी आहे.” “डॉक्टरसाहेबांनी परवानगी दिलीय. अगदी काहीही खायला.” “आणि केमोथेरपीचं काय?” त्या अचानक आलेल्या प्रश्नानं श्यामलाबाईची गडबड उडाली. माझ्या मना… धीरानं घे. राधू तुझी नणंदच नाही केवळ… जीवाची मैत्रीण आहे. “राधू…” त्यांनी तिच्या केसातून हात फिरवला. “आता आहे ते जीवन तू आनंदात काढावंस अशी इच्छाय. केमोथेरपीच्या यमयातना नकोत राधू. आयुष्याची गुणवत्ता कमी कशाला करायची? आहेत ते दिवस…”
“काय चाललंय आहेत ते दिवस… आहेत ते दिवस? अं? माझ्या जीवावर उठलीयस तू?” राधू एकदम त्वेषानं ओरडली. श्यामलाचा जीव घाबरा झाला. “राधू… तू खाऊन घे. बरं वाटेल बघ.” तिनं एक चमचा तिच्या तोंडाशी धरला. पण राधूनं तो चमचा हाताच्या फटकाऱ्यानं फलकारून लावला. “हे बघ श्यामे, लक्षात ठेव. मी केमोथेरपी घेणार. काल मला दृष्टांत दिला आहे महाराजांनी. वैद्यकीय उपचार आणि गुरुकृपा यांच्या एकत्र येण्यानं माझी सहीसलामत सुटका होणार.”“तसं झालं तर त्याचा सगळ्यात जास्त आनंद मला आहे राधू.” “राधू नाही. राधू ताई. अहो राधूताई.” राधूनं डोळे वटारले. नर्स तेवढ्यात आत आली. ती सलाईनची नळी काढू लागली. “हे काय चाललंय?”“मॅडम, डॉक्टरांनी सांगितलं आता सलाईन नको. तुम्हाला सर्व खायला परवानगी!” “ हिनं सांगितलं ना? या बाईनं? माझ्या जीवावर उठलीय ती.” त्या दात-ओठ खाऊन ओरडल्या. ती पोरसवदा नर्स आश्चर्यानं पाहू लागली. दिवसरात्र उशा पायथ्याशी बासणाऱ्या या बाईबद्दल पेशंटच्या तोंडी अनुदार उद्गार? “श्यामे, तुला वाटत असेल… हिला कोणी नाही… बरी लवकर मेली तर, सगळी इष्टेट घशात घालता येईल. एक छदाम नाही मिळणार तुला. लक्षात ठेव. सार्वजनिक ट्रस्ट करीन मी माझ्या इष्टेटीचा.” श्यामला हक्काबक्का होऊन बघत राहिली. पण ती एक शब्द न बोलता बाहेर आली. डोळ्यांतलं पाणी निपटत राहिली. “काय भयंकर आहे हो नणंद तुमची! तुम्हाला काय पडलीय त्यांच्या पैशांची? तुमची मुलगी नामवंत, सर्वांची लोकप्रिय… आवडती अभिनेत्री, मुलगा आर्किटेक्ट… पैसा काय तुम्ही बघितला नाही?” श्यामलानं त्या तरुण नर्सच्या खांद्यावर हात ठेवला.“असं बघ मुली, त्या आजारी आहेत. त्यांना आतून यातना आहेत. आज काही बोलल्या ना उलटं पालटं तरी मी नाही घेणार मनावर. अगं किती झालं तरी आजारी माणसं समजून घ्यायला हवीतच. त्यांच्या मनाची अवस्था आपलं आयुष्य त्या तडीला पोहोचेपर्यंत नाही कळणार.” नर्सच्या मनात श्यामलाताई भरून उरल्या.